डार्विनच्याआधी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा मुस्लिम शास्त्रज्ञ

फोटो स्रोत, Getty Images
उत्क्रांतीचा सिद्धांत म्हटलं की डार्विन हे नाव आठवतं. चार्ल्स डार्विननं मांडलेला उत्क्रांतीवाद आणि 'Survival of the Fittest' या सिद्धांताची तोंडओळख आपल्याला शाळेत असतानाच झालेली असते.
1859 साली लिहिलेल्या On the Origin of Species या पुस्तकात डार्विननं उत्क्रांतीचा सिद्धांत मांडताना काळ आणि परिस्थितीनुरुप प्राण्यांमध्ये होणारे बदल, त्यांची अनुकूलनक्षमता याबद्दल पहिल्यांदाच विस्तृत मांडणी केल्याचं सांगितलं जातं. एकाच पूर्वजामधून वेगवेगळ्या प्रजाती कशा विकसित होत गेल्या हे देखील डार्विननं विस्तारानं मांडलं होतं. उत्क्रांतीचा नियम डार्विनच्या सिद्धांतालाही लागू होऊ शकतो. कारण डार्विनच्याही हजार वर्षे आधी हा उत्क्रांतीचा सिद्धांत मांडण्यात आला होता.
इराकमधील मुस्लिम तत्वज्ञ अल्-जहिज यांनी उत्क्रांतीची कल्पना मांडली होती. 'नैसर्गिक निवडी'च्या प्रक्रियेद्वारे प्राण्यांमध्ये कसे बदल घडून येतात, हे समजावून देण्यासाठी अल्-जहिज यांनी एक पुस्तक लिहिलं.
त्यांचं खरं नाव हे अबु उस्मान अम्र बहर अल्काननी अल्-बसरी होतं. पण ते अल्-जहिज या नावानंच ओळखले जायचे. या नावाचा अर्थ 'अतिशय बटबटीत डोळ्यांचा,' असा होतो.

फोटो स्रोत, State of Qatar
एखाद्याला अशा पद्धतीनं बोलावणं हे निश्चितच योग्य नाही. पण त्यांची ओळख या अपमानास्पद नावापेक्षाही अधिक होती. त्यांनी 'किताब अल्-हयवान' हे पुस्तक लिहिलं होतं.
सुधारणावादी चळवळीचा प्रभाव
त्यांचा जन्म इसवी सन 776 मध्ये दक्षिण इराणमधील बसरा प्रांतात झाला होता. या काळातच एक धार्मिक चळवळ सुरू झाली होती. मानवी अस्तित्त्वाचा शास्त्रशुद्ध वेध घेण्याचा प्रयत्न करणारी चळवळ त्या काळात लोकप्रिय होत होती.
अब्बासी शासनकर्त्यांच्या काळात या चळवळीला लोकमान्यता मिळत होती. ग्रीक भाषेतील अभ्यासग्रंथांचा अरेबिकमध्ये अनुवाद केला जात होता. धर्म, विज्ञान आणि तत्वज्ञानासारख्या विषयांबाबत चर्चा, वाद-प्रतिवाद होत होते. या सर्वांमधून अल्-जहिज यांची वैचारिक जडणघडण झाली.
चिनी व्यापाऱ्यांनी इराकमध्ये कागद आणला. कागदामुळं लिखाणाची प्रक्रिया सोपी झाली आणि विचारांचाही प्रसार वेगानं व्हायला लागला. अल्-जहिज हेदेखील अगदी लहान वयातच वेगवेगळ्या विषयांवर लिहायला लागले.
विज्ञान, भूगोल, तत्त्वज्ञान, अरबी भाषेचं व्याकरण आणि साहित्य हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांनी एकूण 200 पुस्तकं लिहिल्याचं मानलं जातं. मात्र त्यांपैकी केवळ एक तृतीयांश पुस्तकंच आज उपलब्ध आहेत.
अल्-जहिज यांचा उत्क्रांतीवाद

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी The Book of Animals हे पुस्तकं सर्वाधिक गाजलं. या पुस्तकांत 350 प्राण्यांची यादी दिली आहे. प्राण्यांसंबंधीचा माहितीकोष असं या पुस्तकाचं स्वरूप होतं. पुस्तकात प्राण्यांच्या विकासाबद्दल अल्-जहिज यांनी दिलेल्या माहितीचं डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताशी साधर्म्य आहे.
प्राणी हे आपलं अस्तित्त्व टिकविण्यासाठी संघर्ष करतात. अन्न मिळविण्यासाठी, आपण कोणाचंही भक्ष्य बनू नये यासाठी आणि पुनरुत्पादनासाठी प्राण्यांचा संघर्ष सुरू असतो, असं अल्-जहिज यांनी लिहिलं आहे. पर्यावरणातील घटक हे प्राण्यांमध्ये नवीन क्षमता विकसित करण्यासाठी मदत करतात. या क्षमतांमुळे प्रजाती टिकून राहतात आणि कालांतरानं त्यांच्यातून नवीन प्रजातीही विकसित होतात, असंही जहिज यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं होतं.
त्यांनी असंही म्हटलं आहे, की जे प्राणी संघर्षामधून टिकून पुनरुत्पादन करण्यात यशस्वी होतात, ते आपले गुणधर्म पुढच्या पिढीकडे सोपवतात. प्राण्यांना जगण्यासाठी संघर्ष आणि स्पर्धा करावी लागते याची जहिज यांना कल्पना होती. एखादी प्रजाती दुसऱ्यापेक्षा वरचढ ठरते आणि दुबळ्या प्रजातीचा निभाव लागत नाही, हेदेखील त्यांना माहीत होतं.
अन्य मुस्लिम विचारवंतानां प्रेरणा
अल्-जहिज यांच्या विचारांनी इतर मुस्लिम विचारवंतांनाही प्रेरणा दिली. अल् फराबी, अल्-अरबी, अल्-बैरुनी आणि इब्न खाल्दुनसारख्या विचारवंतांनी जहिज यांचं लिखाण गांभीर्यानं वाचलं.
पाकिस्तानचे 'आध्यात्मिक पिता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद इक्बाल यांनीही 1930 साली प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या पुस्तकात जहिज यांचा उल्लेख केला आहे. स्थलांतर आणि पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे प्राण्यांवर होणाऱ्या परिणामांची अल्-जहिज यांना जाण होती, असं मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Kitāb al-Hayawān
उत्क्रांतीच्या सिद्धांतामधील मुस्लिम विचारवंतांचं योगदान हे 19 व्या शतकातील युरोपियन विद्वानांपासून लपून राहिलं नव्हतं. चार्ल्स डार्विनचा समकालिन शास्त्रज्ञ विल्यम ड्रेपर याने 1878 मध्ये 'उत्क्रांतीचा इस्लामी सिद्धांता'बद्दल भाष्य केलं होतं.
डार्विनला अल्-जहिज यांच्या पुस्तकाबद्दल माहिती होती की नाही, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. डार्विनचं उत्क्रांतीच्या सिद्धांबद्दलचं योगदान कोणीही नाकारणार नाही. मात्र उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणाऱ्या अन्य वैज्ञानिकांचाही विचार होणं गरजेचं आहे, असं मत बीबीसी रेडिओसाठी 'इस्लाम आणि विज्ञान' हा माहितीपट बनवणाऱ्या एहसान मसूद यांनी व्यक्त केलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








