You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेफ बेझोस: जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीला कोण ब्लॅकमेल करतंय?
एका मासिकाचे मालक माझ्या काही अयोग्य चित्रांसाठी मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी केला आहे.
National Enquirer नावाच्या एका मासिकावर त्यांनी आरोप केला आहे, जे American Media Inc (AMI) प्रसिद्ध करतं.
AMIने माझे खासगी मेसेज कसे मिळवले, यासाठी मी त्यांची चौकशी थांबवावी, म्हणून ते मला ब्लॅकमेल करू पाहत आहेत, असं बेझोस यांनी एका ब्लॉगवर सांगितलं.
गेल्या महिन्यात जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यानंतर काही तासांतच National Enquirerने बेझोस यांच्या विवाहबाह्य संबंधावर एक वृत्त प्रकाशित केलं होतं. यात त्यांचे काही खासगी मेसेजेसही होते.
बीबीसीनं यासंबंधी AMIची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून अद्याप काहीही प्रतिसाद मिळालेला नाही.
बेझोस यांचं म्हणणं काय?
गुरुवारी लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये बेझोस म्हणाले आहेत की त्यांच्या काही लोकांना AMIच्या प्रतिनिधींकडून धमकी आली, की जर त्यांनी AMIच्या वृत्तांकनासंबंधीची चौकशीची मागणी सोडली नाही तर त्यांचे आणि त्यांच्या प्रेयसीचे काही खासगी क्षणातले फोटो प्रसिद्ध केले जातील. टीव्ही होस्ट लॉरेन सँचेझ यांच्याशी बेझोस यांचे संबंध असल्याचं सांगितलं जातं.
बेझोस यांनी लिहिलं की "याशिवाय "माझ्या प्रेमसंबंधांबाबत National Enquirerचं कव्हरेज राजकीयदृष्ट्या प्रेरित नव्हतं, असं चुकीचं वक्तव्य देण्यासाठी या मासिकाने मला सांगितलं होतं."
बेझोस यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये काही ईमेल्सचा उल्लेख केला आहे. यानुसार AMIच्या वकिलांनी म्हटलं आहे की "जर बेझोस हे कबुल करतात की या वृत्तांकनाचा राजकीय हेतू असल्याचे आरोप बिनबुडाचे आहेत, तर आम्ही त्यांचे खासगी फोटो प्रसिद्ध करणार नाही."
"मी अशा दबावाला बळी पडणार नाही. त्यापेक्षा त्यांनी मला जे काही पाठवलं आहे, ते मी जसंच्या तसं प्रसिद्ध करतोय," असंही बेझोस म्हणाले.
ट्रंप यांचा उल्लेख का?
पण या ब्लॉगमध्ये बेझोस यांनी सुरुवातीला AMIचा संबंध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी जोडला आहे. बेझोस हे अमेरिकेच्या 'वॉशिंगटन पोस्ट' वृत्तपत्राचेही मालक आहेत, जे ट्रंपविरोधी भूमिका घेण्यासाठी ओळखलं जातं.
"वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतल्यामुळे मी काही शक्तिशाली लोकांशी वैर घेतलंय आणि यात डोनाल्ड ट्रंप यांचाही समावेश आहे, कारण ते AMIचे मालक डेव्हिड पेकर यांचे मित्र आहेत," असं बेझोस यांनी लिहिलं होतं.
AMIनं नुकतंच मान्य केलं आहे की, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान ट्रंप यांच्याबरोबरच्या कथित संबंधांबाबत गप्प राहण्यासाठी एका 'प्लेबॉय' मॉडेलला दीड लाख डॉलर देण्यात आले होते, आणि या व्यवहारात AMIने समन्वयकाची भूमिका निभावल्याचं मान्य केलं होतं.
पण या व्यवहारातील तपासात सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यामुळे AMIविरुद्ध खटला दाखल केला जाणार नाही, असं मॅनहॅटनच्या चौकशी अधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये स्पष्ट केलं होतं.
मात्र ट्रंप यांचे माजी वकील मायकल कोहन यांनी आधीच हे पैसे त्या प्लेबॉय मॉडेलला पुरवल्याची कबुली दिली होती. हे व्यवहार प्रचार मोहिमेच्या आर्थिक कायद्याचं उल्ल्ंघन होते.
बेझोस यांच्या प्रतिमेचं काय?
"साहजिकच माझे ते खासगी फोटो प्रसिद्ध व्हायला नको," असंच वाटत असल्याचं बेझोस या पोस्टमध्ये म्हणाले. "पण पत्रकारितेचा वापर लोकांविरुद्ध शस्त्र म्हणून करण्यासाठीही AMI प्रसिद्ध आहे."
"पण मला त्यांच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नाही, तसंच राजकीय आरोप-प्रत्याकोपांमध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये गुंतायचं नाहीये. मी स्वतःसाठी उभा राहून याविरुद्ध बोलेन," असं त्यांनी म्हटलंय.
त्यांच्या या ब्लॉगमध्ये National Enquirerचे संपादक डिलन हॉवर्ड यांनी बेझोस यांना पाठवलेल्या मेलचे 10 फोटो आहेत. बातमी संदर्भातल्या कामकाजादरम्यान हे फोटो मिळाल्याचं डीलन हॉवर्ड यांनी म्हटलं आहे.
बेझोस आणि सँचेझ यांच्या कथित संबंधांविषयी 9 जानेवारीला एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यात डीलन हॉवर्ड आणि National Enquirerच्या आणखी दोन पत्रकारांचं नाव होतं.
न्यू यॉर्करचे लेखक रॉनन फॅरो यांनीही आरोप केला आहे की त्यांना तसंच आणखी एका प्रसिद्ध पत्रकारालासुद्धा AMIनं अशीच धमकी दिली आहे.
"AMIला वाटतं की हे फोटो अॅमेझॉनच्या शेअरधारकांना दाखवणं आवश्यक आहे, जेणेकरून माझी व्यावसायिक निर्णयक्षमता किती भयंकर आहेत हे लोकांना कळावं," असं बेझोस या ब्लॉगमध्ये सांगतात.
पण अॅमेझॉनची कामगिरी स्वत:च बोलते, असं त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)