CIAने हेरगिरीसाठी कबुतर, कुत्रे, मांजरी आणि डॉल्फिनचा असा वापर केला

    • Author, गॉर्डन कोरेरा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

18 सप्टेंबर 1947 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांनी राष्ट्रीय सुरश्रा कायदा 1947 वर शिक्कामोर्तब केले नि जगातील सर्वांत शक्तिशाली अशा Central Investigation Agency किंवा CIAचा जन्म झाला.

तेव्हापासून शीतयुद्धादरम्यान वापरण्यात येणाऱ्या अनेक गुप्त पद्धतींचा खुलासा अमेरिकेच्या गुप्तचर संस्था CIAने केलाय. कबुतरांना कशा प्रकारे प्रशिक्षण देऊन त्यांचा हेरगिरीसाठी वापर करण्यात यायचं, हे CIAने सांगितलंय.

सोव्हिएत संघामधल्या संवदेनशील भागांमध्ये जाऊन तिथले फोटो गुप्तपणे क्लिक करण्याचं प्रशिक्षण या कबुतरांना देण्यात यायचं. एखाद्या खिडकीजवळ जाऊन उपकरण कसं ठेवायचं, हे देखील कबुतरांना शिकवण्यात यायचं, असं CIAने सांगितलंय. कबुतरांसोबतच डॉल्फिन्सचाही अशाचप्रकारे हेरगिरीसाठी वापर करण्यात येई.

गुप्तचर संस्थेने हाती घेतलेली मोहीम यशस्वी करण्यासाठी या प्राण्यांची मोठी मदत झाल्याचं CIAचं म्हणणं आहे.

CIAचं मुख्यालय व्हर्जिनियामध्ये आहे. या मुख्यालायत एक म्युझियम आहे पण ते आता सामान्य जनतेसाठी खुलं नाही.

मी एकदा त्या संग्रहालयाच्या तेव्हाच्या संचालकांची मुलाखत घेतली होती आणि अचंबित करणाऱ्या अनेक गोष्टी मला तिथे पहायला मिळाल्या होत्या. तिथे एका कबुतराचं मॉडेल होतं, ज्यावर कॅमेरा बांधण्यात आला होता.

तेव्हा मी दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित एक पुस्तक लिहीत होतो. ब्रिटनकडून केल्या जाणाऱ्या कबुतरांच्या वापराविषयीची माहिती मी तेव्हा गोळा करत होतो. कॅमेरा बांधलेलं कबुतराचं मॉडेल CIA म्युझियममध्ये पाहून माझं कुतूहल वाढलं. पण त्यावेळी त्यांनी मला याविषयीची फार काही माहिती दिली नाही.

1970मध्ये झालेल्या या ऑपरेशनचं सांकेतिक नाव होतं 'टकाना'. यामध्ये फोटो काढण्यासाठी कबुतरांचा वापर करण्यात आला होता.

गुप्त मोहिमेसाठी कबुतरांचा वापर

कबुतरांचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. शिवाय कबुतरं अगदी आज्ञाधारक असतात.

त्यांना कुठल्याही भागातून उडवलं तरी अनेक मैलांचं अंतर कापून घरी कसं परतायचं, हे त्यांना माहीत असतं. म्हणूनच CIA कबुतरांचा वापर गुप्त मोहिमेसाठी करत असे.

पूर्वीच्या काळी कबुतरांचा वापर निरोप पोहोचवण्यासाठी केल्याचं ऐकिवात आहे. पण हेरगिरीसाठी पहिल्यांदा कबुतरांचा वापर करण्यात आला तो पहिल्या महायुद्धादरम्यान.

ब्रिटीश गुप्तचर विभागाच्या फारशा प्रसिद्ध नसलेल्या MI 14(डी) - MI 149(D) शाखेने दुसऱ्या महायुद्धादरम्यान गुप्तपणे कबुतर सेवा सुरू केली.

यामध्ये कबुतरांना एखाद्या डब्यामध्ये ठेवून पॅराशूटला बांधून युरोपातल्या आकाशात सोडून देण्यात येई. या कबुतरांच्या सोबत काही सामानही असे.

एका माहितीनुसार सुमारे एक हजारापेक्षा जास्त कबुतरं गुप्त माहिती गोळा करून परत आली होती. यामध्ये व्ही1 रॉकेट जिथून लाँच करण्यात आलं त्या जागेची आणि जर्मन रडार स्टेशनचीही माहिती होती.

या युद्धानंतर ब्रिटनच्या गुप्तचर विभागांच्या संयुक्त कमिटीमध्ये 'कबुतरांची सब कमिटी' तयार करण्यात आली होती. शीत युद्ध सुरू असताना कबुतरांचा आणखी चांगला वापर कसा करता येईल याचा या कमिटीने विचार केला होता.

CIAचे प्रयोग

नंतर ब्रिटनने याप्रकारचे बहुतेक प्रयोग बंद केले. पण कबुतरांची ताकद लक्षात घेत सीआयएने त्यांचा अधिक चांगला वापर करण्याबाबत विचार केला. या ऑपरेशन टकानामध्ये इतरही प्राण्यांचा वापर झाल्याचं समजतं. सीआयएने एका कावळ्याला इतकं प्रशिक्षित केलं होतं की तो 40 ग्रॅम वजनाची वस्तू कोणत्याही इमारतीच्या खिडकीवर ठेवू शकत असे, असं फाईल्समध्ये म्हटलंय.

