You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुदानमध्ये लष्करी उठाव : पदच्युत सरकारमधील सदस्यांना अटक
सुदानमध्ये राष्ट्राध्यक्ष ओमर अल बशिर यांना पदच्युत केल्यानंतर तिथल्या मिलिट्री काऊन्सिलने राष्ट्राध्यक्षांच्या सरकारमधील सदस्यांना अटक केली आहे.
सुदानमध्ये गेली काही महिने बिघडलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात लोक आंदोलन करत आहेत. ही निदर्शनं सध्याही सुरू आहेत. मिलिट्री काऊन्सिलने आंदोलकांना मज्जाव करणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसेच विरोधकांनी तातडीने राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करावा, असंही म्हटलं आहे.
जोपर्यंत नागरी सत्ता सुदानमध्ये कार्यरत होत नाहीत, तोपर्यंत निदर्शन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
सुदानच्या राजधानीत संरक्षण मंत्रालयाच्या कार्यलयासमोर आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरू ठेवलं आहे.
मिलिट्री काऊन्सिल काय म्हणाली?
रविवारी मिलिट्री काऊन्सिलचे प्रवक्ते मेजर जनरल शम्स अद दिन शान्टो म्हणाले, "जे नागरी सरकार आणि विरोधी पक्षांतील नेते ठरवतील, त्याची अंमलबजावणी आम्ही करू. आम्ही कुणालाही पंतप्रधान नेमणार नाही. त्यांनीच पंतप्रधानाची निवड करावी."
ते म्हणाले, "आम्ही आंदोलकांना हटवणार नाही. पण आंदोलकांनी दैनंदिन व्यवहार सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी. रस्ते बंद करू नयेत. तसेच शस्त्रं हाती घेतलेलं आम्ही खपवून घेणार नाही."
राष्ट्रीय गुप्तचर संस्था, लष्कर आणि पोलीस दलाच्या प्रमुखपदावर नव्या व्यक्तींची नेमणूक, भ्रष्टाचार रोखण्यासाठी समिती, माध्यमांवरील बंधनं उठवणं, आंदोलकांना पाठबळ दिल्याच्या आरोपातून ज्या पोलीस आणि लष्करातील अधिकाऱ्यांना अटक झाली आहे, त्यांची सुटका करणं, मुत्सदी पातळीवरील व्यवहार पुन्हा सुरू करणं, अशा घोषणा मिलिट्री काऊन्सिलने केल्या आहेत.
सुदानमध्ये काय सुरू आहे?
महाग होत चाललेल्या राहणीमानामुळे या आंदोलनाची ठिणगी पडली. मात्र आंदोलकांनी नंतर राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा द्यावा आणि हे सरकार जावे अशी मागणी सुरू केली.
गेल्या आठवड्यात या आंदोलनातील ज्येष्ठ सदस्य ओमर अल- डिगिएर यांनी एएफपीला सांगितले, "ही क्रांतीच आहे."
आंदोलकांच्या विरोधात हस्तक्षेप करू नका असे पोलिसांना सांगण्यात आले होते. मात्र आंदोलकांना दडपण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर मानवाधिकार संघटनांनी जबरदस्त टीका केली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरपासून सुरु झालेल्या आंदोलनात 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृतांचा आकडा याहून मोठा असावा असा दावा मानवाधिकार संघटनांनी केला आहे.
फेब्रुवारीमध्ये, राष्ट्राध्यक्ष स्वतः पायउतार होतील असं वाटलं होतं मात्र बशीर यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.
गेल्या आठवड्यात ओमर अल बशीर यांना पदच्युत करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर लष्करी उठावाचे नेतृत्व करणारे सुदान मिलिट्री काऊन्सिलचे प्रमुख अवाद इब्न औफ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारी वृत्तवाहिनीवर त्यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी लेफ्टनंट जनरल अब्देल फताह अब्देलरेहमान बुऱ्हान यांची मिलिट्री काऊन्सिलच्या प्रमुख पदावर नेमणूक केली आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)