नरेंद्र मोदी यांच्या बालाकोट हवाई हल्ला आणि रडारवरील वक्तव्यावर सोशल मीडियावर पडला प्रतिक्रियांचा पाऊस

"बालाकोटमध्ये हवाई हल्ला करण्याच्या दिवशी वातावरण ढगाळ होतं. कारवाई करायची की पुढे ढकलायची याबद्दल संभ्रम होता. मात्र ढगाळ वातावरण, पावसामुळं आपली विमानं पाकिस्तानी रडारपासून वाचू शकतात, असा विचार माझ्या मनात आला आणि मी कारवाई करण्याचा निर्णय घेतला," एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल हे वक्तव्यं केलं.

भाजप आणि गुजरात भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधानांच्या मुलाखतीचा हा भाग ट्वीटही केला गेला. पण या एका विधानावरून पंतप्रधान सोशल मीडियावर ट्रोल व्हायला सुरुवात झाल्यावर भाजप आणि गुजरात भाजपच्या ट्विटर हँडलवरून हे ट्वीट गायब झालं.

पण तोपर्यंत या विधानाचे स्क्रीनशॉट्स आणि व्हीडिओस इतरत्र पोहोचले आहेत आणि त्यांच्यावर पुष्कळ खिल्ली उडवली जात आहे.

भाजपनं हे ट्वीट काढल्यानंतर अनेकांनी या मुलाखतीची क्लिप शेअर करायला सुरुवात केली.

नेमकं काय म्हणाले मोदी?

लोकसभा मतदानाच्या सहाव्या टप्प्याच्या एक दिवस आधी 'न्यूज नेशन' या वृत्तवाहिनीला पंतप्रधानांनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं, "नऊ-साडे नऊच्या सुमारास मी सर्व तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर पुन्हा 12 वाजताही एक आढावा घेतला. हवामान अचानक खराब झाल्यानं आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला होता. तुम्हाला आठवत असेल, त्यादिवशी खूप पाऊस पडला होता."

"या वातावरणात आपण नेमकं करायचं काय, असा विचार आमच्या मनात आला. आपण तारीख पुढे ढकलावी, अशी तज्ज्ञांचं म्हणणं होतं. माझ्या मनात त्यावेळी दोन गोष्टी होत्या - एक म्हणजे मोहिमेची गोपनीयता.

"आणि दुसरं म्हणजे, मी काही या विषयातील तज्ज्ञ नाहीये. पण मला वाटलं की ढग आहेत आणि पाऊसही पडतोय. तर रडार चुकविण्यासाठी आम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. माझी एक साधारण कल्पना होती, की ढगाळ वातावरणाचा आम्हाला फायदा होईल."

मोदी पुढे म्हणाले, "सगळ्यांच्याच मनात संभ्रम होता. पण शेवटी मी म्हटलं की ठीक आहे. ढग आहेत, आपण कारवाई करू. और चल पड़े."

रडार नेमकं काम कसं करतं? 

नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू असताना रडार काम करतं, हे गुगलवर खूप सर्च होत आहे. रडार खरंच ढगांच्या आड असलेल्या वस्तू टिपू शकत नाही का, असा प्रश्न लोकांना या निमित्ताने पडलेला दिसतोय.

रडारचा प्रामुख्याने दोन प्रकारे वापर केला जातो - नागरी सेवांमध्ये जसे की हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी किंवा एअर ट्राफिक कंट्रोलसाठी, आणि लष्करी वापरासाठी.

अगदी सोप्या भाषेत रडारचं काम समजून घेऊ या.

रडारमधून एका ठराविक वारंवारतेचे रेडिओ सिग्नल सोडले जातात. हे सिग्नल एखाद्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन रडारवर परत येऊन आदळतात, आणि या प्रक्रियेदरम्यान लागणाऱ्या वेळ आणि अंतरावरून एखाद्या वस्तूच्या दिशेचा अंदाज घेता येतो. 

आता या प्राथमिक संकल्पनेला उपग्रह आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे संशोधन आणि माहिती मिळवणं अधिकाधिक अचूक झालं आहे.

