You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Abhinandan : IAF विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेचे भारताकडे काय पर्याय?
भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या सुटकेचे कोणते पर्याय भारताकडे उपलब्ध आहेत? याआधी भारतीय सैनिकांचं प्रत्यार्पण कसं झालं आहे?
कारगिल युद्धावेळी 26वर्षीय फ्लाइट लेफ्टनंट के. नचिकेत पाकिस्तानच्या ताब्यात होते. काही आठवड्यानंतर त्यांना भारताकडे सोपवण्यात आलं होतं.
कारगिल युद्धादरम्यान जी. पार्थसारथी पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत होते. पार्थसारथी 1963 ते 1968 या कालावधीत भारतीय लष्करात अधिकारी होते.
नचिकेत यांची ज्या पद्धतीने सुटका झाली त्यासंदर्भात पार्थसारथी यांनी बीबीसी प्रतिनिधी विनित खरे यांना सविस्तर माहिती दिली.
जी. पार्थसारथी सांगतात,
ज्या पद्धतीने नचिकेत यांची सुटका करण्यात आली त्याच धर्तीवर अभिनंदन यांची सुटका करण्यात येऊ शकते.
पाकिस्तानने आक्रमण केलं. त्यांचं विमान पाडण्यात आलं. मात्र त्यांनी ही गोष्ट कधीच मान्य केली नाही.
त्यामुळे संताप होणं साहजिक आहे. भारताचा पायलट पाकिस्तानच्या कब्जात असण्याची ही पहिलीच वेळ नाही. हे एक उदाहरण आहे.
सरकारला जे योग्य वाटेल त्यानुसार कारवाई व्हावी. योग्य वेळ येईल तेव्हा चर्चा केली जाईल. गुरुवारी सकाळी चर्चा करायची की नाही याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात येईल.
युद्धकैदींवर जिनेव्हा कराराच्या अटी लागू होतात. या करारानुसार पाकिस्तानला आपल्या वैमानिकाबरोबर माणुसकीच्या भावनेतून वागणं अनिवार्य आहे.
नचिकेत यांची अशी झाली होती सुटका
कारगिल युद्धावेळी फ्लाइट लेफ्टनंट नचिकेत मिग एअरक्राफ्टमध्ये होते. एलओसी म्हणजेच नियंत्रण रेषा ओलांडू नका असे त्यांना आदेश देण्यात आले होते. युद्धादरम्यान त्यांनी मिग विमानाद्वारे आक्रमण केलं. जेव्हा ते खाली आले तेव्हा क्षेपणास्त्रांच्या जोरावर उतरवण्यात आलं. पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतलं.
काही दिवसांनंतर मला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक संदेश मिळाला. त्यात भारतीय सैनिक नचिकेत यांची सुटका करण्यात यावी असं पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटलं होतं. हे त्यांचं सद्वर्तन होतं.
आम्ही त्यांची सुटका करू इच्छितो. मी ठीक आहे असं म्हटलं. मी त्यांना कुठे भेटू शकतो असं विचारलं. जिन्ना हॉलमध्ये या असं मला सांगण्यात आलं. मी कुठे विचारलं- त्यांनी जिन्ना हॉल असं सांगितलं.
जिन्ना हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, असं माझ्या लक्षात आलं. तुम्ही त्यांना परत कराल त्यावेळी तिथं प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असतील, असं मी विचारलं, त्यावेळी मला हो असं उत्तर मिळालं. त्यावेळी हे अशक्य आहे असं मी सांगितलं.
युद्धकैदींची सुटका होत असताना प्रसारमाध्यमांची उपस्थिती हे मी स्वीकारू शकत नाही. जगभरातील प्रसारमाध्यमांसमोर त्यांना एक उदाहरण म्हणून सादर करण्यात येत असेल तर ते मी स्वीकारू शकत नाही. खाजगी बैठकीत त्यांना आमच्याकडे सोपवा. मी दिल्लीला असं घडल्याचं सांगितलं. तुम्ही योग्य कृती केली आहे, असं दिल्लीकडून मला सांगण्यात आलं.
एअर चीफ यांनीही माझ्या कृतीचं समर्थन केलं.
त्यांची सुटका कशी केली जावी यासंदर्भात विचारणा करणारा फोन मला पाकिस्तानकडून आला. तुमच्यावरचा विश्वास उडाला आहे. तुम्ही त्यांना दूतावासात सोडा. तिथून आम्ही त्यांना घेऊन जाऊ. त्यानंतर त्यांना दूतावासात आणण्यात आलं. त्यानंतर आम्ही त्यांना घेऊन निघालो.
रात्री त्यांना एअर कमांडर जैस्वाल यांच्या घरी ठेवण्यात आलं. तुम्ही जहाजाने जाऊ नका असं मी त्यांना सांगितलं. त्यांची व्यवस्था एका गाडीत केली. त्यांच्याबरोबर वायू आणि नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. वाघा बॉर्डरवर त्यांना भारताकडे सुपुर्द करा असं सांगितलं. नचिकेत एक-दोन आठवडे पाकिस्तानच्या ताब्यात होते.
1965 युद्धावेळी मी सियालकोट इथे होतो. पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांना वाईट वर्तणुकीला सामोरं जावं लागलं असेल तर ते आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे.
मीडियात पायलटचा फोटो जाहीर करणं तसंच हात बांधून त्यांचा व्हीडिओ जारी करणं आंतरराष्ट्रीय युद्धनीतीविरुद्ध आहे.
नचिकेत यांना वाईट वर्तणुकीला सामोरं जावं लागलेलं नव्हतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)