दारूच्या विळख्यातून सुटून 103 देश फिरलेल्या दृष्टिहीन अवलियाची कथा

"मी अगदी अंटार्क्टिकासकट जगातल्या सगळ्या खंडांना भेट दिलेली आहे. जगातल्या प्रत्येक देशाला भेट देणं हे माझं ध्येय आहे," टोनी गाईल्स सांगतात.

टोनी हे दृष्टिहीन आहेत आणि त्यांना दोन्ही कानांनी ऐकू येत नाही. पण प्रवासाचं वेड त्यांना आतापर्यंत 103 देशांमध्ये घेऊन गेलंय.

"काहींना असं वाटतं की मी प्रवास म्हणजे काय हे मला समजू शकरणार नाही. पण मला त्यांना दाखवायचंय की जग एका वेगळ्या पद्धतीने पाहणंही शक्य आहे," 41 वर्षांचा हा मुसाफिर सांगतो.

ते इथिओपियामध्ये असताना बीबीसी ट्रॅव्हल शो ने त्यांना गाठलं.

स्पर्शातून अनुभव

"मी लोकांचं बोलणं ऐकतो, डोंगरांवर चढतो-उतरतो, मी माझ्या त्वचेमार्फत आणि पायांनी गोष्टी अनुभवू शकतो, असंच मी एखादा देश पाहतो," ते सांगतात.

गाईल्स गेली 20 वर्षं विविध ठिकाणी प्रवास करत नवीन जागांचा अनुभव ते घेत आहेत.

अशाच एका प्रवासादरम्यान त्यांना त्यांची ग्रीक गर्लफ्रेंड भेटली. त्या देखील दृष्टिहीन आहेत.

गेल्या वर्षी ते तिच्यासोबतच रशियाला फिरायला गेले होते. क्षेत्रफळाने जगातला सर्वांत मोठा असणारा हा देश दोघांनी ट्रेनने प्रवास करून पालथा घातला.

पण बहुतेकवेळा ते एकटेच बॅगपॅक घेऊन फिरतात.

नव्याची नवलाई

आपल्या सगळ्या प्रवासाची ते भरपूर आधीच आखणी करतात. वडिलांच्या पेन्शन फंडातून या प्रवासाचा खर्च ते भागवतात.

बहुतेक विमान कंपन्यांच्या वेबसाईट्स या दृष्टिहीन व्यक्तींच्या वापरायोग्य नसल्याने त्यांची आई त्यांना विमानाची तिकीटं बुक करायला मदत करते.

ते जात असलेल्या देशांमध्ये राहण्याची सोय करायला मदत करू शकतील अशा लोकांशी वेबसाईट्सवरून संपर्क करत असल्याचं ते सांगतात.

"मला पुस्तक हातात घेऊन आपण इथे जाऊया - तिथे जाऊया असं ठरवता येत नाही. मी जिथे जाणार आहे त्या भागाची माहिती मला प्रवासाआधी करून घ्यावी लागते. माझी स्मरणशक्ती चांगली आहे. मी माझा मार्ग ठरवतो," ते सांगतात.

एकदा त्या जागी पोहोचल्यानंतर अनोळखी शहरांमधून स्वतःचा मार्ग काढणं त्यांच्यासाठी थ्रिल देणारं असतं.

"मी कुठे जातोय, मला कोण भेटणार आहे आणि काय होणार आहे, हे मला अनेकदा माहीत नसतं. माझ्यासाठी हेच अॅडव्हेंचर आहे."

कमी होत गेलेल्या क्षमता

गाईल्स 9 महिन्यांचे असताना त्यांचा दृष्टिदोष लक्षात आला. 10 वर्षांचे होईपर्यंत त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली होती.

त्या आधी ते 6 वर्षांचे असताना त्यांना कमी ऐकू येत असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. आता ते प्रभावी श्रवणयंत्रं वापरतात, पण तरीही त्यांना सगळे आवाज ऐकू येत नाहीत.

"मी टीनएजर असताना मला मी दृष्टिहीन असल्याचं अतिशय वाईट वाटायचं."

ते ज्या विशेष शाळेत शिकले तिथेच त्यांनी पहिल्यांदा परदेश प्रवासाचा अनुभव घेतला. 16 वर्षांचे असताना ते शाळेच्या ट्रिपसोबत बॉस्टनला गेले.

प्रवासाबद्दलचा त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असला तरी अनेकदा तब्येतीमुळे त्यांना प्रवास थांबवावा लागतो. 2008मध्ये त्यांची मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांना प्रत्यारोपण करून घ्यावं लागलं. त्यांच्या सावत्र वडिलांनी त्यांना किडनी दान केली.

व्यसनाधीनता

ते 15 वर्षांचे असताना त्यांचे वडील गेले आणि 16 वर्षांचे असताना त्यांच्या अगदी जवळच्या मित्राचंही निधन झालं. तो देखील अपंग होता.

"पुढची 6-7 वर्षं मी दारूच्या आहारी गेलो. 24 वर्षांचा होईपर्यंत मी अगदी दारुडा झालो होतो."

त्यांचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते. त्यांनी सांगितलेल्या दूरवरच्या गावांच्या कथांनी लहानग्या गाईल्सच्या मनावर मोठा परिणाम केला होता.

"मी एकदा दारूच्या व्यसनातून बाहेर पडल्यावर लक्षात आलं की या जगात इतरही वेगळे मार्ग आहेत."

