जिथं खासदार सार्वजनिक बसनं प्रवास करतात आणि अत्यंत छोट्या घरात राहतात

या स्कॅण्डेनेव्हियन देशातल्या लोकप्रतिनिधींची साधी राहणी हेच इथल्या राजकारणाचं वैशिष्टयं आहे.

राजकीय कारकीर्द ही आर्थिकदृष्ट्या भरपूर फायद्याची ठरू शकते, पण स्वीडनमध्ये नक्कीच नाही.

इथले लोकप्रतिनिधी ज्या साधेपणाने आपलं काम करतात तो साधेपणाच या स्कॅण्डेनेव्हियन देशाच्या राजकारणाचं वैशिष्ट्यं आहे.

भरपूर भत्ते आणि विविध फायदे मिळण्याऐवजी स्वीडीश खासदारांना करदात्यांचा पैसा वापरताना अनेक कठोर मर्यादांचं पालन करावं लागतं.

सामान्य नागरिक

"आम्ही सामान्य नागरिक आहोत," सोशल-डेमॉक्रॅटिक पार्टीचे खासदार पर-अर्नी हकान्सन यांनी बीबीसी न्यूज ब्राझीलशी बोलताना सांगितलं.

"खासदारांना विशेष अधिकार देण्यात काही अर्थ नाही कारण आमचं काम लोकांचं प्रतिनिधित्त्व करण्याचं आणि त्यांच्या वास्तविक आयुष्याचं प्रतिनिधित्व करण्याचं आहे."

"उलट हे काम करायला मिळणं आणि देशाच्या प्रगतीला दिशा देण्याला हातभार लावता येणं हेच आमच्यासाठी विशेष आहे," हकान्सन पुढे म्हणतात.

स्वीडीश खासदारांना सावर्जनिक वाहतूक व्यवस्था मोफत वापरता येते. पण जगभरातील इतर अनेक खासदारांप्रमाणे त्यांना सरकारतर्फे स्वतःच्या गाड्या आणि ड्रायव्हर देण्यात येत नाहीत.

त्यांच्या संसदेमध्ये फक्त तीन वोल्व्हो एस80 आहेत. आणि या लहानशा ताफ्याचा वापर हा फक्त अधिकृत कार्यक्रमांच्यावेळी संसदेचे अध्यक्ष आणि तीन उपाध्यक्षांनाच करता येतो.

पगार

"आम्ही इथं काही टॅक्सी सेवा चालवत नाही," संसदेच्या अधिकारी रेने पोअडके सांगतात.

"'लोकांना घरी किंवा कामावर घेऊन जाण्यासाठी आमच्याकडे गाड्या नाहीत."

प्रत्यक्षात स्वीडनमध्ये ज्या एकमेव खासदाराला कायमस्वरूपी गाडी देण्यात आलेली आहे, ते आहेत देशाचे पंतप्रधान.

स्वीडीश खासदारांना जवळपास 6,900 डॉलर्स पगार मिळतो. हा आकडा अमेरिकन खासदारांना मिळणाऱ्या 14,000 डॉलर्स पगाराच्या निम्मा आहे.

स्वीडनमध्ये दरमहा मिळणारा सरासरी पगार 2,800 डॉलर्स प्रति महिना आहे.

आर्थिक लाभ

ज्या खासदारांचे मतदारसंघ हे स्टॉकहोमच्या बाहेर आहेत त्यांना "ट्रॅक्टमेंट" नावाचा भत्ता मिळू शकतो. राजधानीमध्ये येऊन जितके दिवस काम केलं, त्यासाठी हा भत्ता मिळतो.

पण किती? तर सुमारे 12 डॉलर प्रति दिवस. इतक्या रकमेत स्टॉकहोममध्ये फक्त साधं जेवण मिळू शकेल.

1957 पर्यंत स्वीडीश खासदारांना तर पगारही मिळत नसे. त्याऐवजी पक्ष सदस्य खासदारांना आर्थिक मदत करत.

