You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅमेझॉनचे वनरक्षक, जे सोन्यांच्या अवैध उत्खननामुळे नष्ट होणारं जंगल वाचवतात
- Author, क्लेअर प्रेस
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस, फ्रेंच गयाना
दक्षिण अमेरिकेच्या ईशान्येकडे असलेला फ्रेंच गयाना हा फ्रान्सचा भाग. पृथ्वीवर सर्वाधिक घनदाट जंगल असलेल्या देशांपैकी एक देश. मात्र बेकायदेशीर सोनं उत्खननामुळे इथली जैवविविधता धोक्यात आलीये.
सार्जंट वॅडिम आपला डावा हात उंचावून टीमला थांबायला सांगतात. उजव्या हातानं त्यांनी रायफल घट्ट धरून ठेवलेली.
पानांनी झाकलेल्या पायवाटेकडे बोट दाखवत ते सांगतात, "सोन्याच्या खाणींकडे जाणारे पावलांचे ठसे इथं स्पष्ट दिसतात. तीन चार दिवसांपूर्वी ते इथं आले होते. त्यांच्याकडे बरंच सामान होतं."
सार्जंट वॅडिम फ्रान्स 'फ्रेंच फॉरेन लिजन' या सुसज्ज तुकडीचा भाग आहेत. घनदाट वर्षावनाचं रक्षण हे या आंतरराष्ट्रीय पातळीवर नियुक्त करण्यात आलेल्या तुकडीचं काम आहे.
जंगलात आणखी थोडावेळ फिरल्यानंतर सार्जंट वॅडिम यांनी छोटी शिटी वाजवली. काही सेकंदातच दाट झाडांमधून उत्तरादाखल आणखी एका शिटीचा आवाज आला. अशीच दुसरी एक सैन्यतुकडी जवळच होती.
जंगलाच्या दोन्ही बाजूंनी या दोन तुकड्या पहारा देतात. जंगलातली नैसर्गिक संपत्ती लुटणाऱ्या टोळ्यांचा बीमोड होईल, अशी आशा त्यांना आहे. "प्रत्येक देशाने आपल्या सीमांचं रक्षण करून अवैध वाहतूक रोखली पाहिजे," असं मोहिमेचं नेतृत्व करणारे आणि सार्जंट वॅडिम यांचे कमांडिग ऑफिसर कॅप्टन व्हिएने सांगत होते.
"या फ्रेंच गयानामध्ये एक खास खजिना आहे. आमचं जंगल. त्याचं रक्षण करणं हेच आमचं मिशन आहे."
अमेझॉनच्या या जंगलात मोठा खजिना आहे. तो खजिना आहे सोन्याचा. जमिनीच्या अगदी पन्नास फूट खाली सोनं सापडतं.
गेल्या काही शतकांपासून अनेकजण नशीब चमकवण्यासाठी इथे येतात. मात्र 2008 साली आलेल्या आर्थिक मंदीत सोन्याचे भाव अचानक वधारले आणि अॅमेझॉनच्या जंगलात सगळीकडे सोन्याचा शोध सुरू झाला.
तेव्हापासून सोन्याचे दर वाढले आणि वारेमाप सोनं उत्खननामुळे अगदी इक्वाडोरपासून पेरू, कोलंबिया आणि व्हेनेझुएला ते थेट ब्राझीलपर्यंत अॅमेझॉनचं जंगल नष्ट होऊ लागलं.
फ्रेंच गयानाची लोकसंख्या आहे अवघी तीन लाख. यात आठ ते दहा हजार बेकायदा खाण माफिया आहेत.
सोनं उत्खननात विषारी पाऱ्याचा वापर
सोनं उत्खननासाठी वापरलं जाणारं रसायन हे अतिशय विषारी आणि घातक असतं, असं वनसंवर्धन तज्ज्ञ आणि अॅमेझॉन संवर्धन पथकाचे संचालक डॉमनिक प्लोवर सांगतात.
त्यांनी सांगितलं, "सोनं काढण्यासाठी पाऱ्याचा (मर्क्युरी) वापर केला जातो. हीच मोठी समस्या आहे. यामुळे नदी प्रदूषित होते. नदीतले मासे विषारी होतात आणि असे मासे खाणाऱ्या मनुष्यालाही विषबाधा होते."
पारा अत्यंत विषारी असून त्याला नष्ट करता येत नाही. त्यामुळे मनुष्यासाठी तो खूपच घातक आहे.
उत्खननानंतर मातीतून सोन्याचे कण वेगळे करण्यासाठी त्यात पारा मिसळतात. ते लगेच सोन्याला चिकटतात. मग ते धुतलं की माती बाजूला होते. आता सोन्यापासून पारा वेगळा करण्यासाठी ते जाळतात. अशा रीतीने अगदी सहजगत्या शुद्ध सोनं मिळवता येतं.
एक ग्रॅम सोनं मिळवण्यासाठी किमान एक ग्रॅम पाऱ्याची गरज असते. धुतल्यानंतर हा पारा अॅमेझॉनच्या नद्यांमध्ये सोडला जातो. तो माशांच्या पोटात जातो आणि अशाप्रकारे अन्नसाखळीत पाऱ्याचा प्रवेश होतो.
