येमेनमध्ये लष्करी परेडवर ड्रोनने हल्ला, 32 जणांचा मृत्यू

येमेनमध्ये सैन्याच्या परेडवर झालेल्या हल्ल्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

हौथी बंडखोरांनी मिसाईल आणि ड्रोनच्या सहाय्यानं हा हल्ला केला आहे.

हौथी बंडखोरांकडून चालवल्या जाणाऱ्या एका वृत्तवाहिनीनुसार ही परेड येमेनच्या दक्षिणेला असलेल्या एडन शहरात सुरू होती.

एडनमधूनच येमेनचं सध्याचं आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकार देशाचा कारभार चालवत आहे.

याआधी एडन शहरातल्या पोलीस स्टेशनवर आत्मघाती हल्ला झाला होता. त्यात 10 लोकांचा मृत्यू झाला होता. पण या दोन्ही हल्ल्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

आपल्यावर हल्ला करण्यासाठीच ही परेड सुरू होती असा दावा हौथी बंडखोरांनी केला आहे तर सरकारचं म्हणणं आहे की नव्यानं सैन्यात दाखल होणाऱ्या जवानांची ही पासिंग परेड होती.

"या हल्ल्यानंतर तिथली परिस्थिती भयावह होती", असं ही घटना प्रत्यक्ष पाहाणाऱ्या व्यक्तीनं रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. हल्ल्यानंतर मृत शरीरांचे तुकडे सर्वत्र उडाले होते आणि लोक रडत होते असं त्यानं पुढे सांगितलं.

आंतरराष्ट्रीय मेडिकल एजन्सी MSF नुसार या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत.

येमेनमध्ये मार्च 2015 पासून युद्धसदृश्य परिस्थिती आहे. 2015 मध्ये हौथी बंडखोरांनी देशाच्या पश्चिम भागावर कब्जा केला. त्यानंतर तत्कालिन राष्ट्राध्यक्ष अबद रबू मंसूर हादी यांना देश सोडून जावं लागलं.

शेजारच्या शियाबहुल इराणचा हौथी बंडखोरांना पाठिंबा आहे. त्यांच्याशी लढण्यासाठी सौदी अरेबियानं आजूबाजूच्या इतर 8 सुन्नी देशांना एकत्र घेऊन संयुक्त फौजांची स्थापना केली. तेव्हापासून अबद रबू मंसूर हादी यांना सत्तेत आणण्यासाठी संयुक्त फौजा हवाई हल्ले करत आहेत.

या संयुक्त फौजांना अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांच्याकडून सामरिक मदत आणि गुप्त माहिती पुरवली जात आहे.

या संयुक्त फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 10,000 ते 70,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बहुतांश सामान्य नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.

संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी येमेनमधल्या या परिस्थितीबाबत वेळेवेळी चिंता व्यक्त केली आहे. पण त्याचा कुठलाही विशेष परिणाम इथं होताना दिसत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)