You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
थायलंडमध्ये राजाच्या बहिणीला उमेदवारी देणारा विरोधी पक्ष बरखास्त
थायलंडच्या राजे महा वाजिरालाँगकॉर्न यांच्या बहिणीलाच पंतप्रधानपदाची उमेदवारी देणारा विरोधी पक्षच देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं बरखास्त केला आहे. थाय रक्षा चार्ट या पक्षाला माजी पदच्युत पंतप्रधान थकसीन शिनावात्रा यांचा पाठिंबा आहे. 2006 साली थकसीन यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं.
24 मार्चला थायलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. विरोधी पक्षच बरखास्त झाल्यामुळं थकसीन समर्थकांना या निवडणुकीत यश मिळवणं अवघड जाईल, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. सध्या थायलंडमध्ये लष्करी राजवट आहे. पाच वर्षांपूर्वी लष्करानं उठाव करून सत्ता हस्तगत केली होती.
घटनात्मक न्यायालयानं विरोधी पक्ष बरखास्त करताना स्पष्ट केलं की, राजकुमारी उबोलरत्ना यांना नामांकन दिल्यामुळं राजघराण्याची तटस्थता अबाधित राहणार नाही. पक्षाच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांनाही न्यायालयानं राजकारणात सक्रीय रहायला 10 वर्षांची बंदी घातली आहे. हे सदस्य आता निवडणूक लढवू शकणार नाहीत.
राजसत्ता ही राजकारणापेक्षा श्रेष्ठ आहे. राजकीय तटस्थता राखायची असेल तर राजा, राणी आणि राजकुमार-राजकुमारी मतदान करून आपला राजकीय हक्क बजावत नाहीत, असं न्यायाधीश नखारिन मेकतैरात यांनी स्पष्ट केलं.
"राजघराण्यातील उमेदवारामुळे थकसीन यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या पक्ष आणि उमेदवारांना निवडणुकीत निर्णायक लाभ मिळू शकला असता," असं बीबीसीचे बँकॉकमधील प्रतिनिधी जोनाथन हेड यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयामुळं थकसीन समर्थकांची बहुमतानं निवडणूक जिंकण्याची शक्यता धूसर झाल्याचंही बीबीसीच्या प्रतिनिधींनी म्हटलं आहे.
थाई रक्षा चार्ट हा थकसीन समर्थक 'फू थाई' या पक्षाचंच नवीन रुप आहे. अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी थकसीन समर्थकांनी हा पक्ष स्थापन केल्याचं विश्लेषक सांगतात. 2017 मध्ये थायलंडमध्ये नवीन घटना लागू करण्यात आली. या घटनेनुसार प्रत्येक पक्ष किती जागा जिंकू शकतो, यावर काही निर्बंध घालण्यात आले. 2014 मध्ये लष्करी उठावानंतर पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांनी सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच थायलंडमध्ये मतदान होणार आहे.
कोण आहेत राजकुमारी उबोलरत्ना?
उबोलरत्ना थायलंडचे दिवंगत राजे भूमिबोल यांची सगळी मोठी मुलगी आहे. राजा भूमिबोल यांचं 2016 मध्ये निधन झालं होतं. उबोलरत्ना यांचा जन्म 1951 मध्ये झाला. त्यांनी मॅसेच्युसेटास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर 1972 मध्ये एका अमेरिकन व्यक्तीशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी राजघराण्यातील आपल्या पदांचा त्याग केला होता.
घटस्फोटानंतर 2001 मध्ये त्या थायलंडमध्ये परतल्या आणि राजघराण्यातल्या कारभारात पुन्हा लक्ष देऊ लागल्या.
राजकुमारी उबोलरत्ना या सोशल मीडियावर अतिशय सक्रिय आहेत. त्यांना तीन मुलं आहेत. त्यांपैकी एका मुलीचा 2004च्या त्सुनामीमध्ये मृत्यू झाला होता. त्यांची दोन्ही मुलं आणि त्या थायलंडमध्येच राहतात. माजी पंतप्रधान थकसीन चिनावट यांच्या नजीकचा पक्ष मानल्या जाणाऱ्या थाय रक्षा चार्ट पक्षाच्या त्या अधिकृत सदस्य आहेत.
थायलंडमधील राजकीय पेच
2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांच्या लोकशाहीवादी सरकारला उलथवून सध्याचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा हे सत्तेवर आले होते. शिनावात्रा या थकसीन यांच्या लहान बहीण आहेत.
तेव्हापासून थकसीन आणि त्यांची बहीण विजनवासात राहत आहेत, पण तरी थायलंडच्या राजकारणात त्यांचं आजही मोठं महत्त्व आहे आणि देशातील अनेकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे.
2016 मध्ये थायलंडच्या जनतेने लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या एका नव्या राज्यघटनेला मान्यता दिली. सैन्याचा राज्यकारभारात वरचष्मा असेल, अशी तरतूद या नव्या राज्यघटनेत करण्यात आली होती. थकसीन किंवा त्यांच्या कुठलेही विश्वासू नेते थायलंडमध्ये निवडणूक जिंकू शकणार नाही, यासाठी ही तरतूद करण्यात आली होती.
पण आता राजाच्या बहिणीनेच थेट थकसीन यांना समर्थन दिल्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यातच प्रयुथ चान-ओचा यांनीही या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. ते लष्करी राजवटीच्या बाजूने असलेल्या पलांग प्रचारत पक्षातून निवडणूक लढवतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)