You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनमधले मुस्लीमः शिंजियांग प्रांतात सांस्कृतिक नरसंहार?
- Author, जॉन सडवर्थ
- Role, बीबीसी न्यूज, शिंजियांग
चीनमधल्या शिंजियांग प्रांतात मुस्लीम मुलांना त्यांचं घर, धर्म, भाषा, संस्कृती यापासून वेगळं केलं जात असल्याचं एका नव्या शोधात उघड झालं आहे.
चीनमध्ये लाखो प्रौढ मुस्लिमांनादेखील त्यांच्या कुटुंबांपासून वेगळ करत डांबून ठेवलं जातंय. या कोठड्या म्हणजे पुनर्शिक्षण केंद्र असल्याचं चीनकडून सांगितलं जातंय.
चीनमधल्या या प्रांतात बोर्डिंग शाळांची संख्याही झपाट्याने वाढतेय.
बीबीसीने सार्वजनिक स्वरुपात उपलब्ध असलेली कागदपत्रं पडताळली. तसंच या मुस्लिमांच्या परदेशांमध्ये राहणाऱ्या आप्तेष्टांच्या मुलाखतीही घेतल्या.
या सर्वांच्या आधारे बीबीसीने ठोस पुरावे गोळा केले आहेत. शिंजियांग प्रांतात मुस्लीम मुलांबाबत काय घडतंय, त्याची हकीगत या पुराव्यांवरून सिद्ध होते.
एकाच वस्तीतल्या चारशेहून अधिक मुलांना कुठल्या ना कुठल्या कारणाने ताब्यात घेण्यात आल्याने ती मुले त्यांच्या पालकांपासून दुरावल्याचं माहितीवरून सिद्ध होतं. या मुलांना कोठडीत किंवा तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं आहे.
या मुलांना सेंट्रलाईज्ड केअर म्हणजेच देखभालीची गरज आहे का, याचा औपचारिक अभ्यास सुरू आहे.
शिंजियांग प्रांतातल्या प्रौढांची ओळख बदलण्यात येत आहे. इतकंच नाही तर मुलांना त्यांच्या मूळांपासून वेगळं करण्याचा व्यवस्थित कार्यक्रम आखण्यात आल्याचेही ठोस पुरावे हाती लागले आहेत.
शिंजियांग प्रांतात काम करणाऱ्या परदेशी पत्रकारांवर चोवीस तास लक्ष ठेवलं जातं. त्यांचा पाठलाग करण्यात येतो. यामुळे या प्रांतात राहणाऱ्या लोकांशी संवाद साधणं अशक्य आहे. मात्र, बीबीसीने टर्कीमध्ये राहणाऱ्या शिंजियांग प्रांतातल्या लोकांशी बातचीत केली आहे.
इस्तंबुलमधल्या एका मोठ्या हॉलमध्ये अनेक जण आपली व्यथा सांगण्यासाठी जमले आहेत. यातल्या अनेकांच्या हातात त्यांच्या मुलांचे फोटो होते. ही सर्व मुलं आता शिंजियांग प्रांतात बेपत्ता आहेत.
आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा फोटो दाखवत तिची आई म्हणते, "आता कोण हिची काळजी घेत असेल, मला नाही माहीत. आमचा तिच्याशी कसलाच संपर्क नाही."
आम्ही 54 जणांच्या वेगवेगळ्या मुलाखती घेतल्या. प्रत्येकाची कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे. हॉलमध्ये जमलेले पालक आणि आजी-आजोबा यांनी शिंजियांग प्रांतात बेपत्ता झालेल्या जवळपास 90 लहान मुलांची माहिती दिली.
हे सर्व शिंजियांगमधल्या विगर समाजाचे आहेत. हा चीनमधला मुख्य मुस्लीम समाज आहे. या समाजाचे टर्कीशी जवळचे संबंध आहेत.
या समाजातले अनेक मुस्लीम शिक्षणासाठी किंवा व्यापार करण्यासाठी, आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा चीनमध्ये धार्मिक अधिकारांच्या गळचेपीपासून दूर जाण्यासाठी टर्कीत आले आहेत.
मात्र, शिंजियांगमध्ये चीनने हजारो विगर मुस्लिमांना ताब्यात घेणं सुरू केल्याने यातले अनेक जण गेल्या तीन वर्षांपासून टर्कीमध्येच अडकले आहेत.
