काश्मीर: पाकिस्तान सोशल मीडियावर #BoycottIndianProducts ट्रेंडिंग: भारतीय वस्तूंचा बहिष्कार करण्याचं नेटकऱ्यांचं आवाहन

#BoycottIndianProducts हा हॅशटॅग सध्या पाकिस्तानातल्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन पाकिस्तानातले नेटकरी याद्वारे करत आहेत.

काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून टाकल्यानंतर पाकिस्तानातली जनता नाराज असल्याचं पाकिस्तानी सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियांवरून दिसून येतं.

भारत-पाकिस्तान फाळणीपासून काश्मीर हा दोन्ही देशांमधला तणावाचा विषय राहिला आहे. कलम 370 काढून टाकल्याने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द झाला आणि सध्या याच मुद्द्यावरून दोन्ही देशातलं वातावरण तापलं आहे.

पाकिस्तानातल्या सोशल मीडियावरचा एक गट लिहितोय, "तुम्ही भारतीय वस्तू खरेदी केल्या तर भारत त्याच पैशातून शस्त्रास्त्र खरेदी करेल आणि काश्मिरी लोकांवर अत्याचार करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल."

केवळ वस्तूच नाही तर भारतीय चित्रपट, संगीत आणि टिव्ही मालिकाही बघू नका, असं आवाहनही करण्यात येत आहे.

पाकिस्तानातले एक ट्विटर यूजर एम. सिद्दीकी लिहितात, "एक पाकिस्तानी म्हणून आपण आपल्या काश्मिरी बांधवांसोबत आहोत, हे दाखवण्यासाठी भारतीय वस्तुंचा बहिष्कार करणं, ही आपली जबाबदारी आहे."

सिद्दीकी यांनी या ट्वीटसोबत एक फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोवर लिहिलं आहे - "Be Pakistani, Watch Pakistani" - पाकिस्तानी बना, पाकिस्तानी बघा.

उबैद खान यांनी #SaveKashmir आणि #FacistModi हा हॅशटॅग वापरत लिहिलं आहे, "शब्दातून नाही तर कृतीतून भूमिका मांडण्याची वेळ आली आहे. या मोहिमेला पाठिंबा द्या."

बिलाल शाहीद लिहितात, "भारतासाठी आपलं एअरस्पेस अजून बंद नाही. भारताच्या वस्तूंचा बहिष्कार करणं, ही आपल्या देशाची जबाबदारी आहे. कुठलंही सामान घेण्याआधी नीट बघा. ती वस्तू भारतात तयार झाली असेल तर घेऊ नका."

आणखी एका पाकिस्तानी ट्विटर यूजरने #FreeKashmir या हॅशटॅगखाली लिहिलं आहे, "बॉलिवुड गाण्यांवर बहिष्कार टाका. बॉलिवुड चित्रपटांवर बहिष्कार टाका. आपल्या प्लेलिस्टमधून बॉलिवुड गाणी काढून टाका. भारतीय ब्रँडच्या वस्तू घेऊ नका आणि भारतीय सेलिब्रिटीजनाही अनफ्रेंड करा."

ईनाम नावाच्या एका पाकिस्तानी ट्विटर युजरने सामानाची एक यादीच ट्वीट केली आहे आणि काश्मीरसाठी या सर्व वस्तूंचा बहिष्कार करण्याचं आवाहन केलं आहे. ज्यात खालील वस्तूंचा समावेश आहे.

  • भारतीय तांदूळ
  • भारतीय मसाले
  • भारतीय कणीक
  • भारतीय फळ
  • भारतीय कपडे
  • भारतीय तेल
  • भारतीय डाळ
  • भारतीय भाज्या
  • भारतीय चॅनल
  • भारतीय चित्रपट
  • भारतात फिरायला जाणं
  • भारतीय टायर
  • भारतीय कॉम्प्युटर

'भारतातून पाणी घेणं बदं करा, ऊर्दू बोलणं बंद करा'

इकडे भारतात पाकिस्तानातल्या या ट्रेंडला जोरदार उत्तर दिलं जात आहे. #BoycottIndianProducs या ट्रेंडवर भारतीय सोशल मीडिया युजर्स टीका करत आहेत.

अनिल पाटील नावाच्या एका भारतीयाने ट्वीट केलं आहे, "तुम्ही खरंच भारतीय वस्तूंचा बहिष्कार करत असाल तर सर्वप्रथम त्या पाण्याचा बहिष्कार करा जे भारतातून पाकिस्तानात जातं."

संध्या लिहितात, "काश्मीर आमचा आहे आणि काश्मिरी लोकही आमचे आहेत. तुम्ही भारतीय वस्तूंचा बहिष्कार करत असाल तर ऊर्दूचाही बहिष्कार करा. कारण या भाषेचा जन्म भारतात झाला आहे. आमची ती जमीनही सोडा जी पाकिस्तानने भारताकडून घेतली आहे. तुम्ही कायम भारताविषयीच का बोलत असता? चिल करा आणि आधी आपली अर्थव्यवस्था सांभाळा."

Insta.Rover या नावाच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करण्यात आलं आहे, "जे पाकिस्तानी #BoycottIndianProduct हा ट्रेंड चालवत आहेत त्यांना एकच सांगणं आहे - इस में तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता."

जम्मू-काश्मीरची स्वायतत्ता रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर पाकिस्तानातून सुरुवातीपासूनच कठोर प्रतिक्रिया येत आहे. स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत याविषयी वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानातल्या नागरिकांनी काश्मिरी लोकांसाठी किमान अर्धा तासाचा वेळ काढावा आणि भारताविरोधात आवाज उठवावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

भारतीय नेतृत्त्वानेदेखील पाकिस्तानविषयी कठोर भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एका सभेत म्हटलं होतं की यापुढे पाकिस्तानशी चर्चा होईल तर ती केवळ पीओके म्हणजे पाकव्याप्त काश्मीरसंबंधीच होईल.

आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील काश्मीरवरून पाकिस्तानला लक्ष्य करत जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या हिंसेसाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार झाला आहे. तिथल्या हिंसाचाराला चिथावणी आणि पाठबळ त्या पाकिस्तानकडून मिळालं आहे जो जगभरात दहशतवादाचा पाठीराखा म्हणून ओळखला जातो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)