हातात हात धरलेल्या पुरातन सांगाड्यांचं रहस्य उलगडलं

संशोधकांना इटलीमध्ये दीड हजार वर्षांपूर्वीचे मानवी सांगाडे सापडले होते. दोन्ही सांगाडे एकमेकांचे हात धरलेल्या अवस्थेत सापडले होते आणि यावरून ते प्रेमी युगुल असेल असा अंदाज बांधला गेला होता.

त्यांचं नावही लव्हर्स ऑफ मोडिना असं ठेवलं होतं.

पण आता समोर आलेल्या नव्या संशोधनानुसार हे दोन्ही सांगाडे पुरूषांचे आहेत असं कळलं आहे.

या सांगाड्यांचं लिंग कळायला इतकी वर्ष लागली कारण ते सांगाडे अत्यंत वाईट अवस्थेत होते. पण आता नव्या तंत्रज्ञानाव्दारे सांगाड्यांच्या दातांवर असलेल्या आवरणाची तपासणी करता आली, आणि त्यामुळे या सांगड्यांचं लिंग कळू शकलं.

चौथ्या ते सहाव्या शतकादरम्यान अस्तित्वात असलेल्या या व्यक्तींचं एकमेकांशी काय नातं होतं ते मात्र कळू शकलेलं नाही.

संशोधकांचं म्हणणं आहे की या दोन्ही पुरुषांना मुद्दामच हातात हात घेतलेल्या अवस्थेत पुरलं होतं.

काहींच्या मते हे पुरुष एकमेकांचे सख्खे किंवा चुलत भाऊ असावेत किंवा युद्धात एकमेकांसोबत मृत्युमुखी पडलेले सैनिक असावेत, असं इटलीतले संशोधक-लेखक फेडरिको लुगली यांनी इटलीच्या राय न्यूजला सांगितलं.

संशोधकांना असंही वाटतं की या सांगाड्यांना जिथे पुरलं गेलं की सैनिकांना दफन करण्याची जागा असावी.

इटलीच्या बोलोग्ना विद्यापीठातले अभ्यासकांनी सायटिंफिक रिपोर्टस या जर्नलशी बोलताना सांगितलं की या संशोधनातून पुढे आलेले निष्कर्ष तत्कालीन इटलीमध्ये माणसांचे अंतिम विधी कोणत्या पद्धतीने केले जायचे यावर प्रकाश टाकू शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)