नागरिकांनी राजकारणात येणं टाळू नये म्हणून मग खासदारांना पगार देण्याची सुरुवात करण्यात आल्याचं संसदेच्या जुन्या कागदपत्रांत म्हटलं आहे. पण हे पगार भरघोस असावेत अशी स्वीडीश नागरिकांची अपेक्षा नव्हती.

जगभरातील इतर अनेक संसदपटूंप्रमाणे स्वीडीश खासदारांना कमी पैशांमध्ये राहायची सुविधा मिळते.

पण ही सुविधा फक्त त्यांनाच मिळते, जे मुळचे स्टॉकहोमचे नाहीत.

सिंगल बेड्स

आणि हो त्यांची घरं अत्यंत साधी असतात. उदाहरणार्थ पर-अर्नी हकान्सन हे 46 चौरस मीटरच्या घरात राहतात.

काही सरकारी घरं तर फक्त 16 चौरस मीटरची आहेत.

शिवाय या घरांमध्ये वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशर यासारखी उपकरणं नाहीत. या घरात फक्त एक पलंग (सिंगल बेड) देण्यात येतो.

करदात्यांचा पैसा हा फक्त खासदारांपुरताच वापरण्यात येतो. त्यांचे सोबती आणि कुटुंबाला या घरांमध्ये अगदी एका रात्रीपुरतं राहण्यासाठीही पैसे द्यावे लागतात. जर एखाद्या खासदाराला या घरात त्याच्या सोबत्यासोबत रहायचं असेल तर तिला वा त्याला अर्धा भत्ता पुन्हा सरकारी तिजोरीत जमा करावा लागतो.

ठराविक भाडे

"त्या घरामध्ये संसदपटूशिवाय इतर कोणी राहत असेल तर त्याचा आर्थिक भार आम्ही सोसणार नाही," संसदेच्या अधिकारी ऍना ऍस्पग्रेन सांगतात.

दुसरीकडे राहून संसदेकडून मिळणारा भत्ता तेथील भाडं भरण्यासाठी वापरण्याचा पर्याय संसदपटूंकडे असतो. पण दरमहिना 820 डॉलर्स या भत्त्यातून मिळू शकतात. स्टॉकहोमच्या मध्यवर्ती भागांमध्ये असणाऱ्या घरभाड्यांच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे.

1990च्या दशकापर्यंत तर यापेक्षा जास्त काटकसर करण्यात येई. कमी पैशांमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध नव्हती आणि खसादारांना त्यांच्या कार्यालयांमध्येच मुक्काम करत. ही कार्यालयं साधरणपणे 15 चौरस मीटर्सची असत.

स्वीडीश खासदारांना खासगी सचिव किंवा सल्लागार नेमण्यावरही बंदी आहे. त्याऐवजी संसदेमध्ये प्रतिनिधी असणाऱ्या राजकीय पक्षांना काही लोकांची नेमणूक करण्यासाठी भत्ता मिळतो. हे लोक सगळ्या पक्षांच्या खासदारांसाठी काम करतात.

बिनपगारी काम

स्वीडनच्या प्रादेशिक राजकारणामध्ये तर याही पेक्षा जास्त काटकसर केली जाते.

राजकारणामध्ये सहभागी होणं हे मुख्य नोकरीधंद्याच्या जोडीने करायची गोष्ट मानली जाते. स्थानिक विधानसभांमधील 94% पेक्षा जास्त प्रतिनिधी हे बिन पगारी काम करतात. कार्यकारी समितीमध्ये काम करणारे राजकारणी याला अपवाद आहेत. त्यांना अर्धवेळ वा पूर्णवेळ काम करण्याबद्दल पगार मिळतो.

स्टॉकहोमच्या सिटी काऊन्सिलर क्रिस्टीना एलफर्स -हर्दीन यामागचा हेतू काय आहे ते सांगतात.

"हे स्वेच्छेने करायचं काम आहे जे रिकाम्या वेळात करता येणं अगदी शक्य आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)