You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हाफिझ सईदविरोधात खटला चालणारच, लाहोर हायकोर्टानं ठणकावलं
- Author, शहजाद मलिक
- Role, बीबीसी उर्दू
जमात-ए-इस्लामी आणि फलाह-ए-इंसानियत या प्रतिबंधित संघटनांशी संबंधित हाफिझ सईदविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास लाहोर हायकोर्टाने मंजुरी दिली आहे.
मुंबईवर 2008 मध्ये झालेला दहशतवादी हल्ला हाफिझ सईदद्वारे घडवून आणला असं भारताचं म्हणणं आहे.
लाहोरमधील दहशतवादविरोधी पोलीस ठाण्याने केलेले आरोप रेकॉर्ड म्हणून सादर केले जाणार आहेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
हाफिझ सईदवरील खटले हटवण्यात यावेत अशी याचिका वकील एके. डोगर यांच्यातर्फे दाखल करण्यात आली होती. मंगळवारी लाहोर न्यायालयाच्या मजहर अली अकबर नकवी यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी केली.
हाफिझ सईदविरोधातील खटले आंतरराष्ट्रीय दडपण आणि राजकारण यामुळे दाखल करण्यात आले आहेत, असं याचिकेत म्हटलं होतं.
कट्टरपंथी किंवा देशाविरोधातील कारवायांमध्ये सामील संस्था किंवा संघटनेशी माझे अशील संलग्न नाहीत असा दावा हाफीझ यांच्या वकिलांनी केला होता.
मुंबई हल्ल्यासंदर्भात भारताने केलेल्या दाव्यात तथ्य नसल्याचं डोगर यांनी म्हटलं होतं.
हाफिझ सईद यांना कोणत्याही गुन्ह्यासाठी पाकिस्तानच्या कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरवलेलं नाही. कोणत्याही न्यायालयात त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत.
"अशा परिस्थितीत माझ्या अशीलाविरोधात कुठल्याही स्वरुपाची बंदी घालणं मूलभूत मानवाधिकारांविरोधात आहे," असं डोगर यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानातील दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांच्या मते, हाफीझविरोधात 23 विविध खटले दाखल करण्यात आले आहेत. प्रतिबंधित आणि बिगरलाभार्थी संस्थांना पैसा मिळवून देण्याची प्रकरणं सर्वाधिक आहेत. हाफीझ यांच्या सहकाऱ्यांविरोधात 56 खटले दाखल आहेत. यापैकी काहींविरोधात हायकोर्टात अपील करण्यात आलं आहे.
यावर्षी सरकारने फलाह-ए-इंसानियत संघटनेचा समावेश प्रतिबंधित संघटनांमध्ये केला आहे. संघटनेतर्फे चालवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची जबाबदारी सरकारने घेतली आहे.
लाहोरहून गुजरानवाला शहरात जात असताना हाफिझ यांना अटक करण्यात आली होती. सध्या लाहोरमधील एका तुरुंगात त्याचं वास्तव्य आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)