You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष अॅलन गार्सिया यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष अॅलन गार्सिया यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. लाचखोरीच्या आरोपात अटक गार्सिया यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या निवासस्थानी आले असताना हा प्रकार घडला.
गार्सिया यांना जखमी अवस्थेत राजधानी लिमातील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. सध्याचे राष्ट्राध्यक्ष विजकार यांनी गार्सिया यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
गार्सिया यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी रूग्णालयातबाहेर मोठी गर्दी केली. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना पांगवण्यात यश मिळवलं.
गार्सिया यांच्यावर ब्राझीलची कन्स्ट्रक्शन कंपनी ओदेब्रक्तकडून लाच घेतल्याचा आरोप होता. मात्र त्यांनी हे आरोप आधीच फेटाळून लावले होते.
गार्सिया यांनी 1985 ते 1990 आणि 2006 ते 2011 या काळात पेरूचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलं होतं.
गार्सिया यांच्या घरी नेमकं काय झालं?
लाचखोरीच्या आरोपानंतर गार्सिया यांना अटक करण्यासाठी पोलीस अधिकारी त्यांच्या मिराफ्लोर्सचया घरी पोहोचले होते.
यावेळी आपल्याला एक फोन करायचा आहे असं सांगून गार्सिया आपल्या खोलीत गेले आणि त्यांनी दरवाजा बंद करून घेतला.
त्यानंतर काहीच मिनिटात गोळीबाराचा आवाज आला. पोलिसांनी बळाचा वापर करून दरवाजा उघडला. तेव्हा गार्सिया खुर्चीत पडले होते. आणि त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतल्याचं दिसत होतं, असं पेरूचे अंतर्गत सुरक्षा मंत्री कार्लोस मोरान यांनी सांगितलं.
गार्सिया यांच्याकडे चार ते पाच शस्त्रं होती. ती त्यांना लष्कराकडून भेट म्हणून मिळाली होती. त्यातीलच एका शस्त्रानं त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचं गार्सिया यांच्या स्वीय सहाय्यक रिकार्डो पिनेडो यांनी सांगितलं.
या घटनेनंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष विजकार यांनी ट्वि करून शोक व्यक्त केला. ते म्हणाले, "माजी राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबाशी माझी सहवेदना आहे."
गार्सिया यांच्यावर काय आरोप होते?
2006 ते 2011 या आपल्या दुसऱ्या राष्ट्रध्यक्षदाच्या काळात गार्सिया यांनी राजधानी लिमामध्ये उभारल्या जात असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी ब्राझीलची कंपनी ओदेब्रक्तकडून लाच घेतल्याचा आरोप होता.
मात्र हे आरोप केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं गार्सिया यांनी म्हटलं होतं. तसंच गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी उरूग्वेकडे आश्रय मागितला होता. मात्र त्यात यश आलं नाही.
अॅलन गार्सिया.. लॅटिन अमेरिकेचे केनेडी
- जन्म 23 मे 1949
- कायदा आणि समाजशास्त्रात पदवी
- 36 व्या वर्षी म्हणजे 1985 मध्ये पेरूचे सर्वात तरूण राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड
- फर्डा वक्ता.. त्यांना 'लॅटिन अमेरिकेचे केनेडी' असं म्हटलं जायचं.
- 1985 ते 1990 आणि 2006 ते 2011 अशा दोनवेळा पेरूचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलं
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)