You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांचा ब्रिटन दौरा लंडनच्या महापौरांसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे तीन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्याची सुरुवात त्यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेऊन केली. यावेळी ट्रंप यांची पत्नी मेलानिया ट्रंपही उपस्थित होत्या.
डोनाल्ड ट्रंप आणि मेलानिया ट्रंप यांचं बकिंगहॅम पॅलेसमध्ये औपचारिक स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यासाठी एक छोटेखानी भोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला गेला. भोजनासाठी तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ होते. ट्रंप यांच्यासोबत भोजनासाठी प्रिन्स चार्ल्सही उपस्थित होते.
दरम्यान ट्रंप यांनी ट्वीट करून 'लंडनचा दौरा खूप छान सुरू आहे,' असं म्हटलं.
त्यांनी पुढे लिहिलं, की राजघराणं अतिशय अगत्यशील आहे आणि अमेरिका-ब्रिटनचं संबंधही मजबूत आहेत.
डोनाल्ड ट्रंप यांनी लंडन दौऱ्याबद्दल अजून एक ट्वीट करताना म्हटलं, की दोन्ही देशांदरम्यान व्यापाराशी संबंधित महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे.
ट्रंप आणि लंडनच्या महापौरांमध्ये वाद
डोनाल्ड ट्रंप यांनी लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर टीका केली होती.
या दौऱ्यापूर्वी डोनाल्ड ट्रंप आणि सादिक खान यांच्यामध्ये 'ट्विटर वॉर' पहायला मिळालं होतं.
ट्रंप यांनी सादिक खान यांच्याबद्दल ट्वीट केलं होतं की, "लंडनचे महापौर म्हणून सादिक खान यांनी अतिशय खराब कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यामुळे ते अतिशय त्रासलेले दिसतात. खरंतर ब्रिटन आणि अमेरिकेचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यांनी माझ्याकडे लक्ष देण्याऐवजी लंडनमधील गुन्हेगारीवर लक्ष द्यायला हवं."
ट्रंप यांच्या स्वागतासाठी पायघड्या घालायची काही गरज नाहीये, असं वक्तव्य सादिक खान यांनीही केलं होतं.
सादिक खान यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांना उद्देशून टिप्पणी केली होती. महिलांसोबत कसं वागायचं यासंबंधी त्याचं हे वक्तव्य होतं.
ट्रंप यांच्या विरोधात आंदोलन
डोनाल्ड ट्रंप आणि मेलानिया ट्रंप सोमवारी जेव्हा लंडनला पोहोचले, तेव्हा त्यांची राहण्याची व्यवस्था सेंट्रल लंडनमध्ये असलेल्या अमेरिकन राजदूतांच्या निवासस्थानी करण्यात आली होती.
ब्रिटनमधील अनेक शहरांमध्ये ट्रंप यांच्या दौऱ्याचा निषेध करण्यासाठी आंदोलनं करण्यात आली आहेत. लंडन, मँचेस्टर, बेलफास्ट तसंच बर्मिंगहॅम शहरांत ट्रंपविरोधी आंदोलनं केली गेली.
मजूर पक्षाचे नेते जेरेमी कोरबिन यांनी सरकारनं ट्रंप यांच्यासाठी आयोजित भोजनाच्या कार्यक्रमात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर जेरेमी लंडनमध्ये होणाऱ्या ट्रंपविरोधी आंदोलनात भाग घेऊ शकतात, भाषणही करू शकतात असं मजूर पक्षाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.
डोनाल्ड ट्रंप आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे मंगळवारी हवामान बदल आणि चिनी कंपनी हुवैई संदर्भात चर्चा करू शकतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)