श्रीलंका बाँबस्फोट: संशयितांवरील कारवाईदरम्यान स्फोट, 15 जणांचा मृत्यू

श्रीलंका साखळी बाँबस्फोटांच्या तपासादरम्यान संशयित इस्लामिक कट्टरतावाद्यांनी बाँबस्फोट घडवून आणला. या स्फोटात सहा लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या रविवारी ईस्टरच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बाँबस्फोटांमध्ये 250 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी देशभर संशयितांविरोधात अटकसत्र सुरू केलं होतं.

याच तपास मोहिमेचा भाग म्हणून शुक्रवारी पोलिसांच्या एका पथकाने सैंथमारूथू या ठिकाणी एका घरावर धाड टाकली. सैंथमारूथू हे ठिकाण या हल्ल्याचा संशयित सूत्रधार असलेल्या झारान हाशिम यांच्या गावाजवळच आहे.

त्या वेळी पोलीस कारवाई सुरू असताना एका बंदुकधाऱ्याने पोलिसांच्या पथकावर गोळीबार सुरू केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्यानंतर तिघांनी स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात सहा मुलं आणि तीन महिला यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय तीन जण गोळीबारात मृत्युमुखी पडले, असं पोलिसांनी सांगितलं.

संशयित कट्टरतावादी आणि पोलीस यांच्यादरम्यान झालेल्या चकमकीतही एका नागरिकाचा मृत्यू झाला. जखमी मुलं आणि महिला यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

श्रीलंकेच्या सरकारी प्रसारमाध्यमांवर दाखवलेल्या दृश्यांमध्ये या घरात मृतदेह पडलेले दिसत होते. त्याशिवाय एका मृतदेहाच्या हातात रायफलही होती. तसंच घरात स्फोटकं, जनरेटर, ड्रोन आणि काही बॅटरी पडलेल्या दिसत होत्या.

ही धाड टाकली, त्याच वेळी जवळच्याच एका शहरात सुरक्षा दलांनी आणखी एका इमातीवर छापा टाकला. या दुसऱ्या धाडीत पोलिसांनी स्फोटकं आणि ड्रोन हस्तगत केलं.

या धाडींच्या वेळी जवळपास 600 मुस्लिमांनी या भागातून पळ काढत जवळच्याच शाळेत आसरा घेतल्याचं या परिसरात राहणाऱ्या लोकांनी सांगितलं.

गेल्या रविवारी झालेल्या बाँबस्फोटांनंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाली आहे. पोलीस संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जोरदार तपास मोहीम राबवत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)