विगर मुस्लीम आणि अल्पसंख्याक समुदायातल्या हजारो लोकांना ताब्यात घेऊन त्यांना मोठमोठ्या कोठड्यांमध्ये डांबून ठेवण्यात येतंय.
हिंसक धार्मिक कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी विगर मुस्लिमांना प्रशिक्षण देत असल्याचं चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मुस्लिमांना डांबून ठेवण्यात आलेल्या कोठड्यांना चीन पुनर्शिक्षण केंद्र असल्याचं सांगतो.
मात्र, या लाखो लोकांपैकी अनेकांना केवळ त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे ताब्यात घेण्यात आल्याचं पुराव्यांवरून दिसतं.
अनेकांना तर नमाजपठण केल्याच्या कारणावरून, काहींना बुरखा घातला म्हणून तर काहींना टर्कीमध्ये कुणाशी संबंध आहेत, या कारणांवरून ताब्यात घेण्यात आलं आहे.
टर्कीमध्ये राहत असलेले हे विगर मुस्लीम चीनमध्ये परतले तर त्यांनाही ताब्यात घेतलं जाईल, हे निश्चित. आता तर फोनवरून बोलण्याचीही सोय राहिलेली नाही.
शिंजियांगमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने परदेशातल्या आपल्या नातेवाईकाशी फोनवरून संपर्क करणंही जोखमीचं झालंय.
टर्कीमध्ये असलेले एक वडील सांगतात की चीनमध्ये त्याच्या बायकोला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्याच्या आठ मुलांपैकी काहींचा सांभाळ आता चीन सरकार करतंय.
ते सांगतात, "मला वाटतं की माझ्या मुलांना प्रशिक्षण शिबिरांमध्ये ठेवण्यात आलंय."
ही आणि अशा हजारो मुलांसोबत चीनमध्ये काय घडतंय, ते बीबीसीसाठी करण्यात आलेल्या एका शोधातून दिसून येतं.
शिंजियांग प्रांतातल्या मुस्लिमांना ताब्यात घेतलं जात असल्याची बातमी जगासमोर आणण्याचं श्रेय जर्मन शोधकर्ते डॉ. एडरियन जेंज यांना जातं.
सार्वजनिक स्वरुपात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी एक अहवाल तयार केला आहे. शिंजियांग प्रांतात सरकारी शाळा किती वेगाने वाढत आहेत, हे या अहवालातून स्पष्ट होतं.
शाळेच्या परिसराचा विस्तार होतोय. नवीन हॉस्टेल्स उभारण्यात येत आहेत आणि त्यांची क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढवली जात आहे.
चीन सरकार मुलांचा चोवीस तास सांभाळ करण्याची स्वतःची क्षमताही वाढवत आहे.
एकीकडे हे सुरू असताना चीन सरकार मोठ्या प्रमाणावर कोठड्यांची उभारणीही करत आहे.
विगर मुस्लिमांना केंद्रस्थानी ठेवून हे सर्व सुरू असल्याचं मानलं जातंय.
2017 या एकाच वर्षात शिंजियांग प्रांतातल्या किंडरगार्डन शाळांमध्ये नोंदणी झालेल्या मुलांच्या संख्येत पाच लाखांहून जास्त वाढ झाली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार यातली 90 टक्क्यांहून जास्त मुलं मुस्लीम आहेत. परिणामी कधीकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांचं प्रमाण सर्वात कमी असणारा शिंजियांग प्रांत आता पटसंख्येत आघाडीवर आहे.
शिंजियांग प्रांताच्या दक्षिण भागात प्रशासनाने किंडरगार्डन शाळांच्या उभारणीसाठी 1.2 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. सर्वाधिक विगर मुस्लीम याच भागात राहतात.
डॉ. जेंज यांनी केलेल्या अभ्यासात आढळलं की नवीन बांधकामात सर्वाधिक महत्त्व हॉस्टेल उभारणीला देण्यात येतंय.
शिंजियांगमध्ये ज्या कारणांमुळे प्रौढांना ताब्यात घेण्यात येतंय शिक्षण विस्तारामागेही तिचं कारणं असावीत, असा अंदाज आहे आणि याचा परिणाम जवळपास सर्वच विगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक समाजातल्या मुलांवर होतोय.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रशासनाने आसपासच्या गावातून 2000 मुलांना येचेंग काउंटी क्रमांक चारच्या माध्यमिक शाळेत दाखल केलं होतं.
