'विमानाने उड्डाण केलं, वेग पकडला आणि अचानक दोन्ही इंजिनं बंद पडली'
मॉस्कोत पक्ष्यांच्या थव्याच्या धडकेमुळे 233 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनात अचानक बिघाड झाला आणि मक्याच्या शेतात इमरजन्सी लँडिंग करावं लागलं.
या विमानाचे पायलट दमिर युसुपोव्ह यांना रशियाकडून 'हिरो' पदवी देऊन गौरवण्यात येणार आहे. दमिर यांचं रशियासह जगभरातून कौतुक होत आहे.
पक्ष्यांच्या थव्याची विमानाला धडक (बर्ड स्ट्राईक) बसली आणि आपात्कालीन परिस्थितीत मक्याच्या शेतात इमरजन्सी लॅंडिंग करण्यात आलं. यामुळे जवळपास 74 प्रवासी किरकोळ जखमी झाले. मात्र, इमरजन्सी लँडिंगमुळे Ural Airlines Airbus 321 विमानातील 233 प्रवाशांचा जीव वाचला.
रशियातील या घटनेची तुलना 'मिरॅकल ऑन द हडसन'शी तुलना होतेय. 2009 साली न्यूयॉर्कमध्येही ही घटना घडली होती. या विमानालाही पक्ष्यांच्या थव्याची धडक बसली होती आणि इंजिनात बिघाड झाला होता. त्यानंतर पायलटने विमान हडसन नदीत यशस्वीपणे उतरवून प्रवाशांचे प्राण वाचवले होते.
रशियाच्या 'ए-321' ला नेमकं झालं काय?
मॉस्कोतून क्रीमियाच्या सिमलरपूर येथे जाण्यासाठी 'Ural Airlines Airbus 321' या विमानाने 226 प्रवाशांसह उड्डाण घेतलं. ही नियमित फ्लाईट होती.

फोटो स्रोत, REUTERS
पायलट दमिर युसुपोव्ह यांनी या घटनेचा थरार सांगताना म्हटलं, "विमानाने उड्डाण घेतल्यानंतर वेग पकडत होता, तेवढ्यात अचानक एक इंजिन बिघडलं, नंतर दुसरंही. त्यानंतर अचानक दोन्ही इंजिनं बंद पडली."
"पहिलं इंजिन बंद पडलं, तेव्हा असं वाटलं की विमानतळावर पुन्हा आपण परतू शकतो. मात्र, दुसरं इंजिनही बिघडू लागल्यानंतर आमच्या प्रयत्नांना अपयश येऊ लागलं आणि विमान हेलकावे खात जमिनीच्या दिशेने झेपावू लागलं." असं युसुपोव्ह सांगतात.

