You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतीय रुपया बांगलादेशच्या टकापेक्षाही खाली घसरलाय? फॅक्ट चेक
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
भारतीय अर्थव्यवस्था सध्या जरा अडचणीत असल्याचं काल आलेल्या GDPच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंच. मात्र परिस्थिती इतकी वाईट आहे का की बांगलादेशी चलन टकाच्या तुलनेत भारतीय रुपयाचं अधिक अवमूल्यन झालं आहे?
कारण 'गेल्या 72 वर्षांत पहिल्यांदा रुपया टकापेक्षा खाली घसरला आहे', असं सांगणाऱ्या शेकडो पोस्टस फेसबुक आणि ट्विटरवर टाकल्या जात आहेत. ही पोस्ट शेअर करणाऱ्या अनेक लोकांनी रुपयाच्या अशा अवमूल्यनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला यासाठी जबाबदार धरलं आहे.
काही लोकांनी रुपया आणि बांगलादेशी चलन टका यांची तुलना करणारे तक्तेही शेअर केले आहेत. पण बीबीसीने केलेल्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळून आला आहे.
रुपया आणि टका
बांगलादेश आणि भारताच्या स्टॉक एक्सचेंजमधून मिळालेल्या माहितीनुसार टका आणि रुपयाचं कन्व्हर्जन रेट दाखवणाऱ्या काही सार्वजनिक बेवसाईटनुसार काही दिवसांपूर्वी एका भारतीय रुपयाची किंमत 1.18 बांगलादेशी टकाएवढी आहे.
म्हणजे एका रुपयात 1.18 बांगलादेशी टका विकत घेतले जाऊ शकतात आणि 10 रुपयात 11.80 बांगलादेशी टका. म्हणजेच एका बांगलादेशी टक्यासाठी 84 पैसे द्यावे लागतील.
सोशल मीडियावर लोक हेच कन्व्हर्जन पोस्ट करत आहेत. यात पण रुपया आणि टकाची अदलाबदल झालेली आहे.
डॉलरच्या तुलनेत...
बांगलादेशच्या ढाका स्टॉक एक्सचेंज आणि चितगाव स्टॉक एक्सचेंजनुसार मंगळवारी एका अमेरिकन डॉलरची किंमत 84.60 बांगलादेशी टका इतकी आहे.
दुसरीकडे भारताच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बाँबे स्टॉक एक्सचेंजनुसार एका डॉलरची किंमत 71.70 रुपये आहे, म्हणजेच बांगलादेशी टकाचं जास्त अवमूल्यन झालेलं आहे.
गेल्या 90 दिवसात एका अमेरिकन डॉलरची किंमत जास्तीत जास्त 72.08 रुपये एवढी झाली होती, तर बांगलादेशी टकाची किंमत जास्तीत जास्त 84.77 टका एवढी झाली होती.
गेल्या दहा वर्षांविषयी बोलायचं झालं तर एका अमेरिकन डॉलरची किंमत कमीत कमी 43.92 एवढी होती तर बांगलादेशी टकाची किंमत कमीत कमी 68.24 एवढी होती.
म्हणजेच गेल्या दहा वर्षात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत बांगलादेशी टका भारतीय रुपयापेक्षा मजबूत राहिला आहे. टकाच्या अवमूल्यानाचा दर रुपयापेक्षा नक्कीच कमी आहे.
बांगलदेशच्या वार्षिक GDP वाढीचा दर पाकिस्तानपेक्षा अडीच टक्के जास्त आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कौशिक बासू यांच्यानुसार बांगलादेशचा विकासदर भारताला मागे टाकू शकतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)