येचेंग काउंटी माध्यमिक शाळा
खालील फोटोत ते ठिकाण दिसतंय जिथे शिंजियांग प्रांताच्या दक्षिण भागाला असलेल्या येचेंग शहरात दोन नवीन बोर्डिंग स्कूल उभारण्याची तयारी सुरू आहे.
मध्यभागी असलेल्या खेळाच्या मैदानाच्या दोन्ही बाजूला कशा प्रकारे दोन माध्यमिक शाळा उभारण्यात आल्या आहेत. या शाळांचा आकार संपूर्ण देशातल्या शाळांच्या सरासरी आकाराच्या तिप्पट आहे आणि वर्षभरातच त्यांची उभारणीही करण्यता आली आहे.
या बोर्डिंग शाळा 'सामाजिक स्थैर्य आणि शांतता' टिकवून ठेवण्यासाठी सहाय्यक आहेत आणि पालकांची जागा आता या शाळा घेत असल्याचा प्रचार सरकारतर्फे करण्यात येतोय. मात्र, त्यांचा हेतू काहीतरी वेगळाच असल्याचं जेंज सांगतात.
ते म्हणतात, "बोर्डिंग शाळेच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या सांस्कृतिक रि-इंजीनिअरिंगसाठी पार्श्वभूमी तयार होते."
त्यांचा अभ्यास सांगतो की शिबिरांप्रमाणेच या शाळांच्या परिसरातही विगर किंवा इतर स्थानिक भाषा नष्ट करण्यासाठी एक संघटित मोहीम सुरू आहे.
विद्यार्थी किंवा शिक्षक शाळेत चीनी वगळता इतर कुठल्याही भाषेत बोलल्यास त्यांना कोणती शिक्षा करायची, याचे प्रत्येक शाळेने नियम आखले आहेत.
यामुळे त्या अधिकृत वक्तव्यांना बळ मिळत ज्यात सांगण्यात आलंय की शिंजियांगमधल्या सगळ्या शाळांमध्ये संपूर्णपणे चीनी भाषेतच शिक्षण देण्यात येणार आहे.
या मोहिमेमुळे आई-वडिलांपासून दुरावलेल्या अनेक मुलांची काळजी सरकारला घ्यावी लागत असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं शिंजियांगच्या प्रचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी शू गिजियांग यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
ते हसत हसत सांगत होते, "कुटुंबातला एखादा सदस्य होकेशनल ट्रेनिंगसाठी गेला तर त्या कुटुंबाला त्रास होणारच. मात्र, असं प्रकरण माझ्या बघण्यात नाही."
मात्र, जेंज यांच्या शोधातला कदाचित सर्वाधिक महत्त्वाचा भाग कुठला असेल तर तो म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांच्या मुलांना मोठ्या प्रमाणावर बोर्डिंग शाळांमध्ये दाखल करण्यात येत आहे.
व्होकेशनल ट्रेनिंग किंवा तुरुंगात जाणाऱ्या लोकांच्या मुलांच्या परिस्थितीची माहिती ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन एक विशिष्ट अर्ज भरतात आणि त्याद्वारे या मुलांना सरकारी देखभालीची गरज आहे की नाही, हे ठरवतात.
जेंज यांना असं एक सरकारी कागदपत्र मिळालं ज्यात "गरजू समुदायाला" देण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या अनुदानाचा उल्लेख होता. यात त्या कुटुंबांची नावंही होती ज्यात "नवरा-बायको दोघंही व्होकेशनल ट्रेनिंगला गेले आहेत."
सोबतच एज्युकेशन ब्युरोला निर्देश देण्यात आले होते. त्याअंतर्गत शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मुलांच्या गरजा पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं होतं.
यातल्या एका परिच्छेदात शाळांनी कठोर मानसशास्त्रीय कौन्सीलींग करायला हवं, असं म्हटलेलं आहे. शिबिरांमधल्या आई-वडिलांना जी वागणूक मिळतेच तिच या मुलांनाही द्यावी, असं या वाक्यातून दिसतं.
