ब्रेक्झिट: चार प्रस्तावांवर ब्रिटन संसदेत एकमत नाहीच, युरोपमधून बाहेर पडण्याबद्दल संभ्रम कायम

फोटो स्रोत, EPA
ब्रेक्झिटप्रकरणी पुढची वाटचाल ठरवणाऱ्या चार प्रस्तावांवर ब्रिटनच्या संसदेत सोमवारी रात्री उशिरा मतदान झालं. पण त्यावरही एकमत होऊ शकलं नाही आणि म्हणून ब्रेक्झिटप्रकरणी संभ्रमाचं वातावरण अजूनही कायम आहे.
ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटनच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया. साधारण दोन वर्षांपूर्वी ब्रिटनने एका सार्वमतातून घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जावी, याबाबत ब्रिटनचं संसद तेव्हापासून विविध पर्यायांची चाचपणी करत आहे.
संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोमवारी चार प्रस्तावांवर मतदान झालं, ज्यात कस्टम युनियन आणि युनायटेड किंग्डमला एकच बाजारपेठ (जशी नॉर्वेची आहे) म्हणून गृहित धरण्यासारखे मुद्दे होते. मात्र कोणत्याही प्रस्तावाला बहुमत मिळू शकलं नाही.

फोटो स्रोत, PA
या मतदानाच्या कौलानुसार कार्यवाही करण्याचं सरकारवर बंधन नाही, म्हणून संसदेत सादर होणाऱ्या प्रस्तावावर बहुमत झालंही असतं तरी सरकारला ते मान्य करून त्याची अंमलबजावणी करणं बंधनकारक नाही.
यापूर्वी पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रेक्झिटसंदर्भातील युरोपियन युनियनबरोबर केलेल्या वाटाघाटींवरून संसदेत मतदान झालं असून तीन वेळा ब्रेक्झिट करार फेटाळण्यात आला.

फोटो स्रोत, Reuters
शुक्रवारी झालेल्या मतदानातही ब्रेक्झिट कराराला संसद सदस्यांनी फेटाळलं. आता थेरेसा यांच्याकडे 12 एप्रिलपर्यंतचा कालावधी आहे. ब्रेक्झिटच्या अंमलबजावणीसाठी त्यांना युरोपियन युनियन संघाकडून अतिरिक्त वेळ मागून घ्यावा लागेल किंवा कोणत्याही यशस्वी वाटाघाटाविनाच युरोपमधून बाहेर पडावं लागेल.
कॉमन मार्केट 2.0 नावाने ओळखल्या जाणारा एकल बाजार प्रस्ताव मांडणाऱ्या हुजूर पक्षाचे नेते निक बोल्स यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या प्रस्तावाला संसदेनं फेटाळलं आहे. वाटाघाटींसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, असं बोल्स यांनी सांगितलं.
बोल्स संसदेतून बाहेर जात असताना अन्य सदस्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. काहींनी त्यांच्या प्रयत्नांचं कौतुकही केलं. पक्षाचा राजीनामा दिला असला तरी खासदार म्हणून काम करत राहेन, असं बोल्स यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. स्वत:ला अपक्ष कंझर्व्हेटिव्ह खासदार म्हणून त्यांनी घोषित केलं आहे.

फोटो स्रोत, UK Parliament
ब्रिटन कोणत्याही कराराविना युरोपियन युनियनमधून बाहेर पडेल, असा काहीतरी उपाय योजायला हवा एवढंच बाकी राहिलं आहे, अशा शब्दांत ब्रेक्झिट मंत्री स्टीफन बार्कले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"चारपैकी कोणत्याही प्रस्तावाला मंजुरी मिळू नये, हे अत्यंत निराशाजनक आहे," असं विरोधी पक्ष अर्थात लेबर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी म्हटलं आहे.
"पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला होता, याची आठवण संसदेला करून द्यावीशी वाटते," असंही त्यांनी सांगितलं.
"ब्रेक्झिट करारासंदर्भात प्रस्ताव मांडण्यासाठी पंतप्रधान थेरेसा मे यांना तीनवेळा संधी दिली जाऊ शकते तर माझ्या मते संसदेलाही त्यांनी आधी मांडलेल्या प्रस्तावांवर पुनर्विचार करण्याची पुन्हा एकदा संधी मिळावी. ज्या मुद्यावर पंतप्रधान अपयशी ठरल्या, त्या मुद्द्यांबाबत संसदेने सकारात्मक निर्णय घ्यायला हवा, तो म्हणजे भविष्यात युरोपीय राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण आर्थिक संबंध राखणे, जेणेकरून ब्रिटनवर कोणत्याही कराराविना युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची वेळ येऊ नये," असं कॉर्बिन यांनी सांगितलं.
दरम्यान, युरोपियन संसदेचे ब्रेक्झिट समन्वयक गाय व्हर्होस्टाड यांनी ट्वीट केलं की हे सर्व प्रस्ताव फेटाळले गेल्यानंतर "ब्रिटनसाठी एक कठीण ब्रेक्झिट पुढे दिसत आहे".
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








