निसर्गाची आणीबाणी: लाखो प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर - पाहा 5 तक्त्यांमध्ये नेमका धोका किती

    • Author, हेलन ब्रिग्स, बिकी डेल आणि नॅसोस स्टीलियान्यू
    • Role, बीबीसी न्यूज

जंगलांची कत्तल, जलसंपदेचा ऱ्हास आणि जमीन, वायू तसंच पाणी प्रदूषणामुळे निसर्गाची आणीबाणी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, असा इशारा काही दिवसांपूर्वी 50 देशांतल्या 500 पेक्षा जास्त तज्ज्ञांनी दिला होता.

संयुक्त राष्ट्रानेही त्यांच्या या अहवालाला पाठबळ दिलं होतंच आणि आता आपल्याभोवतीची असह्य उष्णतासुद्धा त्याचीच ग्वाही देत आहे.

Intergovernmental Science-Policy Platform on Biodiversity and Ecosystem Services (IPBES) द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालातून निसर्गाच्या बचावासाठीची कोणती तातडीची पावलं उचलण्याची गरज आहे, याचा आराखडा येणंही अपेक्षित होतं.

काय सांगतो हा अहवाल आपल्या ग्रहाच्या जैवविविधतेच्या आरोग्याबद्दल?

1. जगातली जैवविविधता झपाट्याने संपतेय

इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) ने जाहीर केलेली अस्तित्त्व धोक्यात आलेल्या प्रजातींची यादी आपण निसर्गाला किती मोठ्या प्रमाणात धोका पोहोचवलेला आहे, ते सांगते.

अस्तित्त्व धोक्यात आलेल्या प्रजाती म्हणून यामध्ये आतापर्यंत एक लाख प्रजातींचा अभ्यास करण्यात आलेला आहे. यापैकी 25 टक्क्यांपेक्षा जास्त प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. यामध्ये मादागास्करमधल्या लेमूरपासून ते बेडूक आणि सॅलामांडर सारख्या उभयचर प्राण्यांचा, कोनिफर्स आणि ऑर्किड्ससारख्या रोपांचाही समावेश आहे.

ही पाहणी अजूनही पूर्ण झालेली नाही आणि या जगाच्या पाठीवर नेमके किती प्राणी, झाडंझुडुपं किंवा किती प्रकारच्या बुरशी आहेत, हे आपल्याला अजूनही माहीत नाही. काहींचा अंदाज आहे की जगभरामध्ये वीस लाख प्रजाती आहेत तर काही जण अब्जावधी प्रजाती असल्याचा अंदाज वर्तवतात.

पण बहुतेक तज्ज्ञांचा अंदाज आहे की हा आकडा 1.1 कोटी किंवा त्यापेश्री कमी असावा.

पण पृथ्वीवर लवकरच मोठ्या प्रमाणावर प्रजाती नामशेष होणार असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. गेल्या 5 कोटी वर्षांमध्ये असं फक्त सहा वेळा घडलेलं आहे.

"या ग्रहावरच्या प्रजाती झपाट्याने नामशेष होत असल्याचे भरपूर पुरावे आता आपल्याकडे आहेत," रॉयल बोटॅनिक गार्डन्सचे संचालक प्रो. अलेक्झांड्रे एन्तोनेल्ली यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं.

अशनी पृथ्वीवर आदळल्यामुळे 6.6 कोटी वर्षांपूर्वी अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण यावेळी "मनुष्य कारणीभूत असल्याचं" ते सांगतात.

मनुष्य अस्तित्त्वात येण्यापूर्वी प्रजाती नामशेष होण्याचा जो वेग होता त्यापेक्षा आताचा दर हजार पटींनी जास्त आहे. आणि असा अंदाज आहे की लवकरच हा वेग 10,000 पटींनी जास्त होईल.

ज्या भूभागांमध्ये विलक्षण सृष्टीसौंदर्य आहे तिथे ही चिंता जास्त भेडसावतेय. आफ्रिका खंडामध्ये विविध प्रजातींचे मोठे सस्तन प्राणी सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतात. तिथे ही गंभीर बाब आहे.

आफ्रिकेतले जवळपास अर्धे पक्षी आणि सस्तन प्राणी 2100च्या अखेरीपर्यंत मानवजातीच्या विविध कृत्यांमुळे संपुष्टात येण्याची शक्यता असल्याचं IPBESने गेल्यावर्षी प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात म्हटलं आहे.

गेल्या दशकभरामध्ये युरोप आणि मध्य आशियातील जमिनीवर राहणारे प्राणी आणि झाडांच्या प्रजातींमध्ये 42 टक्क्यांची घट झाल्याचंही यामध्ये म्हटलं आहे.

2. सगळ्यात मोठा धोका हवामान बदल आणि प्रदूषणापासून

नुकत्याच करण्यात आलेल्या एका पाहणीनुसार हवामानात होणारा बदल हा मोठा धोका असला तरी नैसर्गिक अधिवास कमी होणं हे जैवविविधता कमी होण्याचं मुख्य कारण आहे. शेती करण्यासाठी, इंधन वा जळण मिळवण्यासाठी निसर्ग ओरबाडला जातोय. याशिवाय जंगलतोड, शिकार आणि मासेमारीही प्रमाणाबाहेर झाल्याने झाडं आणि प्राण्यांना हानी पोहोचलेली आहे.

