You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंका स्फोटः मृतांची संख्या अचानक 100ने कमी झाली
श्रीलंका सरकारने रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या अचानक 100 ने कमी केली आहे. श्रीलंकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार साखळी स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या 253 च्या घरात आहे.
आरोग्य मंत्रालयानं याआधी मृतांचा जो आकडा जाहीर केला होता तो चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.
श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि पूर्वेकडे असलेल्या बट्टीकालोआ शहरात प्रसिद्ध हॉटेल्स आणि चर्चवर आत्मघातकी हल्ले झाले. ज्यात शेकडो लोक जखमी झाले आहेत.
या हल्ल्यात मरण पावलेले बहुतेकजण हे श्रीलंकन नागरीक आहेत. त्याशिवाय काही परदेशी नागरिकांचाही या स्फोटात जीव गेला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार एकूण 9 स्फोट झाले. आणि याप्रकरणी आतापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
पोलिसांनी स्फोटाशी संबंध असल्याच्या संशयावरून 9 जणांची छायाचित्रं जारी केली आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी छापेमारीही सुरू आहे.
विशेष म्हणजे त्या 9 जणांपैकी 8 जण हे श्रीलंकन नागरीक आहेत.
इस्लामिक स्टेट अर्थात आयएसचा हात या स्फोटात होता का? याच चौकशी श्रीलंकन सरकारने सुरू केली आहे.
संरक्षण सचिवांचा राजीनामा
9 पैकी एका हल्लेखोरानं श्रीलंकेत परतण्यापूर्वी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतल्याचं समोर आलं आहे.
दुसरीकडे पोलिसांनी स्फोटाशी संबंध असल्याच्या संशयावरून 70 जणांना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान रविवारी ईस्टर संडेदिवशी प्रार्थनेच्या वेळी चर्च आणि हॉटेलांमध्ये झालेल्या साखळी स्फोटांनंतर संरक्षण सचिव हेमसिरी फर्नांडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्याचा इशारा देऊनही त्याची माहिती कॅबिनेट किंवा पंतप्रधानांना न देणं आणि हल्ले रोखण्यात अपयश आल्याच्या कारणावरून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी हेमसिरी फर्नांडो यांचा राजीनामा मागितला होता. जो गुरूवारी त्यांनी राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला.
दरम्यान श्रीलंकेतील कॅथलिक चर्चने सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन निलंबित केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)