युसुपोव्ह सांगतात, "विमानाची उंची कायम ठेवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. मात्र, विमान केवळल 243 मीटर उंचीवर आहे, असं फ्लाईट ट्रेडर डेटा दाखवत होता. तरीही विमानाला उंच नेत स्थिर करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी इंजिनात नेमकं कुठं बिघाड झालंय, हेही शोधत होतो. मात्र, नंतर आमच्या लक्षात आलं की, आमच्याकडे खूप कमी वेळ उरला होता."
कॅप्टन युसुपोव्ह आणि त्यांचे सहकारी पायलट जॉर्जी मुर्झीन यांनी इंजिनला पुरवठा करणारं इंधन रोखलं आणि विमानाला स्थिर करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी मक्याच्या शेतात विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र लँडिंग, रनवेऐवजी शेतात करत असल्याने विमानाच्या चाकांसह इंधनाच्या टाकीचा स्फोट होण्याची भीती होती.
युरल एअरलाईन्स फ्लाईटच्या इमर्जन्सी लँडिंगबाबत सराव केला होता, असं युसुपोव्ह सांगतात.
मी 'हिरो' असल्याचं मला वाटत नाही. विमान, त्यातील प्रवासी आणि कर्मचारी यांना वाचवण्यासाठी त्यावेळी जे करायला हवं होतं, ते मी केलं, असं युसुपोव्ह नम्रपणे सांगतात.
रशियातील टॉप पायलटपैकी एक असणाऱ्या युरी सित्निक यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की, "कर्मचाऱ्यांनी जे करायला हवं, ते सर्व केलंय. इंजिन बंद करून विमानाला अत्यंत योग्य पद्धतीने जमिनीकडे आणलं आणि लँडिंग केलं. यावेळी वेग महत्त्वाचा असतो. अत्यंत कठीण वेळ असते ही."
ज्यावेळी विमानचं मक्याच्या शेतात इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं, त्यावेळी इमर्जन्सी एक्झिटमधून प्रवाशांना बाहेर जाण्यास सांगितलं गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
वित्य बाबिन हा 11 वर्षीय मुलगा सांगतो, "विमानातून धूर येत असल्याचं एका हवाईसुंदरीने सांगितलं. त्यानंतर सगळ्यांमध्येच भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या मागे येण्यास सांगितलं. माग आम्ही त्यांच्या मागे धावत सुटलो."
विमानातील जवळपास 70 प्रवाशांना वैद्यकीय मदतीची गरज लागली. कारण लँडिंगवेळी त्यांना किरकोळ जखम झाली होती. यातील एका महिलेला फक्त रुग्णालयात भरती करावं लागलं.
विमानाचं ज्या मक्याच्या शेतात लँडिंग करण्यात आलं, तिथे मक्याची रोपं चांगली वाढली होती आणि पावसामुळे ओलसरपणाही त्यावर होता. यामुळे लँडिंग करत असताना वाढलेल्या रोपांमुळे विमान थेट जमिनीवर आदळलं नाही आणि त्यावरील पावसाच्या थेंबांमुळे स्पार्क होऊन स्फोटाची शक्यताही कमी झाली.
'मिरॅकल ऑन द हडसन' सारखीच घटना?
2009 साली न्यूयॉर्कमध्येही अशीच घटना घडली होती. त्यावेळी पायलटने हडसन नदीत विमानत उतरवलं होतं. पुढे या घनटनेवर आधारित 'सली : मिरॅकल ऑन द हडसन' नावाने हॉलिवूडपटही आला होता.
त्यामुळे मॉस्कोतील घटनेची तुलना हडसनच्या घटनेशी केली जातेय.
बीबीसीशी बोलताना रशियन पायलटने याबाबत म्हटलं की, न्यूयॉर्क आणि मॉस्कोतील घटनेत पक्ष्यांच्या थव्यांमुळेच इंजिनात बिघाड झाल्याने विमानांचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं, असलं तरी यात काही फरक देखील आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"न्यूयॉर्कमध्ये हडसन नदीत विमान उतरवल्यावर त्यातील 155 प्रवाशांना बोटींच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं होतं. त्यावेळी काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली होती. मात्र, मॉस्कोतील घटनेत कुणाही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही." असं ते सांगतात.
रशियाच्या ए-321 विमानाच्या पायलटचा म्हणजेच मिर युसुपोव्हचा अनुभव कमी होता, दुसरीकडे न्यूयॉर्कमधील विमान घटनेतील पायलट 57 वर्षांचा होता. त्यांच्याकडे विमान चालवण्याचा 30 वर्षांचा अनुभव होता. शिवाय, त्यांनी लढाऊ विमानही चालवले होते.
न्यूयॉर्कच्या घटनेवेळी पायलटकडे वेळ होता. बर्ड स्ट्राईकवेळी त्यांचं विमान जमिनीपासून 975 मीटर उंच आकाशात होतं. म्हजणेच, रशियाच्या ए-321 विमान ज्या अंतरावर होतं, त्याच्या तिप्पट अंतर.
दोन्ही इमर्जन्सी लँडिंगची जमेची बाजू म्हणजे, मॉस्कोत उंच वाढलेली मक्याची रोपं आणि न्यूयॉर्कमधील घटनेत हडसन नदीचा उथळ भाग लँडिंगसाठी मिळाला. त्यामुळे दोन्ही घटनांवेळी लँडिंग सुरक्षित करता आलं.
'बर्ड स्ट्राईक'चा वाढता धोका
विमानाला पक्ष्यांच्या थव्यांच्या धडका बसण्याच्या घटना हवाई वाहतूक संस्थांकडून मोजल्याही जातात. 'बर्ड स्ट्राईक' अशी संकल्पना त्यामुळेच पुढे आली.
रशियातील वेदोमोस्ती डेलीच्या वृत्तानुसार, 2015 मध्ये 411 वेळा, तर गेल्या वर्षी म्हणजे 2018 साली 1021 वेळा बर्ड स्ट्राईक झाले. खरंतर जगभरात पक्ष्यांच्या थव्यांमुळे हवाई वाहतुकीला अडथळे निर्माण होतात.
सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटीच्या आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये 2016 साली 1835, तर 2012 साली 1380 बर्ड स्ट्राईकच्या घटना घडल्या.

फोटो स्रोत, Getty Images
रशियात तर हे प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. एअर ट्रॅफिक म्हणूनही या गोष्टीकडे पाहिलं जातंय.
वेदोमोस्ती डेलीच्या वृत्तानुसार, मॉस्कोतील झुकोव्हस्की विमानतळाच्या दोन किलोमीटरच्या परिसरात पक्ष्यांना आकर्षित करेल असं ठिकाण आहे. तिथे असलेल्या कचराकुंड्यांमुळे तर बर्ड स्ट्राईकचा धोका अधिकच वाढण्यास मदत होतेय.
मात्र, मॉस्कोतील सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, कचराडेपो झुकोव्हस्की विमानतळापासून 14 किलोमीटर दूर आहे.
लष्करी पायलट जनरल व्लादिमीर पोपोव्ह यांच्या माहितीनुसार, पक्षीतज्ज्ञांची नेमणूकही रशियातील विमानतळांवर करण्यात आली होती. मात्र, हा उपाय पूर्णपणे प्रभावी ठरला नाही. दुसरीकडे, इंजिनला लोखंडी जाळेही लावू शकत नाही. कारण विमानाच्या वेगामुळे ते अडथळे निर्माण करू शकतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









