You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेचा मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी 6 हजार 884 कोटीचा निधी
पेंटागॉनने अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याठी 1 बिलियन डॉलरचा (6884 कोटी 85 लाख) निधी मंजूर केला आहे. पेंटागॉनने त्यासंबंधी एक निवेदन जारी केलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या मुद्द्यावर अमेरिकेत आणीबाणी जाहीर केल्यानंतर हा पहिला मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अमेरिकन संसदेला बाजूला सारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी ही भिंत बांधण्याचं आश्वासन ट्रंप यांनी दिलं होतं.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. 91 किमीची भिंत घालण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या सीमेवरचा प्रश्न एखाद्या संकटासारखा असल्याचं ट्रंप यांचं मत आहे. अमेरिकेत येणाऱ्या गुन्हेगारांना रोखण्यासाठी एखादी पक्की सीमा असावी असा ट्रंप यांचा कायमच आग्रह होता.
पेंटागॉनने जारी केलेल्या एका निवेदनात सांगितलं की, "संरक्षण विभागाला रस्ते आणि सीमा बांधण्याचा आणि ड्रग्सची तस्करी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेवरचा मार्ग बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे." अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं या निवेदनात पुढे म्हटलं आहे.
याच निधीत एक अठरा फूट उंच पादचारी सीमा बांधली जाणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी तक्रार केली आहे की हा निर्णय घेण्याआधी त्यांनी योग्य त्या परवानग्या घेतल्या नाहीत. अमेरिकेच्या संरक्षण सचिवांना एक पत्र लिहून त्यांनी निषेध व्यक्त केल्याची बातमी CNN ने दिली आहे.
संसदेने या भिंतीसाठी निधी देण्यास नकार दिल्यावर ट्रंप यांनी 15 फेब्रुवारीला आणीबाणी घोषित केली होती. आणीबाणी घोषित केल्यामुळे त्यांना संसदेची परवानगी टाळता आली आणि हे काम लष्कराला दिलं.
डेमोक्रॅटिक पक्षाने हा सगळा प्रकार राज्यघटनेची पायमल्ली करणारा असल्याची टीका केली. यासंदर्भात ट्रंप यांनी या महिन्याच्या सुरुवातीला अध्यादेश काढला होता. संसदेला या अध्यादेशावर स्थगिती आणण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. पण त्याची शक्यता कमी आहे असं पत्रकारांना वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)