भावनांपासून पळ

न्यू ऑर्लिन्सच्या भेटीपासून मार्च 2000 पासून त्यांच्या या बॅगपॅकिंग मोहीमेला सुरुवात झाली.

"मी कुठे जातोय ते मला कळत नव्हतं आणि मी जागीच थिजलो दीर्घ श्वास घेत मी स्वतःला सांगितलं टोनी, जर तुला हे करायचं नसेल, तर घरी जा."

पण तिथून परतायचं नाही, असं त्यांनी ठरवलं, आणि त्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या सगळ्या राज्यांना भेट दिली.

"मी प्रवास करायला सुरुवात केली माझ्या भावनांपासून दूर पळण्यासाठी. मी जितक्या जास्त लोकांना भेटतो तितकं माझ्या लक्षात येतं की मी अंध आहे सहानुभूतीने ते माझ्यासोबत राहात नाहीत तर माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे ही लोकं माझ्या अवतीभवती असतात."

कमी खर्चात प्रवास

गाईल्स कमीत कमी खर्चात प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याकडे आणि साध्या ठिकाणी राहण्यावर त्यांचा भर असतो. आदिस अबाबामधल्या अशाच एका जागेविषयी ते सांगतात, "ती जागा अगदीच साधी होती. माझ्या सगळ्या संवेदना खडबडून जाग्या झाल्या."

गाईल्सने तिथल्या बाजारांतून आणलेल्या गोष्टी वापरून त्याच्या यजमानाने त्याच्यासाठी जेवण तयार केलं.

"मी आजुबाजूंच्या गोष्टींना कानोसा घेतो, वास घेतो आणि स्पर्शाने अनुभवतो."

गोष्टी हाताळून अनुभवायला त्यांना आवडतं. लोकांशी बोलून, इतरांच्या गप्पांमधून त्या जागेबद्दल ते मनात एक चित्रं उभं करतात.

आदिस अबाबामध्ये ते एका प्रदर्शनाला गेले. तिथे मांडून ठेवलेल्या गोष्टींना हात पाहून अनुभवायची परवानगी त्यांना त्यावेळी देण्यात आली. बाकी संग्रहालयांमध्ये असं करता येत नाही. पण यावेळी मात्र आपल्याला सर्वांसोबत सामावून घेतल्यासारखं वाटल्याचं गाईल्स सांगतात.

अनोळखी वाट

नेहमीच्या वाटांपेक्षा वेगळं काही तरी वेगळं करायला त्यांना वाटतं. इथिओपियामध्ये असताना ते एक असा तलाव पहायला गेले जिथे फारसे पर्यटक जात नाही.

अनेकदा ते स्वतःसोबत एखादा गाईड घेतात पण अनेकदा घेत नाहीत आणि परिणामी अनेदा रस्ता चुकतात.

पण त्यामुळे गाईल्स घाबरून जात नाहीत. शेजारून जाणारा कोणी आपल्याला मदत करेल, याची वाट ते पाहतात.

"कदाचित 10 लोक शेजारून गेल्यानंतर एखादा थांबून विचारतो, 'तुम्ही चुकला आहात का? तुम्हाला मदत हवीय का?'"

प्रवासादरम्यान अनेकदा अनोळखी व्यक्तींनी आपल्याला त्यांच्या सोबत घरी नेऊन, खाऊ-पिऊ घातल्याचं, मदत केल्याचं ते सांगतात.

अनोळखी लोकांवर विश्वास

परदेश प्रवासात त्यांना येणारी सगळ्यांत मोठी अडचण म्हणजे पैसे काढणं आणि विविध देशांच्या चलनांच्या नोटा हाताळणं.

"मला एखादी विश्वासू व्यक्ती शोधावी लागते. ती व्यक्ती कशी आहे याचा अंदाज घ्यावा लागतो. ती व्यक्ती काय सांगतेय ते ऐकावं लागतं."

एकदा का त्या व्यक्तीबद्दल खात्री पटली की ते त्या अनोळखी माणसासोबत एटीएमला जाऊन पैसे काढतात.

"पैसे काढल्यानंतर त्या नोटा किती मूल्याच्या आहेत, हे मी त्या माणसाला विचारतो."

संगीत आणि खाणं-पिणं

प्रवासादरम्यान गाईल्स विविध सांगितिक वाद्य वाजवून पाहतात.

"मला संगीत अतिशय आवडतं. तो ताल मी अनुभवू शकतो. सगळे अडथळे ओलांडून तो ताल माझ्यापर्यंत पोहोचतो."

त्या त्या ठिकाणचे स्थानिक पदार्थही आवर्जून खायला गाईल्सना आवडतात.

विलक्षण प्रवास

गाईल्सनी आतापर्यंत अनेक विलक्षण जागांना भेट दिली असून तिथले फोटोही काढले आहेत.

ते फोटो त्यांना स्वतःला जरी पाहता येत नसले, तरी ते चालवत असलेल्या वेबसाईटवर हे फोटो टाकले जातात आणि इतरांना पाहता येतात.

त्यांचं प्रवासाचं वेड पाहून आश्चर्यचकित झालेली लोकं त्यांना अनेकदा भेटतात.

"एका आंधळ्या माणसाला जग का पहायचंय?" ते विचारतात.

गाईल्सचं उत्तर साधं असतं, "का पाहू नये?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)