नजरकैदेमुळे या मुलांवर होत असलेल्या परिणांमाकडे एक महत्त्वाची सामाजिक समस्या म्हणून बघितलं जातंय, हे स्पष्ट आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी काही प्रयत्नही होत आहेत. मात्र, प्रशासन ही माहिती सार्वजनिक करत नाही.
काही सरकारी कागदपत्रं मुद्दाम सर्च इंजिनवर अपलोड करण्यात आलेली नाही. उदाहरणार्थ काही ठिकाणी वोकेशनल ट्रेनिंगऐवजी चिन्हांचा वापर करण्यात आला आहे.
काही प्रकरणांमध्ये प्रौढांना ताब्यात ठेवलेल्या केंद्रांच्या जवळच किंडरगार्डन उभारले आहेत. या परिसराचा दौरा केला तेव्हा चीनच्या सरकारी मीडियाच्या बातम्यांमध्ये या किंडरगार्डनच्या वैशिष्ट्यांची तोंडभर कौतुक करण्यात आलं होतं.
ते म्हणतात की हे बोर्डिंग स्कूल अल्पसंख्याकांच्या मुलांना "चांगल्या सवयी" शिकवण्यात मदत करतील. शिवाय इथे घरच्यापेक्षा जास्त स्वच्छता आहे. काही मुलांनी तर आपल्या शिक्षिकेलाच 'आई' म्हणायला सुरुवात केली आहे.
अशा प्रकरणांविषयी अधिकृत योजनांची माहिती घेण्यासाठी आम्ही शिंजियांगमधल्या स्थानिक एज्युकेशन ब्युरोला फोन केला. बहुतांश अधिकाऱ्यांना बोलायला नकार दिला. मात्र, काहींनी सिस्टिमच्या आत काय घडतंय त्याची झलक दाखवली.
ज्या आई-वडिलांना शिबिरांमध्ये नेण्यात येतं त्यांच्या मुलांचं काय होतं?, असं आम्ही एका अधिकाऱ्याला विचारलं.
त्या महिला अधिकाऱ्याने सांगितलं, "ती मुलं बोर्डिंग स्कूलमध्ये आहेत. आम्ही त्यांना राहण्यासाठी जागा, जेवण आणि कपडे देतो. आमच्या वरिष्ठांनी या मुलांची चांगली काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत."
इस्तंबुलमधल्या हॉलमध्ये जसजशा विखुरलेल्या कुटुंबांच्या कहाण्या समोर येतात, त्यांचं दुःख आणि असंतोष अधिक गहिरा होत जातो.
एका आईने मला सांगितलं, "हजारो निष्पाप मुलं आपल्या आई-वडिलांपासून दूर केली जात आहेत आणि आम्ही सतत हे सांगतोय. सत्य माहीत असूनही संपूर्ण जग गप्प का आहे?"
रिसर्चमध्ये आढळलं की शिंजियांगमध्ये सर्व मुलं आता त्या शाळांमध्ये आहे जिथे त्यांना वेगळं ठेवलं जातंय.
अनेक शाळांमध्ये सर्विलन्स सिस्टिम लावण्यात आली आहे. अलार्म लावले आहेत. इतकंच नाही तर 10 हजार वोल्टच्या विजेच्या ताराही लावल्या आहेत.
काही शाळांमध्ये तर सुरक्षेवर होणारा खर्च इतर सर्व खर्चांहून जास्त आहे.
ही योजना 2017 साली जाहीर करण्यात आली. त्यावेळेस लोकांना ताब्यात घेण्याच्या प्रकरणांमध्ये नाट्यमयरित्या वाढ झाली होती.
विगर मुस्लीम माता-पित्यांकडून त्यांची मुलं हिरावून घेण्यासाठी ही सरकारची पूर्वनियोजित कार्यवाही होती का, असा सवाल जेंज विचारतात.
ते सांगतात, "मला वाटतं की आई-वडील आणि त्यांच्या मुलांना वेगळं करण्यासाठी ही सुनियोजित कारवाई आहे. यावरून शिंजियांग सरकार एका नव्या पिढीला त्यांची मूळं, धार्मिक श्रद्धा आणि त्यांची स्वतःची भाषा यापासून तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट होतं."
"हा सांस्कृतिक नरसंहार असल्याचं माझं म्हणणं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)