रशिया विमान अपघात: मॉस्को विमातळावर लँडिंगच्या वेळी इंजिनने पेट घेतला

एका रशियन विमानाने मॉस्को विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केल्यावर पेट घेतला. या दुर्घटनेत किमान 41 लोकांचा मृत्यू झाला.

हे विमान एक सुखोई सुपरजेट-100 होतं. मॉस्कोच्या शेरेमेत्येवो विमानतळावरून ते संध्याकाळी 6.02 मिनिटांनी मरमांस्कच्या दिशेने उडालं. या विमानाने यशस्वी टेकऑफ केलं खरं, मात्र वैमानिकांनी काही वेळाने तांत्रिक बिघाड झाल्याचा इशारा देत आपत्कालीन लँडिंग करण्याचं ठरवलं. धावपट्टीवर उतरताच विमानाच्या इंजिनने पेट घेतला.

तपासकर्त्यांनुसार विमानात एकूण 78 प्रवासी होते - पायलटसह 5 कर्मचारीही. त्यापैकी फक्त 37 लोकांचा जीव वाचू शकला आहे, असं या अपघाताचा तपास करणाऱ्या येलेना मार्कोस्काया यांनी सांगितलं.

आमच्या कर्मचाऱ्यांनी सर्व लोकांना वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले, असं 'एयरोफ्लोट' या रशियाच्या सरकारी उड्डयन कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

सोशल मीडियावर आलेल्या अनेक व्हीडिओंमध्ये प्रवासी विमानाच्या आपत्कालीन द्वारांमधून बाहेर पडताना दिसत आहेत.

दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये विमान लँड होताना दिसतंय आणि त्यातून काळा धूर निघताना दिसतोय. अन्य एका व्हीडिओत विमान लँडिंगच्या वेळी हेलकावे घेताना दिसतंय.

दरम्यान, कंपनीने या घटनेतून बचावलेल्या लोकांची नावं प्रसिद्ध केली आहेत, तसंच त्यांच्या नातेवाईकांना मॉस्कोला पोहोचवण्याची सोयही ते करणार असल्याचं सांगितलं आहे.

नक्की काय झालं?

एअरोलोफ्ट कंपनीने एका प्रसिद्धिपत्रकात लिहिलंय की स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 06.02 वाजता विमानाने विमानतळ सोडलं. मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कर्मचाऱ्यांनी संकटाची सूचना देणारा संदेश दिला. इमर्जन्सी लॅंडिंग केल्यावर विमानाच्या इंजिनाने पेट घेतला.

प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि ती प्रक्रिया 55 सेंकदांत पूर्ण केली, असंही त्यात म्हटलं आहे.

प्रवासी कसे वाचले?

या घटनेतून वाचलेले मिखाइल सावचेन्को सांगतात की विमानाला आग लागल्यानंतर त्यांनी बाहेर उडी मारली. विमानातून बाहेर आल्यावर "मी जिवंत आहे, सुखरूप आहे," असं सांगत एक व्हीडिओही पोस्ट केला.

दुसरे एक प्रवासी दिमित्री ख्लेबुश्कीन म्हणाले, "मी फ्लाइट अटेंडंट्सचा मोठा कृतज्ञ आहे. जीव वाचल्याबद्दल सर्व आभार त्यांनाच देतो."

क्रिश्चियन कोस्तोव यांनी ही घटना स्वतः पाहिली. त्यांनी या घटनेचा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. ते म्हणाले, विमानतळावर बाहेर पडल्यावर लोक अक्षरशः थरथरत होते.

दुसरे एक साक्षीदार पॅट्रिक होर्लाचर यांनी बीबीसीला सांगितलं, "धुराच्या लोटांनी वेढलेलं विमान पाहणं धक्कादायक होतं."

या घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांचं सांत्वन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलं आहे. मर्मन्स्कमध्ये 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)