You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मरणाच्या दारातून पुन्हापुन्हा परत आलेल्या एका पोपटाची असामान्य जीवनगाथा
- Author, फर्नांडो डुआर्ट
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
फ्रेडी क्रुएगर... आहे पोपट... पण त्याचं आयुष्य एखाद्या हॉलीवुड फिल्मच्या कथानकाला शोभावं असंच.
16 एप्रिलला ब्राझिलच्या कॅसकॅवल शहरातल्या प्राणीसंग्रहालयातून फ्रेडीला सशस्त्र चोरांनी चोरून नेलं. मात्र, घटनेच्या तीनच दिवसांनंतर तो त्याच्या पिंजऱ्याजवळ आढळला. या पिंजऱ्यात तो गेली चार वर्ष राहत होता.
ज्यावेळी चोरट्यांनी फ्रेडीला चोरलं त्यावेळी प्राणीसंग्रहालयातल्या उपचार केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच फ्रेडीला साप चावला होता आणि तो अगदी मरणासन्न अवस्थेला होता.
मात्र, फ्रेडीच्या धैर्याची कथा इथेच संपत नाही.
प्राणीसंग्रहालयात येण्याआधी तो अंमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीत होता. (तो एका ड्रग डीलरचा पोपट होता. पोलीस आले की आपल्या मालकाला पूर्वसूचना देणं हे त्याचं काम होतं.)
2015 साली ड्रग माफियांविरोधातल्या एका पोलीस कारवाईत फ्रेडीच्या उजव्या डोळ्याखाली गोळी लागली. त्यात त्याचा चेहरा विद्रुप झाला आणि तेव्हा त्याला फ्रेडी क्रुएगर हे नाव मिळालं. Nightmare on Elm Street या सिनेमात विद्रुप चेहऱ्याचा एक खलनायक आहे. त्याच्याच नावावरून हे नाव ठेवण्यात आलं.
गोळी लागल्याने त्याचा उजवा डोळा निकामी झाला आणि चोचीलाही जखम झाली.
मात्र, तरीही तो अगदी सामान्य पोपटांसारखाच होता. चोचीला मार लागूनही तो चोचीने बिया काढून फळं खायचा.
भरपूर पैसा मिळवून देणारी बेकायदा तस्करी
फ्रेडीचा चेहरा विद्रुप आहे, हे लक्षात आल्यावर चोरट्यांनीच त्याला सोडून दिलं असणार, असा पोलिसांचा अंदाज आहे.
"त्याला विकणं कठीण असेल. शिवाय, त्याला ओळखणंही सोपं होतं", असं प्राणीसंग्रहालयाचे संचालक इलेअर डेट्टोनी यांनी सांगितलं.
ब्राझीलमध्ये प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते.
प्राण्यांच्या तस्करीविरोधात काम करणाऱ्या रेन्टॅक्ट या स्वयंसेवी संस्थेतल्या अभ्यासकांच्या मते ब्राझीलमध्ये दरवर्षी तब्बल 3 अब्ज डॉलरची बेकायदा प्राणी तस्करी होते.
"फ्रेडी सुदैवी आहे की दुर्दैवी, हे मी अजून ठरवू शकलेलो नाही", असं डेट्टोनी सांगतात.
क्लिनिकजवळ माणसाच्या रक्ताचे थेंब आढळल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे फ्रेडी सहजासहजी चोरट्यांच्या हातात सापडला नसेल, त्याने झुंज दिली असावी, असा त्यांचा अंदाज आहे.
पर्यटन वाढण्याची आशा
डेट्टोनी सांगतात, "फ्रेडी तसा रागीट स्वभावाचा आहे आणि त्यामुळे कुणी त्याच्या वाटेला जात नाही."
फ्रेडीला या प्राणीसंग्रहालयात आणलं तेव्हापासूनच तो तापट होता. इतर पक्षांशी त्याची झडप व्हायची. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच त्याला स्वतंत्र पिंजऱ्यात ठेवण्यात आलं होतं.
"त्याने एका पोपटाला जवळजवळ ठार केलं होतं", ते सांगतात.
कॅसकॅवल शहरात पक्षांच्या तस्करीची ही काही पहिलीच घटना नाही.
या संग्रहालयातून सुसर आणि इतर पोपटांचीही चोरी झाली आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी संग्रहालयाकडे निधी नाही.
या संग्रहालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. शिवाय 18 हजार चौरस मीटरवर पसरलेल्या आणि 340 प्राणी असलेल्या या संग्रहालयाच्या सुरक्षेसाठी एकावेळी केवळ तीनच सुरक्षा रक्षक असतात.
ज्या रात्री चोरी झाली त्यावेळी प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे दोन गार्ड सुटीवर होते. त्या रात्री फ्रेडीसह आणखी एक पोपट आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचीही चोरी झाली होती. दुसऱ्या पोपटाचा अजून शोध लागलेला नाही.
प्राणीसंग्रहालयाचे संचालक डेट्टोनी म्हणतात, "फ्रेडीमुळे प्राणीसंग्रहालयातल्या कामात लोकांचा रस वाढेल आणि अधिकाधिक पर्यटक या प्राणीसंग्रहालयाला भेट देतील, अशी आम्हाला आशा आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
....