रडारची कुळकथा: जेव्हा रडारमुळं हिटलरचा पराभव झाला होता...

    • Author, फिलिप सिम
    • Role, टायसाइड आणि सेंट्रल रिपोर्टर, बीबीसी स्कॉटलँड

गेले दोन दिवस इंटरनेटवर रडारची चर्चा सुरू आहे. पण या तंत्रज्ञानाच्या इतिहासात डोकावलं तर अनेक आश्चर्यकारक घटना वाचायला मिळतात. अनेक युद्धांचं पारडं रडारमुळं बदललं आहे.

गेल्या अनेक दशकांमध्ये जगभरात विकसित झालेल्या रडार तंत्रज्ञानाचा पाया सर रॉबर्ट वॅटसन-वॅट यांनी घातला. इंग्लंडला या तंत्रज्ञानाची पहिल्यांदा मदत बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये झाली. आणि साधारणतः आठ दशकांपूर्वी याच रडारमुळे हिटलरचा पराभव झाला होता.

रडार हे डार डिटेक्शन अँरेंजिंगचं लघुरूप. आज आकाशात प्रवासी विमानं कुठून कुठे चालली आहेत, यावर या तंत्रज्ञानाद्वारे लक्ष ठेवून प्रवाशांची सुरक्षितता पाहिली जाते. पण दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या विमानांची हालचाल टिपण्यासाठी याचा वापर करण्यात आला होता.

बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये इंग्लंडच्या रॉयल एअरफोर्सने जर्मनीच्या 'लुफ्तवाफं' विमानांना रडारच्या मदतीने जेरीस आणलं होतं.

सर रॉबर्ट वॅटसन वॅट कोण होते?

रॉबर्ट वॅटसन हे वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटचे वंशज होते. त्यांचा जन्म स्कॉटलंडमध्ये ब्रेचिन येथे झाला.

डंडी येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यावर ते हवामानतज्ज्ञ झाले. हॅम्पशायर परगण्यात फार्नबोरो इथल्या रॉयल एअरक्राफ्ट फॅक्टरीमध्ये त्यांनी रेडिओ लहरींचा अभ्यास करून वादळांचं स्थान शोधण्याचं काम सुरू केलं.

वैमानिकांना आगामी संकटांची चाहूल देण्यासाठी वॅटसन वॅट यांनी 1915 मध्येच रेडिओ लहरी वापरायला सुरुवात केली. ब्रिटिश एअर मिनिस्ट्रीमध्ये काम करत असताना त्यांनी बीबीसीच्या शॉर्ट वेव्ह ट्रान्समिटरमधून सोडून त्या परावर्तित करून पुन्हा मिळवण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्यामुळे रडार प्रणाली तयार होणे शक्य असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

नॉर्दहॅम्प्टशायर मधल्या दावेंट्री इथं या प्रयोगाचं स्मरण करणारी एक पाटीही लावण्यात आली आहे.

महायुद्धापूर्वीच्या काळामध्ये जगभरातील विविध देशांनी स्वतःची रडार प्रणाली तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण सर्वांत विकसित प्रणाली वॅटसन वॅट यांनी तयार केली. बॉडसी रेडिओ स्टेशन 1936 साली सुरू झाल्यानंतर त्यात वेगाने विकास सुरू झाला.

त्यांच्या शास्त्रज्ञांच्या चमूने 100 मैलांपर्यंतच्या विमानांचा वेध घेऊ शकेल इतकी रडार प्रणाली विकसित केली. त्यानंतर या चमूने वेगाने काम करायला सुरुवात केली.

दुसरे महायुद्ध तोंडावर आल्यावर इंग्लंडला रडारवर तंत्रावर वेगानं काम करण्याची गरजच होती. 1937मध्ये इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर पूर्ण क्षमतेची तीन रडार स्टेशन्स तयार झाली होती. तसेच महायुद्धाला तोंड फुटल्यावर इंग्लंडमध्ये अशी 19 स्टेशन्स उभी राहिली होती.

नाझींच्या लुप्तवाफं विमानांची माहिती देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर इंग्लंडला करता आला.

अदृश्य शस्त्र

रॉबर्ट वॅटसन वॅट सोसायटीचे प्रमुख स्टुअर्ट हिल सांगतात, "1938मध्ये या प्रणालीचा वापर झाला असला तरी बॅटल ऑफ ब्रिटनपूर्वीही पूर्ण चाचणी झालेली प्रणाली इंग्लंडमध्ये होती हे फारसं कोणाला माहिती नव्हतं. जर्मन लोकांनाही हे माहिती नव्हतं.

पण जर्मनीला रडार प्रणालीची ओळख होती. 1904मध्ये ख्रिश्चियन हल्समेयर या जर्मन व्यक्तीने अगदी साध्या पद्धतीची रडार प्रणाली तयार केली होती. त्यांनी पहिल्यांदा मोठ्या स्वरूपात वापरल्या गेलेल्या इंग्लंडने तयार केलेल्या डॉडिंग प्रणालीची माहिती त्यांना नव्हती.

वॅटसन वॅट यांनी उभ्या केलेल्या स्टेशन्सच्या साखळीमुळे रडार ऑपरेटर्स नाझी विमानांचं स्थान सांगू लागले. त्याची माहिती रॉयल एअरफोर्सला देण्यात आल्यावर ते तात्काळ जर्मन विमानं पाडू लागले. इंग्लंडच्या या तात्काळ अचूक कारवाईमुळे जर्मन वैमानिक चकीत होत असत.

1942 साली वॅटसन वॅट सर रॉबर्ट झाले. तसेच त्यांच्या चमूला युद्धानंतर रोख बक्षीसही देण्यात आले.

त्यानंतर ते एका उद्योगाची स्थापना करण्यासाठी कॅनडाला गेले. 1973 वयाच्या 81 व्या वर्षी त्यांचा स्कॉटलंडमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)