हे टार्गेट - म्हणजे ही वस्तू जिथे ठेवायची आहे ती जागा एका लाल लेझर लाईटने मार्क केली जाई. आणि एका खास लँपच्या माध्यमातून हा पक्षी परत येई. युरोपात एकदा CIAने एका पक्ष्याकरवी एका इमारतीच्या खिडवकीवर पाळत ठेवण्यासाठीचं यंत्र ठेवलं होतं.

सोव्हिएत संघ रासायनिक हत्यारांचा वापर करत आहे वा नाही यावरही CIA स्थलांतरित पक्ष्यांच्या मदतीने लक्ष ठेवायची.

कुत्र्यांनाही अशाच प्रकारचं प्रशिक्षण देण्यात येई. पण याविषयीची आणखी माहिती उपलब्ध नाही. 'एकॉस्टिक किटी' नावाच्या मोहीमेमध्ये एका मांजरीवर एक असं उपकरण लावण्यात आलं होतं जे आवाज ऐकून रेकॉर्ड करू शकत असे असं एका जुन्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

दुसऱ्या देशांच्या बंदरांवर पाळत ठेवण्यासाठी सीआयएने डॉल्फिन्सचा वापर केल्याचा उल्लेख 1960च्या फाईल्समध्ये आहे. पश्चिम फ्लोरिडामध्ये डॉल्फिन्सना शत्रूच्या जहाजावर हल्ला करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

शिवाय समुद्रातल्या न्यूक्लियर पाणबुड्यांचा शोध लावायला किंवा रेडिओऍक्टिव्ह शस्त्रं कशी ओळखायची, हे देखील या डॉल्फिन्सना शिकवण्यात आलं होतं.

सीआयए आपल्या तीन कार्यक्रमांवर 1967 सालापासून 6 लाख डॉलर्सपेक्षा जास्त पैसे खर्च करत आहे. डॉल्फिन्स, पक्षी, कुत्रे आणि मांजरींचा यामध्ये समावेश आहे.

कॅनडियन ससाण्याचा वापरही गुप्त माहिती मिळवण्यासाठी करण्यात येत असल्याचं एका फाईलमध्ये म्हटलंय. याआधी कोकाटू या एक प्रकारच्या पोपटाचा यासाठी वापर होत असे.

याबद्दल लेखक म्हणतात, "गडद अंधारामध्ये होणाऱ्या मोहिमा पार पाडण्यामध्ये हे ससाणे तरबेज होते."

सगळ्यात प्रभावी कबुतरं

आपल्या मोहीमांसाठी CIAने विविध प्राण्यांचा वापर केला. पण यापैकी कबुतरं सर्वात जास्त प्रभावी ठरली.

म्हणूनच 1970च्या मध्यात सीआयएने कबुतरांशी निगडीत एक सिरीज सुरू केली. इतर मोहिमांसाठीही कबुतरांचा वापर करण्यात येऊ लागला. उदाहरणार्थ, एका कबुतराला तुरुंगाच्या वर तैनात करण्यात आलं तर दुसऱ्या कबुतराला वॉशिंग्टन डीसीमध्ये नौदलाच्या तळावर.

या मोहिमांसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांची किंमत असायची दोन हजार डॉलर्सपर्यंत. तर या कॅमेऱ्यांचं वजन फक्त 35 ग्रॅम असायचं. ज्या गोष्टीने हा कॅमेरा कबुतरांवर बांधला जाई त्याचं वजन तर 5 ग्रॅमपेक्षाही कमी असे.

कबुतरांनी नौदलाच्या तळाचे 140 फोटो मिळवले. यातले अर्ध्यापेक्षा जास्त फोटो चांगल्या दर्जाचे होते. यामध्ये गाड्या आणि माणसं स्पष्टपणे दिसत होती.

त्याच कालावधीदरम्यान पाळत ठेवणाऱ्या उपग्रहांनी जे फोटो काढले होते त्यांचा दर्जा मात्र इतका चांगला नसल्याचं तज्ज्ञांना आढळलं होतं.

कबुतरांचा वापर करण्यात एकच धोका होता. जर कोणाला त्यांच्यावर संशय आला, आणि त्यांनी कबुतरांना ठार मारलं तर संपूर्ण मोहीमेत उलथापालथ झाली असती.

या कबुतरांना अतिशय गुप्त पद्धतीने सोव्हिएत संघात सोडण्यात येत असे. जहाजातून लपवून त्यांना मॉस्कोला नेण्यात येईल. त्यानंतर या कबुतरांना कोणाच्यातरी कोटखाली लपवून किंवा कोणत्यातरी कारच्या टपात भोक करून बाहेर सोडण्यात येई.

चालत्या गाडीच्या खिडकीतूनही कबुतरांना बाहेर सोडण्याचा प्रयत्नही केला जात असे. यानंतर हे कबुतर आपल्या टार्गेटजवळ जाई आणि तिथलं काम पूर्ण झाल्यानंतर त्याला शिकवल्याप्रमाणे आपल्या घरी परते.

लेनिनग्राडमध्ये समुद्री जहाजांच्या समूहाला लक्ष्य करण्यात आल्याचं सप्टेंबर 1976मधल्या एका मेमोमध्ये म्हटलं आहे. इथे सगळ्यात आधुनिक सोव्हिएत पाणबुड्या तयार करण्यात येत.

पण या 'हेर' कबुतरांनी CIAला किती गुप्त माहिती दिली आणि याने सीआयएचा किती फायदा झाला, हे सगळं मात्र अजूनही एक मोठं रहस्य आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)