You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिंदुजा बंधूंनी पटकावलं ब्रिटनच्या श्रीमंताच्या यादीत सर्वोच्च स्थान
यूकेमधील श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा बंधूंनी तिसऱ्यांदा स्थान पटकावलं आहे. संडे टाइम्सने ही यादी प्रकाशित केली आहे.
श्री आणि गोपी हिंदुजा यांची संपत्ती 1.356 बिलियन पौंडाने वाढली आहे. गेल्या वर्षी त्यांच्या संपत्तीचा आकडा 22 बिलियन पौंड इतका होता.
एका रासायनिक कंपनीचे संस्थापक सर जिम रॅटक्लिफ यांनी या यादीत सर्वोच्च स्थान पटकावलं होतं. आता त्यांचा तिसरा क्रमांक आहे.
वॅलरी मोरन या कृष्णवर्णीय उद्योजिकेने पहिल्यांदाच या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
हिंदुजा ग्रुपची स्थापना 1914 मध्ये झाली. तेल, गॅस, बँकिंग आणि आयटी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला आहे. त्यांच्या व्यवसायाची सुरुवात मुंबई आणि कराचीमध्ये झाली. इराणमध्ये 1919 ला आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी आपला व्यवसाय नेला.
श्री (वय 83) आणि गोपी (79) हे हिंदुजा चार बंधूंपैकी दोन भाऊ लंडनहून कामकाज पाहतात. प्रकाश हे जिनिव्हातून तर अशोक हे भारतातून कंपनीचा कारभार चालवतात. अशोक लेलँड, इंड्सलँड बँक यासारख्या कंपन्यांची मालकी त्यांच्याकडे आहे. मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलही त्यांच्या मालकीचं आहे.
यापूर्वी 2014 आणि 2017 मध्ये श्री आणि गोपी या दोन्ही भावांचं नाव या यादीत झळकलं होतं.
या यादीत 1000 व्यक्तींचा समावेश होतो. जमीन, मालमत्ता किती आहे यावरून ही यादी तयार होते. तसंच विविध कंपन्यांमधील शेअर्स किती आहेत या गोष्टीही लक्षात घेतल्या जातात असं संडे टाइम्सचं मत आहे. लोकांच्या बँक खात्यात असलेला पैसा यात मोजला जात नाही.
डेविड आणि सिमन रिबेन यांनी कार्पेट आणि भंगारातून त्यांचा व्यवसाय उभा केला. त्यांचा या यादीत दुसरा क्रमांक आहे. त्यांची एकूण संपत्ती 18.664 बिलियन डॉलर आहे.
गेल्यावर्षीच्या यादीत सर्वोच्च स्थान पटकावणाऱ्या सर जिम रॅटक्लिफ यांनी आयनिओस केमिकल फर्मची स्थापना केली. त्यांच्या संपत्तीत 9.2 बिलियन पौंडची घट झाली असं या वृत्तपत्राचं म्हणणं आहे.
संडे टाइम्सने जाहीर केलेली श्रीमंतांची यादी 2019 (टॉप टेन)
1)श्री आणि गोपी हिंदुजा (उद्योग आणि फायनान्स) 22 अब्ज पौंड
2)डेव्हीड आणि सायमन रुबेन (प्रॉपर्टी आणि इंटरनेट) 18.7 अब्ज पौंड
3)सर जिम रॅटक्लिफ (रसायन) 18.2 अब्ज पौंड
4)लेन ब्लावाट्निक (गुंतवणूक, संगीत आणि माध्यमं) 14.4 अब्ज पौंड
5)सर जेम्स डायसन अँड फॅमिली (हाऊसहोल्ड गुडस आणि तंत्रज्ञान) 12.6 अब्ज पौंड
6)कर्स्टन आणि जॉर्न राउजिंग (गुंतवणूक) 12.3 अब्ज पौंड
7)शार्लिन डी कार्वालो-हेन्केन- (बँकिंग) 12 अब्ज पौंड
8)अलीशर उस्मानोव्ह- (खाणकाम आणि गुंतवणूक) 11.3 अब्ज पौंड
9)रोमन अब्रामोविच (तेल आणि उद्योग) 11.2 अब्ज पौंड
10)मिखाइल फ्रिडमन (उद्योग) 10.9 अब्ज पौंड
झिम्बाब्वेमध्ये जन्मलेल्या मोरान या यादीमध्ये येणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णिय महिला आहेत. त्या आणि त्यांचे पती नोएल यांची एकत्रित संपत्ती 122 दशलक्ष पौंड असावी. प्रिपेड फायनान्शिअल सर्विसेस या फायनान्शिअल टेक्नोलजी कंपनीमध्ये त्यांचे 81.5 टक्के शेअर्स आहेत. कर्स्टन राऊजिंग आणि त्यांचा भाऊ जॉर्न हे दोघे या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत. त्या दोघांची एकत्रित संपत्ती 12.256 अब्ज पौंड असावी. राऊजिंग कुटुंबाचा टेट्रा पॅक तयार करण्याचा व्यवसाय आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)