एक बाटली पाण्यात फेकली आणि तिघांचा जीव वाचला...

उसळत्या धबधब्याजवळ अडकलेल्या तिघांचा जीव बाटलीत लिहिलेल्या संदेशाने वाचवला होता. ही बाटली नदीत वाहात वाहत पुढे आली त्यामुळे इतरांना हे कुटुंब संकटात असल्याची जाणीव झाली.

2019 साली मध्य कॅलिफोर्नियात राहाणारे कर्टीस व्हिटसन, त्यांची गर्लफ्रेंड क्रिस्टल आणि कर्टीस यांचा तेरा वर्षांचा मुलगा असे जंगलात फिरायला गेले होते.

ऑरयो सेको नदीच्या काठाकाठाने चालत, घळीतून रस्ता काढत पुढे असलेल्या धबधब्यापर्यंत पोहचायचं असा त्यांचा प्लॅन होता.

धबधब्यापाशी पोहचलं की वरून एक दोर खाली सोडायचा आणि त्याच्या आधाराने खाली उतरायचा त्यांचा विचार होता. धबधब्याच्या पाण्याला एवढा जोर नसेल असा त्यांचा अंदाज होता. पण झालं भलतंच.

त्यांच्या सहलीच्या दिवशी ते घळीच्या एका अरुंद भागात अडकले. दोन्ही बाजूंना 40 फुटांचे उंच कातळ होते, त्यामुळे त्यांना बाहेर पडता येईना ना त्या कातळांवर चढून वर येता येईना. जो दोर आपल्याकडे असेल असं त्यांना वाटलं तोही त्यांच्याकडे नव्हता.

आणि त्यांच्या अडचणीत अजून भर टाकली ती धबधब्याच्या पाण्याने. ज्या धबधब्याला विशेष पाणी नसेल असं त्यांना वाटलं होतं, तो भरभरून वाहात होता आणि पाण्याला जोरही फार होता.

"म्हणजे आम्ही धबधब्यावरून खाली उतरू शकत नव्हतो," कर्टीस सांगतात.

"माझ्या पोटात गोळाच आला. रॅपलिंग करणं शक्य नव्हतं कारण पाण्याला जोर खूप होता," त्यांनी CNN ला सांगितलं.

त्या भागात त्यांच्यापैकी कोणाच्याही मोबाईलला रेंज नव्हती आणि जवळपास चिटपाखरूही नव्हतं तर मदतीसाठी बोलवणार तरी कोणाला आणि कसं?

आता आपल्या आयुष्याचा अंत इथेच होतो की काय असं वाटत असतानाच कर्टीस यांनी एक कल्पना लढवली. त्यांच्या गर्लफ्रेंडकडे एक बारच बिल होतं जे त्यांनी गेम्स खेळताना गुण लिहायला बरं पडेल म्हणून जवळ ठेवलं होतं.

त्या बिलावर कर्टीस यांनी मदतीची याचना करणारा संदेश लिहिला. "आम्ही इथे धबधब्यावर अडकलो आहोत. कृपया आम्हाला मदत करा, आम्हाला इथून बाहेर काढा."

कर्टीस यांनी तो संदेश एका प्लास्टिकच्या हिरव्या बाटलीत ठेवला. त्या बाटलीच्या दोन्ही बाजूला 'हेल्प' अशी अक्षर कोरली आणि त्यांनी ती बाटली पाण्यात फेकली.

सुदैवाने ती बाटली 400 मीटर वाहत जाऊन पुढे दोन गिर्यारोहकांच्या हाती लागली. त्या गिर्यारोहकांनीच मग प्रशासनाशी संपर्क केला आणि या कुटुंबाला मदतीची गरज आहे असं सांगितलं.

धबधब्यावर अडकल्यानंतर अनेक तासांनी बचावपथकाने कर्टीस आणि त्यांच्या कुटुंबाची सुटका केली.

"जर तो संदेश वेळेवर मिळाला नसता तर या कुटुंबाचं काही खरं नव्हतं. त्यांची सुटका करेपर्यंत किती काळ गेला असता कोणास ठाऊक," कॅलिफोर्नया हायवे पेट्रोलच्या टॉड ब्रेथॉर यांनी सांगितलं.

कर्टीस म्हणतात की त्यांना त्या दोन गिर्यारोहकांना भेटायचं आणि आणि त्यांचे आभार मानायचे आहे. ते अनोळखी देवदूत कोण होते हे अजून त्यांना माहीत नाही.

"म्हणजे सगळं कसं सुरळीत जमून आलं हे पाहून मी थक्क झालो. नाहीतर कसं शक्य होतं हे, एक बाटली पाण्यात फेकली आणि आमचा जीव वाचला?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)