You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी: भारतातले बहुतांश लोक गरीब, गरिबी हीच माझी जात
लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनभद्र येथे केलेल्या भाषणात आपली जात फक्त गरिबी हीच आहे असं विधान केलं आहे. ही जात भारतातील बहुतांश गरिबांची आहे, तिच माझी आहे असं विधान त्यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या या विधानावर आता नव्याने प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
सोनभद्र येथिल भाषणात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, "त्यांनी (विरोधकांनी) आता मोदींची जात काय असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. मोदींची केवळ एकच जात आहे- जी देशातील सर्व गरिबांची जात आहे. जे लोक स्वतःला गरीब समजतात, मोदी त्यांच्याच जातीचा आहे."
माझं बॅंकेतलं खातं तपासा
नरेंद्र मोदी यांनी आज गाझीपूर येथेही प्रचारसभेला संबोधित केले. गाझीपूर येथील सभेत ते म्हणाले, "मी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधीक काळ राहाणारा व्यक्ती आहे, मी गेली पाच वर्षे पंतप्रधान आहे. माझं बॅंकेतलं खातं तपासा, मोदींच्या नावावर एखादा बंगला आहे का दाखवा, मी कधीही माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी काहीही साठवलं नाही. मी जे केलं ते राष्ट्र आणि आपल्या नागरिकांसाठीच."
गाझीपूरमधील भाषणामध्ये पंतप्रधानांनी अल्वर येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. दोन आठवड्यांपूर्वी दलित समुदायातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यातील गुन्हेगारांना पकडण्याऐवजी राजस्थान सरकार आणि पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत."
हे प्रकरण दडपण्यामागचं कारण सांगताना मोदी म्हणाले, "दलित मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली तर आपल्या मतांवर परिणाम होईल याची काँग्रेसला भीती वाटत होती. आणि हे जे मेणबत्त्या घेऊन बाहेर पडतात त्यांच्या मेणबत्त्यांतून बेईमानीचा धूर बाहेर पडत आहेत. आता ही गँग का गप्प बसली आहे असा प्रश्न मला अवॉर्ड वापसी गँगला विचारायचा आहे."
चारच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती. भारतीय युद्धनौकेचा वापर कौटुंबिक सुटीसाठी वापर त्यांनी केला असा आरोप मोदी यांनी केल्यानंतर देशभरात चर्चेचे एकच वादळ उठले.
INS विराट ही युद्धनौका सागरी सुरक्षेवर तैनात असताना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी लक्षद्वीप इथं सहलीसाठी त्याचा वापर केला. तसंच तिथं कुटुंबीय आणि मित्रांना आरामात राहता यावं म्हणून नौदलाच्या कर्मचाऱ्यांना सेवेसाठी जुंपलं. सहलीवर आलेल्यांसाठी सरकारी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. असं ते म्हणाले होते.
याआधी मोदी यांनी एका रॅलीत म्हटलं होतं की मी मागास जातीतील असल्यामुळे माझ्यावर निशाणा साधला जात आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' आणि 'सभी चोरों का सरनेम मोदी है' या वक्तव्यांविषयी त्यांनी म्हटलं की, "मागास असल्याकारणानं आम्हाला अनेकदा अशा अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेकदा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी माझी जात काढली आहे."
"काँग्रेसच्या नेत्यानं पहिल्यांदा 'चौकीदार चोर है' असं म्हटलं. लोक याकडे लक्ष देत नाहीत म्हटल्यावर आता ते विचारत आहेत की, 'ज्यांचं नाव मोदी आहे, ते सर्व चोर का आहेत?' पण आता त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. ते आता संपूर्ण मागास समाजाला चोर म्हणत आहेत," असंही मोदींनी राहुल यांना उद्देशून म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)