You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जिवंत पुरलेल्या बाळाला कुत्र्यानं काढलं शोधून
कुत्रा हा मानवाचा सर्वांत जवळचा मित्र आहे असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय हा वेळोवेळी येताना दिसतो. पण त्याही पुढे जाऊन एका कुत्र्याने एका छोट्या बाळाला जीवदान देण्याचं काम थायलंडमध्ये 2019 मध्ये केलं होतं.
त्याचं झालं असं की, थायलंडमध्ये बान नाँग खाम या गावात एका 15 वर्षांच्या मुलीला बाळ झालं. ते बाळ तिला नकोसं होतं. कुणाला कळायच्या आत त्या अविवाहित मातेनं ते बाळ जिवंत पुरलं.
जेव्हा तिनं ते बाळ पुरलं तेव्हा पिंग पाँग या कुत्र्यानं पाहिलं. ती मुलगी तिथून गेल्यानंतर तो कुत्रा भुंकू लागला आणि त्याने जमीन उकरायला सुरुवात केली.
कुत्रा काहीतरी वेगळं करतोय याची जाणीव त्याच्या मालकाला झाली आणि तो तिथं पोहोचला. त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की जमिनीत काहीतर पुरलंय. तितक्यात त्या मालकाला त्या बाळाचे पाय दिसले.
मग पिंग पाँगचे मालक उसा निसायका यांनी त्या बाळाला जमिनीतून वर काढलं आणि रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांनी त्या बाळाला स्वच्छ केलं. हे बाळ पूर्णपणे निरोगी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
पिंग पाँग एका पायाने अधू आहे. एका अपघातात त्याने पाय गमावला. निसायका सांगतात की "पिंग पाँगचा पाय जाऊनही मी त्याला माझ्याजवळ ठेवलं कारण तो प्रामाणिक, आज्ञाधारक आणि प्रेमळ आहे. मी जेव्हा गुरं चारायला जातो तेव्हा माझी मदत करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. त्याच्यावर पूर्ण गाव प्रेम करतं."
त्या बाळाच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाला सोडून देण्याचा तसेच त्याच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा तिच्यावर नोंदवण्यात आल्याचं थायलॅंडच्या पोलिसांनी सांगितलं.
चुम फुआंग या पोलीस स्टेशनचे अधिकारी पानुवत पुत्तकम यांनी बॅंकॉक पोस्टला सांगितलं की, त्या बाळाची आई सध्या मनोविकारतज्ज्ञांच्या निगराणीत आहे. तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. त्या बाळाचं संगोपन करण्याची तयारी त्या बाळाच्या आजी-आजोबांनी म्हणजेच किशोरवयीन मातेच्या पालकांनी दर्शवल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)