You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंका हल्ले: पंतप्रधान विक्रमसिंघे - धोक्याची मला माहिती नव्हती, मग राजीनामा का देऊ?
श्रीलंकेत हल्लेखोर घुसल्याचा कुठलाही अहवाल माझ्यापर्यंत आलाच नाही, अन्यथा कारवाई करून ईस्टर संडे बाँब हल्ले रोखलेच असते, असं पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे म्हणाले.
या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत देशाचे पोलीसप्रमुख आणि संरक्षण खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी पायउतार झाले आहेत. मात्र आपल्याकडून जर काही चूक झाली असती तर आपण ताबडतोब राजीनामा दिला असता, असं विक्रमसिंघे बीबीसीशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी श्रीलंकेतल्या पूर्वेकडच्या अंबारई प्रांतात पुन्हा काही हल्ले झाल्याचं वृत्त होतं. पोलिसांच्या प्रवक्त्यानुसार काही लोकांनी अंबारई प्रांतातल्या साइंदमरदूमध्ये सुरक्षारक्षकांवर गोळाबार केला आहे.
पोलिसांच्या तपासानुसार संशयितांनी एका इमारतीमध्ये स्फोट घडवून आणला. यात आतापर्यंत 15 मृतदेह सापडले आहेत, ज्यापैकी काही बालकांचे आहेत, असं पोलिसांनी शनिवारी सकाळी सांगतलंय.
यापैकीच सहा मृतदेह आत्मघातकी हल्लेखोरांचे असू शकतात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
साइंदमरुदूमध्ये अजूनही शोध मोहीम सुरू आहे.
बीबीसी प्रतिनिधी अज्जाम अमीन यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना शोध मोहिमेत काही स्फोटकं सापडली आहेत. तसंच पोलिसांना एका घरात इस्लामिक स्टेटचा बॅनर आणि पोशाख देखील सापडला आहे. हा पोशाख इस्लामिक स्टेट जारी करत असलेल्या व्हीडिओतल्या पोशाखाशी मिळताजुळता आहे.
या प्रकरण सात लोकांना अटक करण्यात आली आहे. रात्री 10 ते सकाळी 4 पर्यंत संपूर्ण देशात कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर देशातील कॅथलिक चर्चने सर्व संडे मास(रविवारच्या प्रार्थनासभा) रद्द केल्या आहेत.
श्रीलंकेत इस्टरच्या दिवशी सहा वेगवेगळ्या चर्च आणि हॉटेलांमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात जवळपास 250 लोकांचा मृत्यू आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत. आधी हा मृतांचा आकडा जवळजवळ 300 सांगण्यात आला होता.
राजीनामा देणार नाही- विक्रमसिंघे
या घटनेनंतर श्रीलंकेचे पोलीसप्रमुख तसेच संरक्षण मंत्रालयातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र या स्फोटांच्या शक्यतेची आपल्याला काहीच कल्पना नव्हती, असं श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी सांगितलंय.
"जर हल्ल्याची मला कल्पना असती आणि आम्ही वेळीच काही पावलं उचलली नसती तर मी तात्काळ राजीनामा दिला असता. पण तुम्हाला त्याची काहीच कल्पना नसताना राजीनामा देण्याची काय गरज?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
हल्ला कुणी केला
हे स्फोट घडवण्याचा संशय 9 जणांवर आहे. झहरान हाशिम या कट्टर धर्मप्रचारकाने हा हल्ला घडवल्याचं सांगितलं जातं. त्याचा कोलंबोमधील शांग्री-ला हॉटेलातील स्फोटात मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
तसेच मसाला व्यापारी मोहम्मद युसुफ इब्राहिमच्या दोन मुलांचाही यात समावेश असल्याचं सांगितलं जातं. स्फोटांनंतर इब्राहिमला पकडण्यात आलं आहे. त्याच्या एका मुलाने झहरानबरोबर शांग्री ला हॉटेलमध्ये स्फोट घडवल्याचं समजतं. तर दुसऱ्याने सिनॅमन ग्रँड हॉटेलला लक्ष्य केलं.
या हल्लेखोरांपैकी बहुतेक सर्वजण उच्चशिक्षित होते तसंच मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गातील होते, असं श्रीलंकेच्या सरकारनं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)