You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
थायलंडचे राजा महा वाजिरालाँगकोनची 'बॉडीगार्ड' बनून आलेली महिला झाली राणी
थायलंडचे राजा महा वाजिरालाँगकोन यांनी त्यांच्या खासगी सुरक्षेच्या उपप्रमुख महिलेशी लग्न करून तिला राणीचं पद दिलं आहे. थायलंडच्या शाही परिवारातर्फे एका प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.
2016मध्ये राजा भूमिबोल अद्युल्यदेज यांच्या निधनानंतर महा वाजिरालाँगकोन यांना राजपद बहाल करण्यात आलं होतं. शनिवारी त्यांच्या राज्याभिषेकाची सुरुवात होण्यापूर्वी त्यांच्या या विवाहाच्या घोषणेमुळे थायलंडमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
66 वर्षांचे नियोजित राजा वाजिरालाँगकोन यांचं यापूर्वी तीन वेळा लग्न होऊन तीन घटस्फोट झाले आहेत. त्यांना 7 अपत्य आहेत.
"वाजिरालाँगकोन यांनी सुथिदा यांच्याशी लग्न करायचं ठरवलंय. यापुढे त्याही राणी असतील आणि शाही परिवाराचा एक भाग असतील," असं शाही परिवारानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
सुथिदा या वाजिरालाँगकोन यांच्यासोबत अनेक वर्षांपासून आहेत. हे दोघं अनेकदा सार्वजनिकरीत्या सोबत दिसले आहेत, पण त्यांच्या नात्याविषयी अधिकृत घोषणा झालेली नव्हती.
बुधवारी रात्री उशिरा थाय टीव्हीवर लग्नसमारंभाची काही क्षणचित्रं दाखवण्यात आली. त्यात शाही कुटुंबातील इतर सदस्य आणि सल्लागार उपस्थित होते.
राणी सुथिदा यांच्या डोक्यावर राजा पवित्र पाणी ओतताना दिसत आहेत. यानंतर या जोडप्यानं विवाहाची नोंदणी केली. परंपरा म्हणून राणीला आणि इतरांना यावेळी राजासमोर सजवण्यात आलं होतं.
थाय एयरवेजच्या माजी फ्लाईट अटेंडंट सुथिदा तिजाई यांना राजानं 2014 मध्ये त्यांच्या सुरक्षारक्षक विभागाची उपप्रमुख म्हणून नेमलं होतं. डिसेंबर 2016मध्ये राजाने त्यांना लष्करात जनरल म्हणून नियुक्त केलं.
यापूर्वीचे राजा भूमिबोल अद्युल्यदेज यांनी 70 वर्षं थायलंडवर राज्य केलं. 2016मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते जगातील सर्वांत जास्त काळ राज्य केलेले राजा होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)