You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शीतपेयं पिताय? सावधान, त्यामुळे लवकर मृत्यू ओढवू शकतो
एका नव्या संशोधनानुसार असं लक्षात आलं आहे की अतिरिक्त साखर असलेल्या शीतपेयांमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं तसंच लवकर मृत्यूही ओढवू शकतो.
हार्वर्ड विद्यापीठाच्या टी.एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की एखादी व्यक्ती साखर असलेल्या पेयांचं जितकं जास्त सेवन करेल तितका जास्त धोका त्या व्यक्तीला असतो.
या अभ्यासात 37,000 हून जास्त पुरूष आणि 80,000 जास्त स्त्रियांचा समावेश होता.
"आठवड्यातून एकदा साखरयुक्त पेयांचं (यात कार्बोनेटेड आणि नॉन कार्बोनेटेड दोन्हींचा समावेश होतो) सेवन केलं तर 1% धोका वाढतो. दोन ते सहा वेळा प्यायलं तर 6% धोका वाढतो, दर दिवशी एक-दोन वेळा प्यायलं तर 14% टक्के धोका वाढतो आणि दिवसाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त सॉफ्टड्रिंक्सचं सेवन केलं तर तब्बल 21 टक्क्यांनी धोका वाढतो," हार्वर्ड विद्यापीठाच्या न्युट्रिशन विभागातल्या अभ्यासक आणि या अभ्यासाच्या मुख्य लेखक वासंती मलिक सांगतात.
जगभरात शीतपेय सेवनाचं प्रमाण
साखर असलेली शीतपेयं पिण्याचा आणि हृदयरोगाने अवेळी मृत्यू होण्याचा जवळचा संबंध आहे. तसंच अशी पेयं प्यायल्यामुळे कॅन्सर होण्याचा धोकाही असतो असंही या अभ्यासात असंही दिसून आलं आहे.
ही चिंताजनक बाब आहे कारण जगभरात शीतपेयांचं सेवन करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. यूरोमॉनिटर इंटरनॅशनल या मार्केट रिसर्च करणाऱ्या संस्थेनुसार शीतपेय सेवनाची जागतिक सरासरी 2018 साली प्रतिवर्षी, प्रतिव्यक्ती 91.9 लीटरवर पोचली. हाच आकडा पाच वर्षापूर्वी 84.1 एवढा होता.
हार्वर्ड येथील अभ्यासकांच्या मते डाएट (साखर कमी असलेली) सॉफ्टड्रिंक्स पिण्याने धोका कमी होतो तरीही अशी शीतपेये पिणाऱ्यांची संख्या कमी आहे. सॉफ्टड्रिंक्सच्या बाजारात त्यांच्या टक्का अगदीच कमी आहे. डाएट सॉफ्टड्रिंक्सचा खप प्रतिवर्षी, प्रतिव्यक्ती फक्त 3.1 लीटर आहे.
कोणकोणत्या देशांना सर्वाधिक धोका?
चीनमध्ये सॉफ्टड्रिंक्स सेवनाची सरासरी प्रतिदिवशी प्रतिव्यक्ती एक लीटर आहे.
अर्थात सॉफ्टड्रिंक्समध्ये काय काय समाविष्ट होतं याची यादी मोठी आहे, आणि त्यात बाटलीबंद पाण्याचाही समावेश होतो.
पण 'ग्लोबल डेटा' या डेटा अॅनॅलिटिक्स कंपनीच्या डेटानुसार चीनमध्ये बाटलीबंद पाण्याचं सेवन 2017 मध्ये प्रतिव्यक्ती प्रतिवर्षी फक्त 30.8 लीटर होतं पण एकंदरीत शीतपेयांचं सेवन मात्र प्रतिव्यक्ती, प्रतिवर्षी 410.7 लीटर आहे.
त्या खालोखाल अमेरिकेचा नंबर लागतो. तिथे सॉफ्टड्रिंक्सचं सेवन मात्र प्रतिव्यक्ती, प्रतिवर्षी 356.8 लीटर आहे तर स्पेन, सौदी अरेबिया आणि अर्जेंटिनामध्ये ते अनुक्रमे 267.5, 258.4 आणि 250.4 एवढं आहे.
कॅलरी मोजायला हव्यात
लॅन्सेट या वैद्यकीय क्षेत्राला वाहिलेल्या मासिकात 2015 साली प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार अमेरिकन लोक प्रतिदिवशी साखर असलेल्या शीतपेयांतून 152 कॅलरीज मिळवतात. या कॅलरीज एका कोकाकोलाच्या कॅनमधल्या शीतपेयात असणाऱ्या कॅलरीपेक्षा थोड्याच जास्त आहेत.
एका 330 मिली कोकाकोलाच्या कॅनमध्ये 35 ग्रॅम साखर असते असा उल्लेख कंपनीच्या वेबसाईटवर आहे. हे प्रमाण 7 चमचे साखरेएवढं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सुचनेनुसार दिवसाला 50 ग्रॅमपेक्षा जास्त साखर घ्यायला नको.
पण तरीही शीतपेयातून कॅलरी घेण्याच्या बाबतीत अमेरिका सर्वोच्च स्थानी नाही. त्यावेळी चीनची सरासरी प्रतिव्यक्ती, प्रतिदिवशी 188 कॅलरी एवढी होती. अर्थात त्यावेळेस चीनने आपला शुगर टॅक्स लागू केला नव्हता. या करामुळे चीनमधल्या शीतपेयांचं सेवन 21 टक्के कमी झालं होतं .
जगातल्या जवळपास 30 देशांनी साखर असलेल्या सॉफ्टड्रिंक्सवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कर लावला आहे, ज्याला शुगर टॅक्स असंही म्हणतात. म्हणूनच तज्ज्ञांना असं वाटतं की या अभ्यासाने आणखीही काही देशांना अशाप्रकारचे उपाययोजना करण्याची प्रेरणा मिळेल.
"या अभ्यासातून जे निष्कर्ष निघालेत त्यातून लहान आणि किशोरवयीन मुलांना अतिरिक्त साखर असलेल्या शीतपेयांकडे आकर्षित करण्यासाठी जाहिराती करू नयेत यासारख्या धोरणांना चालना मिळेल. तसंच सॉफ्ट ड्रिंक्सवर, सोड्यावर कर लावावा या विचारालाही बळकटी मिळेल कारण सध्याच्या शीतपेयांच्या किंमतीत त्यापासून होणाऱ्या आजारांच्या उपचारांचा खर्च समाविष्ट नाही," हार्वर्ड विद्यापीठातले रोगांचा उगम, प्रसार आणि उपचार या विषयाचे तज्ज्ञ तसंच न्युट्रिशनिस्ट असणारे वॉल्टर विलेट सांगतात.
लहान आणि किशोरवयीन मुलांवर त्यांचे होणारे वाईट परिणाम म्हणजे सॉफ्टड्रिंक्सच्या बाबतीत सगळ्यात चिंताजनक बाब आहे.
WHO च्या आकडेवारीनुसार 5 ते 19 या वयोगटातल्या मुलांमधल्या लठ्ठपणाचं प्रमाण 1975 मध्ये एक कोटी दहा लाख होतं ते 2016 मध्ये 12 कोटी 40 लाख एवढं झालं आहे.
पण साखरयुक्त शीतपेयांच्या अतिसेवनाचे फक्त लठ्ठपणाच नाही तर इतरही अनेक परिणाम असू शकतात असं या अभ्यासातून समोर आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)