पाकिस्तानकडून सौदी राजकुमाराचं जंगी स्वागत, 20 अब्ज डॉलरचे करार

पाकिस्तानमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानशी 20 अब्ज डॉलरचे करार जाहीर केले आहेत.

यामध्ये ग्वादरजवळ एका तेल शुद्धीकरणासाठी 8 अब्ज डॉलरची गुंतवणूक समाविष्ट आहे.

पाकिस्तानात पोहोचल्यावर राजकुमार म्हणाले, "पाकिस्तानचं भविष्य उज्ज्वल आहे. गेल्या वर्षीसुद्धा पाकिस्तानने पाच टक्के गतीने आर्थिक प्रगती केली आणि सध्याच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानचं भविष्य सोनेरी असेल."

ते म्हणाले, "त्यासाठीच आपण पाकिस्तानशी 20 अब्ज डॉलरचे करार केले असून हे पाकिस्तानातील सौदी गुंतवणुकीचे पहिले पाऊल आहे."

सौदी राजकुमारांचं स्वागत करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सेनाध्यक्ष कमर जावेद बावजा विमानतळावर उपस्थित होते.

इम्रान खान यांनी राजकुमारांना आपल्या गाडीत बसवून पंतप्रधान निवासस्थानी नेलं. ही गाडी ते स्वतः चालवत होते.

राजकुमारांच्या सन्मानासाठी पंतप्रधान निवासस्थानी खास भोजनाचे आयोजनही करण्यात आलं होतं. सौदी अरेबियात काम करणाऱ्या पाकिस्तानी मजुरांच्या समस्यांवरही इम्रान खान यांनी चर्चा केली.

इम्रान खान म्हणाले, "सौदी अरेबियामध्ये 25 लाख पाकिस्तानी नागरिक काम करतात. हे लोक आपले कुटुंब सोडून मेहनत करण्यासाठी सौदी अरेबियाला जातात आणि मोठा काळ आपल्या कुटुंबापासून दूर राहातात."

"हे लोक मला अगदी जवळच्या लोकांसारखे आहेत", असं सांगून इम्रान यांनी "या मेहनती लोकांसमोर अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि राजकुमारांनी त्याकडे लक्ष द्यावे" अशी अपेक्षा व्यक्त केली.

मजुरांच्या समस्यांबरोबरच हज यात्रेदरम्यान पाकिस्तानी नागरिकांना येणाऱ्या समस्यांचा मुद्दाही इम्रान यांनी चर्चेत आणला.

यावर सौदी राजकुमार म्हणाले, "आपल्याला पाकिस्ताननं सौदीमधील त्यांचा 'प्रतिनिधी'च समजावं. त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण काम करु."

तत्पुर्वी राजकुमार रविवारी संध्याकाळी पाकिस्तानात पोहोचले तेव्हा त्यांचं थाटात स्वागत करण्यात आलं. जेव्हा त्यांचं विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत आलं तेव्हा लढाऊ विमानांनी त्याची सोबत केली.

पाकिस्तानी लढाऊ विमानं त्यांच्या विमानाच्या उजव्या डाव्या बाजूला येऊन शिस्तबद्ध रचनेमध्ये त्यांना रावळपिंडीच्या नूर खान हवाईतळावर घेऊन आले.

यानंतर राजकुमार मोहम्मद बिन सलमान आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च समन्वय परिषदेची बैठक झाली.

अशा उच्चस्तरीय परिषदेची स्थापना करण्याचा प्रस्ताव सलमान यांनीच दिला होता. त्यामध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री सहभागी होतात.

राजकुमार पाकिस्तानात येण्यापूर्वी थोडाच वेळ आधी सौदीचे परराष्ट्रमंत्री आदिल अल जुबैर रावळपिंडीला पोहोचले. त्यांचं स्वागत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी यांनी केलं.

सौदी राजकुमार आज (सोमवारी) पाकिस्तानचे सेनाध्यक्ष जनरल कमर जावेद बाजवा यांचीही भेट घेतील.

सौदी राजकुमारांची भेट ऐतिहासिक आहे असं पाकिस्तानच्या नागरिकांना वाटतं. सौदी अरेबियाकडून मोठी आर्थिक मदत मिळेल असं त्यांना वाटतं.

मोहम्मद बिन सलमान एप्रिल 2017मध्ये सौदी अरेबियाचे राजकुमार झाले. त्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे.

या दोन दिवसांच्या दौऱ्याकडून पाकिस्तानला भरपूर अपेक्षा आहेत.

सध्या पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात आहे आणि आपल्या जवळच्या देशांशी मदतीची याचना करत आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात मजबूत लष्करी संबंधही आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)