रोमियो हेलिकॉप्टर भारतीय नौदलाच्या ताफ्यात येणार, अशी आहेत वैशिष्ट्यं

हेलिकॉप्टर

फोटो स्रोत, Www.lockheedmartin.com

भारतीय नौदल आणखी सशक्त करण्यासाठी भारताने आणखी एक पाऊल उचललं आहे. नौदलासाठी भारताने 'रोमियो' सीहॉक हेलिकॉप्टर विकत घेण्याचं ठरवलं आहे. अमेरिकेने भारताला हे हेलिकॉप्टर विकण्याची तयारी दर्शवली आहे. भारत अमेरिकेकडून एकूण 24 हेलिकॉप्टर विकत घेणार आहे.

MH 60 R 'रोमियो' सीहॉक हेलिकॉप्टर असं या हेलिकॉप्टरचं नाव आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या गोष्टीचा खुलासा केला आहे. 260 कोटी डॉलर किमतीत ही हेलिकॉप्टर्स येणार आहेत.

अमेरिकन परराष्ट्र खात्याचं म्हणणं आहे की भारत सरकारने मल्टी मोड रडार, मल्टी-स्पेक्ट्रल टार्गेटिंग सिस्टम आणि अचूक हल्ला करण्याची क्षमता असणाऱ्या हेलिकॉप्टर्सची मागणी केली होती. असं तंत्रज्ञान असलेले 24 हेलिकॉप्टर देण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे.

हे हेलिकॉप्टर भारताच्या ताफ्यात आल्यानंतर भारताची सागरी सीमा आणखी बळकट होईल, असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला आहे. या हेलिकॉप्टरमुळे भारताला अॅंटी सरफेस आणि अॅंटी सबमरीन मोहिमा अधिक आत्मविश्वासाने राबवता येतील. इतकंच नाही तर आपातकालीन परिस्थितीमध्ये यांचा वापर होऊ शकतो.

हेलिकॉप्टर

फोटो स्रोत, Lockheedmartin.com

अमेरिकन नौसेनेत या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. शत्रूंच्या पानबुड्या शोधण्याचं तंत्रज्ञान या हेलिकॉप्टरमध्ये आहे. या हेलिकॉप्टरच्या कॉकपिटमध्ये दोन कंट्रोल आहेत याचा अर्थ असा आहे की गरज पडल्यास को-पायलट देखील हेलिकॉप्टरचं पूर्णपणे नियंत्रित करू शकतो. लॉकहीड मार्टिन रोटरी अॅंड मिशन सिस्टम या कंपनीने या हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे.

रोमियो हेलिकॉप्टरमध्ये जीपीएस सिस्टमचा वापर करून क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता आहे.

उड्डाणाच्या वेळीच प्रतिसेकंदात 8 मीटर उंच जाण्याची रोमियोची क्षमता आहे. 267 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने हे हेलिकॉप्टर उडतं.

या हेलिकॉप्टरचं वजन सात हजार किलोग्राम असून एकावेळी किमान 10 टन वजन असलेल्या सामानाची ने-आण करण्यास रोमियो सक्षम आहे.

जगभरात एकूण 300हून अधिक MH 60 R हेलिकॉप्टर्स सेवेत आहेत असा कंपनीचा दावा आहे.

हेलिकॉप्टर

फोटो स्रोत, lockheedmartin

2001 मध्ये या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली होती. 2005 मध्ये अमेरिकन नौसेने हे हेलिकॉप्टर प्रथम वापरलं.

भारताच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात हे हेलिकॉप्टर आहेत. पण दोन्ही देशातल्या हेलिकॉप्टरचं वैविध्य अबाधित राहावं यासाठी डिजाइन आणि तंत्रज्ञानात काही बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)