Abhinandan : ...तर अभिनंदन वर्तमान यांना परत पाठवायला आम्ही तयार - पाकिस्तान

पाकिस्तानने अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केली आहे. सविस्तर बातमी इथे वाचा -

"दोन्ही देशांमधला तणाव कमी होणार असेल, तर पाकिस्तान भारतीय पायलटला परत पाठवण्याविषयी विचार करायलाही तयार आहे," असं पाकिस्तानाचे परराष्ट्रमंत्री शाह महमुद कुरेशी यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानमधल्या Geo TVशी बोलताना कुरेशी यांनी हे वक्तव्यं केलं आहे.

याआधी भारतानं अभिनंदन वर्तमान यांना सुखरून परत करावं अशी मागणी केली आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना एक भारतीय वैमानिक बेपत्ता झाल्याचं सांगितलं आहे. पण त्याची अधिक माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.

पण परराष्ट्र मंत्रालयानं एक पत्रक जारी करून पाकिस्ताननं अटक केलेल्या भारतीय वैमानिकाला जिवंत आणि लवकरात लवकर परत पाठवण्याची मागणी केली आहे.

"पंतप्रधान इमरान खान हे नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बातचीत करायला तयार आहेत. शांततेविषयी चर्चा करायला ते तयार आहेत. पण मोदी तयार आहेत का," असा प्रश्न कुरेशी यांनी Geo TVशी बोलताना विचारला आहे.

"भारताला दहशतवादावर चर्चा करायची असेल तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत," असंही असंही ते म्हणालेत.

कुरेशी पुढं म्हणाले, "राजकीय हेतूसाठी तुम्ही (भारत) प्रदेशात तणाव वाढवत आहात. ही तुमची राजकीय गरज असेल तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही."

बुधवारी (27 फेब्रुवारी) पाकिस्तानने आणखी दोन व्हीडिओ प्रसिद्ध केले होते. पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला आहे की ते व्हीडिओ अभिनंदन वर्तमान या भारतीय वैमानिकचे आहेत. या वैमानिकाला भारत-पाक सीमेलगत अटक करण्यात आली आहे.

ते नेमके कुठले आहेत, त्यांच लग्न झालं आहे का, कुठलं विमान ते चालवत होते, तसंच तुमचं लक्ष्य काय होतं असे प्रश्न त्यांना या व्हीडिओमध्ये विचारले गेले आहेत.

पाकिस्तानी लष्कराने आधी दोन भारतीय वैमानिकांना अटक केल्याचा दावा केला होता, पण आता मात्र त्यांच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीट करून फक्त एकच भारतीय पायलट त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे.

याआधी कारगिल युद्धात 26 वर्षीय फ्लाइट लेफ्टनंट के. नचिकेत पाकिस्तानच्या ताब्यात होते. काही आठवड्यानंतर त्यांना भारताकडे सोपवण्यात आलं होतं.

कोण आहेत अभिनंदन?

अभिनंदन वर्तमान हे विंग कमांडर पदावर कार्यरत आहेत. त्यांनी 19 जून 2004 मध्ये भारतीय वायुसेनेत प्रवेश केला. अभिनंदन MiG21 बिसॉन विमानाचं सारथ्य करत होते.

अभिनंदन यांचे वडील S. वर्तमान हेही निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. ते एअर मार्शलपदी कार्यरत होते.

काही वर्षांपूर्वी भारतातील एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अभिनंदन यांनी देशासाठी काम करण्यामागची भावना व्यक्त केली होती.

अभिनंदन यांना पाकिस्तानने पकडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना होत आहेत. ते सुखरूप मायदेशी परतावेत, यासाठी ठिकठिकाणी दुवा केल्या जात आहेत, सोशल मीडियावरही लोकांनी पोस्टद्वारे आपल्या प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अभिनंदन यांच्या विडिलांनी एका पत्रात, अभिनंदन यांच्या व्हीडिओवर आणि लोकांनी त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनांबद्दल भावनिक संदेश दिला आहे.

"सर्वांनी व्यक्त केलेली काळजी आणि सदिच्छांबद्दल आभार. मी देवाचेही आभार मानतो, की अभी सुखरूप आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, मानसिकदृष्ट्याही तो ठीक आहे. त्याला धाडसानं बोलताना पाहिलं. तो एक सच्चा शिपाई आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. तुमचे सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतीलच," असं एअर मार्शल (निवृत्त) वर्तमान पुढे लिहितात.

"त्याचा छळ होऊ नये. तो हाती-पायी सुरक्षितपणे घरी परतावा, अशी प्रार्थना मी करतो. या कठीण काळात आमच्यासोबत ठामपणे उभं राहण्यासाठी आभार. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला बळ मिळत आहे," असं एअर मार्शल वर्तमान (नि.) यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे.

जिनिव्हा कराराअंतर्गत युद्धकैदींना धमकावलं-घाबरवलं जाऊ शकत नाही तसंच त्यांचा अपमानही केला जाऊ शकत नाही. युद्धकैदींच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारची वातावरण निर्मिती आणि उत्सुकता निर्माण केली जाऊ शकत नाही.

अभिनंदन यांच्या सुटकेसाठी सोशल मीडियावर पोस्ट

दरम्यान, अभिनंदन यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात यावे, यासाठी सोशल मीडियावरही लोकांकडून सरकारला आवाहन केलं जात आहे. राजकीय नेत्यांपासून सामान्यांपर्यंत सर्वच जण अभिनंदन लवकर परत यावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. ट्विटरवर #BringBackAbhinandan आणि #AbhinandanMyHero हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

"आपल्या वायुदलाच्या बेपत्ता वैमानिकाबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. तो लवकरच सुखरूप परत येईल, अशी मला आशा आहे. या कठीण काळात आम्ही भारतीय वायुदलासोबत आहोत," असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आपण अभिनंदन यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे.

"भारतीय वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो. या शूर पुत्राचा सर्व देशाला अभिमान आहे. ते सुखरूप परत येतील असा आम्हाला विश्वास आहे," असं केजरीवालांनी लिहिलं आहे.

जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी अभिनंदन यांनी लवकर आणि सुखरूप घरी परतावं, यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही अभिनंदन यांना परत आणा, असं ट्वीट केलंय.

सध्याच्या घडीला वायुदलाचे पायलट सुखरूप परत येणं महत्त्वाचं आहे. त्यांना पाकिस्तानच्या ताब्यातून सोडविण्याच्या दिशेनंच आता प्रयत्न होणं आवश्यक आहे, असं अक्षय मराठे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

"आपण आपल्या आयुष्यातल्या गोष्टींकडे पुन्हा वळतो. मात्र काही सैनिक हे आपल्या कुटुंबीयांकडे कधीच परतून येत नाहीत. अभिनंदन हे आपल्या घरी, कुटुंबाकडे सुखरूप परत येतील अशी आशा करू," असं ट्वीट रवींद्र रंधावा यांनी केलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)