पँगोलिन (खवलेमांजराची प्रजाती) सारख्या प्राण्यांची तस्करी आणि मांसासाठी शिकार झाल्याने आज हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्यानमारमधील चपटं नाक असणाऱ्या माकडावर (Snow-nosed monkey) जंगलतोडीमुळे संकंट आलं आहे. तर बेसुमार वाढणाऱ्या शेतीने चित्त्यासारख्या प्राण्याला अडचणीत आणलं आहे. "जगभरातल्या सरकारांनी हवामान बदलाकडे फार जास्त लक्ष दिलं, पण घटणाऱ्या जैवविविधतेकडे किंवा जमीनच्या खालावणाऱ्या दर्जाकडे मात्र फारसं लक्ष दिलं नाही," IPBESचे अध्यक्ष प्रो. सर बॉब वॉटसन यांनी बीबीसीला सांगितलं.

"या तीनही गोष्टी माणसासाठी महत्त्वाच्या आहेत."

3. प्राणी आणि झाडं नष्टं होत आहेत. आणि नैसर्गिक अधिवासासाठीची जमीनही

मानवी कृत्यांमुळे जमिनीचा दर्जा खालवतोय आणि याचा परिणाम 3.2 अब्ज लोकांवर होत आहे. परिणामी पृथ्वीवर सहाव्यांदा मोठ्या प्रमाणात प्रजाती नामशेष होऊ शकतात असं, IPBESचं म्हणणं आहे.

अयोग्य पद्धतीने करण्यात आलेली शेती आणि वनीकरण, हवामानात झालेला बदल आणि काही भागांमध्ये शहरांचा झालेला विस्तार, रस्ते आणि खाणकाम ही यामागची कारणं आहेत.

जमिनीचा दर्जा खालवण्यामध्ये जंगल नष्ट होण्याचाही समावेश आहे. वृक्षारोपण आणि वनीकरणामुळे जगभरामध्ये याचा वेग जरी कमी झालेला असला तरी उष्णकटिबंधीय प्रदेशातल्या जंगलांमध्ये याचा वेग मात्र वाढलेला आहे. पृथ्वीवर सगळ्यांत जास्त जैवविविधता या भागामध्ये आढळते.

2018मध्ये उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये 1.2 कोटी हेक्टर क्षेत्रफळावरील जंगल नष्ट झालं, म्हणजे दर मिनिटाला जवळपास 30 फुटबॉल मैदानांएवढं जंगल नष्ट होतंय.

4. अधिवास नष्ट झाल्याचा फटका जैवविविधतेला

IPBESनुसार पृथ्वीवरच्या एकूण जमिनीपैकी फक्त एक चतुर्थांश जमीन ही माणसांच्या कृत्यांच्या परिणामांपासून मुक्त आहे. 2050पर्यंत हे प्रमाण घसरून फक्त एक दशांशापर्यंत येण्याचा अंदाज आहे.

"आपल्यासमोर आता पर्यावरणाबद्दलची जी आव्हानं आहेत, त्यामध्ये जमिनीचा वापर हे महत्त्वाचं कारण आहे," युनिव्हर्सिटी ऑफ ब्रासिलियाचे प्राध्यापक मर्सिडीज बुस्टामांटे यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.

2001पासून इंडोनेशियामधील लाखो हेक्टरवरचं गडद वर्षावन (रेन फॉरेस्ट) नष्ट झालेलं आहे. सरकारने याविषयीचे कायदे सक्त केल्यानंतर आणि पावसाच्या काळामध्ये वणव्यांचं प्रमाण घटल्याने 2018मध्ये हे प्रमाण 40 टक्क्यांनी कमी झालं. पण ओरांगउटानची वस्ती असणारा भाग मात्र पाम ऑईलसाठीच्या लागवडीमुळे नष्ट झालेला आहे.

जंगलतोड अशाच प्रकारे सुरू राहिली तर आग्नेय आशियामधील बोर्नेओ आणि सुमात्रा बेटांवरील पक्ष्यांच्या तीन पैकी एक प्रजाती आणि आणि एक चतुर्थांश सस्तन प्राणी, हे नष्ट होण्याची भीती IPBESने व्यक्त केली आहे.

5. रेनफॉरेस्ट नष्टं होत आहेत

अॅमझॉन नदीच्या भागात जगातलं सगळ्यात मोठं उष्णकटिबंधीय वर्षावन आहे. इथे अनेक झाडांच्या किंवा प्राण्यांच्या प्रजातींचा अजून शोधही लागलेला नाही.

अॅमझॉनच्या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या राँडोनिया भागामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालेली आहे. शेती करण्यासाठी, गुरांना चरण्यासाठी, लाकडासाठी, खाणकामासाठी जंगलतोड झाल्याने झाडं नष्ट होत आहेत.

आता या भागावर नजर टाकली तर रिकामी शेतं, वस्त्या आणि मधूनमधून जंगलाचा भाग, असं दृश्यं दिसतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)