ब्रेक्झिटच्या मुद्दयावरून युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भाऊ जो जॉन्सन यांचा राजीनामा

यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा लहान भाऊ जो जॉन्सन यांनी मंत्रीपद आणि खासदारकीचा राजीनामा दिलाय. 'कुटुंबाशी असलेली बांधिलकी आणि देशाचं हित' या दरम्यान आपली ओढाताण होत असल्याचं कारण त्यांनी दिलं आहे.

उद्योग मंत्री आणि लंडनच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या ऑर्पिंग्टनचे टोरी खासदार असणाऱ्या जो यांनी आपल्या भूमिकेतला तणाव वाढल्याचं सांगितलंय.

पण त्यांनी राजीनामा देण्यासाठी निवडलेली वेळ 'अविश्वसनीय' असल्याचं बीबीसीच्या पोलिटिकल एडिटर लॉरा कुएन्सबर्ग यांनी म्हटलंय.

युरोपियन युनियनमधून ब्रिटनने बाहेर पडायचं की नाही यासाठी 2016मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये जो जॉन्सनल यांनी 'रिमेन' (Remain) म्हणजे युरोपियन युनियन सोडू नये असं मत दिलं होतं. तर त्यांच्या भावाने युरोपयिन युनियनमधून बाहेर पडण्यासाठीच्या 'लीव्ह' (Leave) मोहिमेचं इतरांच्या सोबतीने प्रतिनिधित्व केलं होतं.

कोणताही करार न करता युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याला - नो डील ब्रेक्झिटला विरोध केल्याबद्दल 21 खासदारांना 'टोरी व्हिप' मधून मुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर आता जो जॉन्सन यांनी राजीनामा दिला.

'सहकाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याने जो जॉन्सन नाराज वाटत होते' आणि 'ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून दोन्ही भावांचं मत वेगळं असल्याचं' आमच्या पोलिटिकल एडिटरने ट्वीट केलं आहे.

आपला भाऊ 'चांगला माणूस' आणि 'उत्तम मंत्री' असल्याचं बोरिस जॉन्सन यांनी वेस्ट यॉर्कशर मधल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं.

पण त्यांचं ब्रेक्झिटबद्दलचं मत स्वतःपेक्षा 'वेगळं' असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

गेल्या वर्षी युरोपियन युनियन सोबतच्या थेरेसा मे यांनी आखलेल्या डीलचा निषेध म्हणून जो जॉन्सन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पण कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या भावाची नेतेपती निवड केल्यानंतर ते पुन्हा सरकारमध्ये सामील झाले.

देशात लवकर निवडणूक घ्यावी का, यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. बंडखोरी करणाऱ्या खासदारांना त्यावेळी पुन्हा संधी देणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आणि त्यानंतर जो जॉन्सन यांनी राजीनामा दिला.

देशाच्या संसदेचं कामकाज पुढच्या आठवड्यापासून 14 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकललं जाणार आहे किंवा स्थगित केलं जाणार आहे. लवकर निवडणूक घेण्यात यावी का, यासाठी कामकाज थांबायच्या आधीच मतदान घेण्यात येणार आहे.

डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितलं, "एक राजकारणी आणि एक भाऊ म्हणून पंतप्रधानांना याची जाणीव आहे की गोष्ट जो यांच्यासाठी सोपी नव्हती. ऑर्पिंग्टनच्या मतदारांना यापेक्षा चांगला प्रतिनिधी मिळाला नसता."

ज्या खासदारांवर कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने कारवाई केली त्यापैकी एक असणाऱ्या माजी कॅबिनट मंत्री डेव्हिड गॉक यांनी ट्वीट केलं, "गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेक खासदारांना त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठीच्या बांधिलकीमध्ये ओढाताण सोसावी लागली आहे. पण जो यांना जास्त सहन करावं लागलं. संसद, सरकार आणि कन्झर्व्हेटिव्ह पक्षासाठी ही मोठी हानी आहे."

लेबर पक्षाच्या प्रति शिक्षण सचिव (Shadow education Secretary) एँजेला रायनर म्हणाल्या, "बोरिस जॉन्सन यांच्याकडून सर्वांना इतका मोठा धोका आहे की त्यांच्या स्वतःच्या भावाचाही त्यांच्यावर विश्वास नाही."

'कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा केंद्रबिंदू झपाट्याने बदलत असल्याचं या राजीनाम्यावर दिसत आहे' असं ब्रेक्झिट पार्टी नेते नायजेल फराज म्हणाले.

तर बोरिस आणि जो जॉन्सन यांच्या 'युरोपियन युनियन' सोडू नये अशा मताच्या बहिणीने - रेचल जॉन्सन यांनी ट्वीट करत म्हटलं, "आम्ही कुटुंबामध्ये ब्रेक्झिटबद्दल बोलणं टाळतो. विशेषतः जेवताना. कारण आम्हाला पंतप्रधानांना कोंडीत पकडायचं नसतं."

बोरिस जॉन्सन म्हणतात...

ब्रेक्झिटसाठीची मुदत 31 ऑक्टोबरवरून वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यापेक्षा आपण "रस्त्याच्या कडेला मरणं पसंत करू" असं बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय.

पण मुदत पुढे ढकलावी लागली तर राजीनामा देणार का, याचं उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं.

'ब्रेक्झिट पुढे नेण्यासाठी लवकर निवडणूक घेणं हा एकमेव पर्याय आहे,' असं बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा एकदा म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)