पोवर सांगतात, "पारा वेगाने कृती करतो. तो थेट मज्जासंस्थेवर आघात करतो. त्यामुळे फुप्फुस, मूत्रपिंड आणि मेंदूवर परिणाम होतो. हॉस्पिटलमध्ये आणलेल्या स्थानिक मुलांमध्ये आम्ही याचे दुष्परिणाम बघितले आहेत."
वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार मानवी वापरामुळे जेवढा पारा पृथ्वीवर सोडला जातो, त्यातील एक पारा सोनं उत्खननातून येतो.
बेकायदा खाणकाम करणारे 'गॅरिम्पिरॉस
फ्रेंच गयाना आणि ब्राझीलच्या सीमेवर 'गॅरिम्पिरॉस' सोन्याचं उत्खनन करतात. बेकायदा सोनं उत्खनन करणाऱ्या छोट्या-छोट्या खाण चालकांना पोर्तुगीज भाषेत 'गॅरिम्पिरॉस' म्हणतात.
कॅप्टन व्हिएने सांगतात, "बरेचदा हे गॅरिम्पिरॉस ब्राझीलमधले गरीब नागरिक असतात. त्यांना सहज पैसा मिळवायचा असतो. ते अनेक महिने या जंगलातच राहतात."
"गावाकडे त्यांना मोलमजुरी करून महिन्याला 200 डॉलर वगैरे मिळतात. मात्र या जंगलात एवढे पैसे ते काही दिवसात कमवू शकतात."
या गॅरिम्पिरॉसला शोधून काढणं आणि त्यांचे कँप उद्ध्वस्त करणं, ही फ्रेंच फॉरेन लिजनची मुख्य जबाबदारी आहे.
असं सगळं बोलणं सुरू असताना सार्जंट वॅडिम यांनी आपल्या टीमला पुढे जाण्याचे आदेश दिले. जंगलात काही खुणा सापडतात का, याचा शोध घेत ते अत्यंत काळजीपूर्वक पुढे जात होते.
घनदाट जंगल असल्याने इथे मोबाईल फोनला रेंज नसते. त्यामुळे गॅरिम्पिरॉस आपल्या साथीदारांसाठी जंगलात संदेश लपवून ठेवतात. आपल्या कँपचा पत्ता सांगण्यासाठी मोठा चाकू झाडाच्या ढोलीत किंवा जमिनीखाली लपवून ठेवतात, किंवा सिगारेटच्या पाकिटावर लाल बाण काढून ठेवतात.
अॅमेझॉनमध्ये राहण्याचं आव्हान
या जंगलात राहण्यासाठी शस्त्रांसोबतच चिकाटीही महत्त्वाची असते. सतत ओली असणारी जमीन आणि हजारो विषारी किड्या, मुंग्या, साप, बेडकं आणि कोळ्यांचं घर असलेल्या या जंगलात राहणं सोपं नाही. जमिनीवर अशी परिस्थिती तर नद्यांमध्ये एका झटक्यात माणसांच्या हाडांचा चुराडा करणारे पिऱ्हाना मासे आणि मगरी यांच्यात सतत चढाओढ सुरू असते.
सार्जंट वॅडिम कुत्सित स्मित करत सांगतात, की एखाद्या दणकट घोड्यालाही क्षणार्धात ठार करू शकेल, इतका हायव्होल्टेज ड्रामा नदीत सुरू असतो.
छुप्या कँपच्या शोधात ही टीम एकाच दिशेने रोज जवळपास चाळीस किलोमीटर अंतर कापते. त्यांच्या या मोहिमेदरम्यान अन्न आणि स्वच्छ पाणी यासाठी ते हेलिकॉप्टरवर अवलंबून असतात. संध्याकाळी नदीत आंघोळ केली की ते दोन झाड्यांच्यामध्ये झोपाळा तयार करून त्यातच रात्र घालवतात.
मात्र एवढा मोठा शस्त्रसाठा, हेलिकॉप्टरची मदत, गॅसोलीन बोट्स आणि GPS यंत्रणा असूनदेखील क्वचितच कुणी त्यांच्या हाती लागतं. बरेचदा तर ते येण्याआधीच उत्खनन करणाऱ्यांना सुगावा लागतो आणि ते पळ काढतात.
कॅप्टन व्हिएने सांगतात, "ते दिवसभर आमच्यावर पाळत ठेवून असतात. आम्ही पोचण्याआधीच त्यांना आमची माहिती कळते."
आयर्लंड देशाएवढ्या आकारमानाच्या या जंगलात हे 400 जवान पहारा देतात. मात्र ते सर्व ठिकाणी सर्ववेळ असू शकत नाहीत. संवर्धन तज्ज्ञ डॉमनिक पोवर यांच्या मते गॅरिम्पिरॉस आणि फ्रेंच सुरक्षा दलाचे जवान दोघेही अल्पकालीन उपायांच्या मागे धावत आहेत.
ते सांगतात, "सुरक्षा जवानांची पाठ वळली की गॅरिम्पिरॉस लगेच पुन्हा हजर होतात. या भागात सोनं उत्खनन त्यांच्या उदरनिर्वाहाचं मोठं साधन आहे. त्यामुळे तुम्ही हे करू नका, एवढं म्हणून चालणार नाही."
"अनेक स्थानिक आणि ब्राझिलीयन नागरिक या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत. जंगल नष्ट होण्यापासून वाचवायचं असेल तर या सगळ्यांना कायदेशीर आणि शाश्वत पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)