You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरियाच्या तरुणींचं अपहरण करून चीनमध्ये विक्री- रिपोर्ट
नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटलंय की दर वर्षी उत्तर कोरियातल्या हजारो मुलींना जबरदस्तीने देहव्यापारात ढकललं जातं.
त्यांची तस्करी करून त्यांना चीनमध्ये देहव्यापारासाठी आणलं जातं.
लंडनमधल्या कोरिया फ्युचर इनिशिएटिव्ह या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटलंय की उत्तर कोरियाच्या महिला आणि मुलींचं अपहरण करून त्यांना वेश्या म्हणून चीनमध्ये विकलं जातं.
या तरूणींना चिनी पुरुषांबरोबर लग्न करायला भाग पाडलं जातं असंही त्या अहवालात लिहिलं आहे.
यानुसार चीनमधल्या गुन्हेगारी टोळ्या 'सेक्स ट्रेड' मध्ये सक्रिय आहेत आणि या देहव्यापाराची उलाढाल वर्षाला 10 कोटी डॉलर्स एवढी आहे.
उत्तर कोरियातल्या या महिलांना सेक्स ट्रेडमधून बाहेर पडण्याचा रस्ताही नाही, कारण जरी चीनने त्यांना परत पाठवलं तरी मायदेशी परतल्यानंतर त्यांना अत्याचारांचा सामना करावा लागतो. तिथेही त्यांचं शोषण होतं.
गुलामांसारखी वागणूक
या अहवालाचे लेखक योन ही-सोन यांचं म्हणणं आहे की, "तरुण मुलींना फक्त 30 युआनसाठी (चिनी चलन) वेश्या बनवलं जातं. 1000 युआनच्या बदल्यात त्यांना बायको म्हणून विकलं जातं."
उत्तर कोरियाच्या महिलांना चीनच्या उत्तर-पूर्वेला असणाऱ्या जिल्ह्यांमधल्या वेश्यागृहांमध्ये ठेवलं जातं. या भागात स्थलांतरित कामगारांची संख्या जास्त आहे.
लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या मुलींचं वय 8-9 वर्ष इतकं कमी असतं. त्यांना वेबकॅमवरून लांब कुठेतरी असणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहचवलं जातं. त्यातले बहुतांश ग्राहक दक्षिण कोरियातले आहेत असं म्हटलं जातं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)