You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानचं हवाईक्षेत्र पुन्हा खुलं: पण ते बंद होण्याचा कुणाला सर्वांत जास्त फटका बसला?
बालाकोट हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेलं पाकिस्तानचं हवाईक्षेत्र पुन्हा खुलं करण्यात आल्याची घोषणा पाकिस्तानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून (CAA) मंगळवारी करण्यात आली. हवाई वाहतूक बंद असल्याने कोणाचं किती नुकसान झालं आहे?
गेल्या 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने 28 फेब्रुवारीला पाकिस्तानाल्या बालाकोटवर हवाई हल्ला केला होता. त्यानंतर ही हवाई हद्द बंद करण्यात आली.
पाकिस्तानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने भारतीय वेळेनुसार 12.41 वाजता एअरमेन नोटीस (NOTAM) प्रसिद्ध केली. यामध्ये असं म्हटलंय की, "पाकिस्तानाची हवाई हद्द ताबडतोब सर्व प्रकारच्या नागरी उड्डाणांसाठी खुली करण्यात येत आहे."
या निर्णयामुळे भारताची सरकारी उड्डाण कंपनी एअर इंडियाला मोठा दिलासा मिळणार आहे. कारण पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्याने एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी इतर मार्गांचा वापर करावा लागत होता. यामुळे कंपनीला कोटयवधींचा तोटा सोसावा लागत होता.
कोणाचं किती नुकसान?
पाकिस्तानी हवाई क्षेत्र वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने भारतीय विमान कंपन्यांचं,स विशेषतः एअर इंडियाचं दररोज कोट्यवधींचं नुकसान होत होतं. 3 जुलै रोजी नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राज्यसभेमध्ये एक आकडेवारी सादर केली. यानुसार 2 जुलैपर्यंत एअर इंडियाला 491 कोटींचा फटका बसलेला आहे.
तर देशांतर्गत सेवा देणारी कंपनी स्पाईसजेटला 30.73 कोटी रुपये, इंडिगोला 25.1 कोटी रुपये आणि गोएअरला 2.1कोटी रुपयेचं नुकसान सोसावं लागलं आहे.
पाकिस्तानी हवाई हद्द बंद झाल्याने एअर इंडियाला युरोप आणि अमेरिकेतल्या शहरांसाठी लांबचा मार्ग अवलंबावा लागला आणि सोबतच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करावी लागली.
इंडिगोने दिल्ली ते इस्तंबूल ही थेट विमानसेवा बंद केली होती. इथे जाण्यासाठी विमानाला कतारमधल्या दोहामध्ये थांबावं लागायचं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)