हवामान अंदाजासाठी वापरल्या जाणाऱ्या रडारमधील रेडिओ सिग्नल हे पाण्याच्या वाफेपासून परावर्तित होतात. त्यामुळेच कुठे किती ढग आहेत, त्या ढगांची दिशा काय आणि कुठे कधी पाऊस होऊ शकतो, असे अंदाज बांधले जातात.

ढगांना धडकून परावर्तित होत असल्यामुळं हवामानासाठी वापरल्या जाणाऱ्या रडारच्या लहरींची तीव्रता ढगांमधून आरपार जाताना कमी होते. त्यामुळे हवामान खात्याचे रडार वेगळेच असतात.

पण लष्करी वापरासाठी वापरले जाणारे रडार तसे नसतात.

अगदी सुरुवातीला रडारचा शोध लागल्यानंतर रडार केवळ ध्वनीलहरींच्या माध्यमातून एअरक्राफ्टची दिशाच शोधायचे. त्यानंतर जसजशी तंत्रज्ञानात प्रगती होत गेली, रडारच्याही आधुनिक आवृत्ती येत गेल्या.

आजचे नवीन तंत्रज्ञानानं युक्त रडार हे एअरक्राफ्टचं मॉडेल, त्यांची दिशा, गती आणि किती उंचीवरून उडत आहे, हेदेखील शोधू शकतात. 

या रडारच्या लहरी स्थायू वस्तूच्या शोधात असतात, जसं की एखाद्या विमानाचं धातू, ज्याला धडकून त्या लहरी परावर्तित होतात आणि त्यातून विमानाचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लष्करी वापरासाठीच्या रडारवर ढगांचा काहीही परिणाम होत नाही. तसं झालं तर एखाद्या विमानाचं स्थान अचूक ओळखता येणार नाही.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

पंतप्रधानांची ही मुलाखत नेमकी 'नॅशनल टेक्नॉलॉजी डे'च्या दिवशीच प्रसिद्ध झाली. 1998 साली पोखरण इथं भारतानं केलेल्या दुसऱ्या अणुचाचणीच्या स्मरणार्थ 10 मे रोजी नॅशनल टेक्नॉलॉजी डे साजरा केला जातो.

अनेकांनी ट्विटरवरून या विरोधाभासाची आठवण करून दिली. टेलेग्राफ वृत्तपत्रानेही या मथळ्यासह ही बातमी प्रसिद्ध केली -

काँग्रेसनं पंतप्रधानांच्या विधानावर टीका करताना पंतप्रधानांनी पाच वर्षांत केलेल्या घोषणाबाजीचा आधार घेतला.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी मोदींच्या विधानावर कडाडून टीका केली.

"मोदींचे शब्द हे अतिशय निंदनीय आहेत. ते भारतीय हवाईदलाचा अपमान करणारे आहेत. वस्तुस्थिती ही आहे की अशाप्रकारचं विधान करणारी व्यक्ती देशदोह्री असू शकते. कोणताही राष्ट्रप्रेमी हे बोलणार नाही," असं ट्वीट येचुरींनी केलं.

जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी भाजपनं पंतप्रधानांचं वक्तव्य ट्विटरवरून डिलीट केल्याबद्दल कोपरखळी मारत म्हटलं, की "ते ट्वीट ढगातच विरलं की काय, असं वाटलं. पण स्क्रीनशॉट उपलब्ध आहे."

काँग्रेसचे प्रवक्ते सलमान सोझ यांनी ट्वीट करून पंतप्रधानांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

"रडार कसं काम करतं हे पंतप्रधानांना कुणी सांगितलेलं दिसत नाहीये. आणि सुरक्षेच्या दृष्टीनं ही गंभीर बाब आहे, हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही," असं सोझ यांनी म्हटलं.

"आता आपणच हे विमान चालवत होतो एवढंच सांगणं बाकी आहे," असं ट्वीट प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलं आहे.

खराब हवामानात एअर स्ट्राईक करण्याची परवानगी देऊन पंतप्रधानांनी आपल्या जवानांचे प्राण धोक्यात घातले," अशा आशयाचं ट्वीटही काही जणांनी केलं आहे.

एकूणच पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

तुम्हाला याविषयी काय वाटतं? आपलं मत इथे नोंदवा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)