वर्ल्ड कप: बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर सनसनाटी विजय

अफलातून सांघिक कामगिरीच्या बळावर बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला नमवण्याची किमया केली. याआधी 2007 मध्ये वेस्ट इंडिज इथं झालेल्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने आफ्रिकेला हरवलं होतं. एक तप कालावधीनंतर बांगलादेशने हा पराक्रम करत यंदाच्या वर्ल्ड कप मोहिमेची दणक्यात सुरुवात केली.

शकीब अल हसन आणि मुशफकीर रहीम यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर बांगलादेशने 330 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 305 धावांतच आटोपला.

क्विंटन डी कॉक आणि एडन मारक्रम यांनी 49 धावांची सलामी दिली. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात क्विंटन बाद झाला. शकीबने मारक्रमला त्रिफळाचीत केलं.

कर्णधार फॅफ डू प्लेसिसने 53 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह 62 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र मेहदी हसन मिराझच्या फिरकीसमोर फॅफला चकवलं. हशीम अमलाच्या जागी संधी मिळालेल्या डेव्हिड मिलरने 38 धावा केल्या. व्हॅन डर डुसेने 38 चेंडूत 41 धावांची खेळी करत आफ्रिकेच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.

फटकेबाजीसाठी प्रसिद्ध अँडिले फेलुकवायो 8 धावा करून बाद झाला. ख्रिस मॉरिस फक्त 10 धावा करू शकला. जेपी ड्युमिनीने 37 चेंडूत 45 धावा करत आफ्रिकेच्या आशा पल्लवित केल्या. मात्र मुस्ताफिझूर रहमानने त्याला त्रिफळाचीत केलं.

बांगलादेशतर्फे मुस्ताफिझूरने 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सैफुद्दीनने 2 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी बांगलादेशने वनडे क्रिकेटमधील त्यांच्या सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय बांगलादेशच्या पथ्यावर पडला.

तमीम इक्बाल आणि सौम्या सरकार यांनी 60 धावांची वेगवान सलामी दिली. पंधरा धावांच्या अंतरात हे दोघेही बाद झाले. सौम्याने 42 तर तमीमने 16 धावा केल्या. यानंतर शकीब अल हसन आणि मुशफकीर रहीम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली.

बांगलादेशच्या या अनुभवी फलंदाजांनी खेळपट्टीचा नूर ओळखत आफ्रिकेच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं. या दोघांच्या भागीदारीदरम्यान प्रत्येक ओव्हरमध्ये चौकाराची पखरण होत होती. हे दोघं खेळत असताना बांगलादेशचा संघ साडेतीनशेचा टप्पा गाठणार असं चित्र होतं.

इम्रान ताहीरने शकीबला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. शकीबने 8 चौकार आणि एका षटकारासह 75 धावांची खेळी केली. मोहम्मद मिथुनने 21 चेंडूत 21 धावांची खेळी केली. बांगलादेशचा भरवशाचा फलंदाज मुशफकीरला अँडिले फेलुकवायोने फसवलं.

मुशफकीरचा षटकार मारण्याचा प्रयत्न व्हॅन डर डुसेच्या हातात जाऊन विसावला. मुशफकीरने 8 चौकारांसह 78 धावांची खेळी केली. शकीब आणि मुशफकीर या दोन खेळपट्टीवर स्थिरावलेल्या फलंदाजांना बाद करत दक्षिण आफ्रिकेने पुनरागमनाचे संकेत दिले.

महमदुल्ला आणि मोसादेक हुसैन यांनी सहाव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. मोसादेकने 4 चौकारांच्या साथीने 20 चेंडूत 26 धावा केल्या.

महमुद्ललाने 3 चौकार आणि एका षटकारासह 33 चेंडूत 46 धावांची नाबाद खेळी केली. बांगलादेशने 330 धावांची मजल मारली. वनडे क्रिकेटमधली बांगलादेशची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

दक्षिण आफ्रिकेतर्फे फेलुकवायो, ताहीर आणि ख्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या. वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी चार षटकांनंतर दुखापतग्रस्त होऊन तंबूत परतल्याने दक्षिण आफ्रिकेला फटका बसला.

वनडे क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 250 विकेट्स अशी कामगिरी करणारा शकीब सगळ्यात वेगवान खेळाडू ठरला आहे. याआधी सनथ जयसूर्या, शाहिद आफ्रिदी, जॅक कॅलिस आणि अब्दुल रझ्झाक यांनी अशी कामगिरी केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)