You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अल्झायमर: नव्या औषधाची माहिती कंपनीने दडवली?
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात 'फायजर' या अमेरिकन औषध निर्मिती कंपनीने अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या आजारावर नवं औषध तयार करणार नसल्याचं जाहीर केलं. या बातमीने औषधांवर संशोधन करणारे संशोधक, रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक निराश झाले होते.
यापूर्वी याच कंपनीने अल्झायमरवर पर्यायी औषध शोधण्यात लाखो डॉलर्स खर्च केले होते. मात्र, नंतर त्यांनी ठरवलं की हा पैसा दुसरीकडे इतर कामावर खर्च करण्यात येईल.
आपल्या या निर्णयाचं समर्थन करत फायजर कंपनीने म्हटलं की जिथे आमच्या शास्त्रज्ञांची पकड मजबूत आहे, तिथेच पैसा गुंतवला आहे.
मात्र, अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या वॉशिंग्टन पोस्ट या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने एक धक्कादायक बातमी प्रसिद्ध केली आहे. बातमीनुसार या संशोधनाचे परिणाम अल्झायमर विरोधातल्या लढ्यात अत्यंत महत्त्वाचे असूनही कंपनीने ते लपवून ठेवले.
विमा कंपन्यांनी केलेल्या शेकडो दाव्यांच्या आधारावर हे संशोधन करण्यात आलं होतं. यात कळलं की सूज कमी करण्यासाठी वापरात येणारं फाइझर कंपनीचं एक औषध 'एन्ब्रेल' जे युमेटॉईड आर्थराइटीसच्या उपचारात वापरलं जातं, ते अल्झायमरचा धोका 64 टक्क्यांपर्यंत कमी करू शकत होतं.
2018 सालच्या फायजर कंपनीच्या अंतर्गत समितीच्या एका सादरीकरणात सांगण्यात आलं होतं की, "एन्ब्रेलने अल्झायमरला आळा घालता येऊ शकला असता. अल्झायमरवर उपचार आणि अल्झायमर वाढण्याच्या गती कमी करता आली असती."
कंपनीने वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेत संशोधनाचे परिणाम जाहीर न केल्याचं मान्य केलंय.
या बातमीनुसार, "कंपनीने सांगितलं की तीन वर्षांच्या अंतर्गत समीक्षेदरम्यान आढळलं की एन्ब्रेल हे औषध थेट मेंदूतल्या पेशींपर्यंत पोचत नाही. त्यामुळे हे औषध अल्झायमरच्या उपचारात उपयोगी नाही."
फायजरचं म्हणणं होतं की अल्झायमरवर या औषधाचे क्लिनिकल ट्रायल यशस्वी होण्याची शक्यता कमी होती.
चुकीचा मार्ग
वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीनुसार, "अल्झायमरवर दुसरं औषध शोधण्याचं काम करणारे दुसरे शास्त्रज्ञ भरकटण्याची शक्यता असल्याने आपण या संशोधनाचे परिणाम जाहीर केले नाही," असं फायजरने सांगितलं.
या वृत्तात काही प्रतिष्ठित शास्त्रज्ञांच्याही प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. अल्झायमरवर संशोधन करणारे हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमधले प्राध्यापक रुडोल्फ इ. तंजी म्हणतात, "त्यांनी हे नक्कीच करायलाच हवं होतं." (माहिती द्यायला हवी होती.)
अल्झायमरवर संशोधन करणारे आणखी एक संशोधक जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातले प्राध्यापक कीनन वॉकर म्हणतात, "शास्त्रज्ञांसाठी ही माहिती उपयोगाची ठरली असती. माहिती सकारात्मक असो किंवा नकारात्मक, योग्य निर्णय घेण्यात मदतच होते."
बरेचदा एका आजारासाठी तयार करण्यात आलेलं औषध दुसऱ्या एखाद्या आजारावरच्या उपचारासाठी अधिक फायदेशीर ठरतं, हे फायजरला चांगलं ठाऊक आहे. वायग्रा संबंधी हेच झालं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)