You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेफ बेझोस : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा घटस्फोट होणार
ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अॅमेझॉनचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) जेफ बेझोस आणि मॅकेन्झी बेझोस विभक्त होणार आहेत. लग्नाला 25 वर्षं झाल्यानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
दोघांनीही यासंदर्भात ट्वीटरवर सविस्तरपणे लिहिलं आहे.
अनेक वर्षं एकमेकांच्या प्रेमात राहिल्यानंतर तसंच काही महिने एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच असू.
काही दिवसांपूर्वीच अॅमेझॉन कंपनीने मायक्रोसॉफ्टला मागे टाकत जगातील सगळ्यांत श्रीमंत कंपनी होण्याचा मान मिळवला होता.
54 वर्षीय जेफ यांनी 25 वर्षांपूर्वी अॅमेझॉनची मुहूर्तमेढ रोवली होती. ब्लूमबर्गने तयार केलेल्या जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ अव्वल स्थानी आहेत. जेफ यांची एकूण संपत्ती 137 अब्ज डॉलर्स एवढी आहे.
मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांच्या तुलनेत जेफ यांची संपत्ती 45 अब्ज डॉलर्स अधिक आहे.
जेफ यांच्या पत्नी 48 वर्षीय मॅकेन्झी साहित्यिक आहेत. त्यांनी दोन पुस्तकं लिहिली आहेत. 2005 मध्ये I the tasting of luther तर 2013 मध्ये I traps ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.
"आम्ही दोघं अतिशय नशीबवान आहोत. आम्ही एकमेकांचे जोडीदार झालो, एकमेकांना साथ दिली. इतकी वर्ष संसार केला. आम्ही एकमेकांचे आभारी आहोत. आम्ही एकत्र उत्तम आयुष्य जगलो. लग्नाचं जोडपं म्हणून आम्ही भविष्याची काही स्वप्नं पाहिली. आईवडील, मित्र, जोडीदार म्हणून अनेक भूमिका निभावल्या. अनेक प्रकल्पांमध्ये एकत्र कामही केलं. खूप मजा आली. आमच्या नात्याचं नाव आता वेगळं असेल, पण आम्ही एक कुटुंबच असू. आम्ही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र राहू," असं दोघांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.
गेल्याच वर्षी या जोडीने एक चॅरिटी कार्यक्रम सुरू केला होता. 'द डे वन' असं या कार्यक्रमाचं नाव होतं. बेघर नागरिकांना घरं मिळवून देणं आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं.
जेफ आणि मॅकेन्झी यांना चार मुलं आहेत. त्यांची स्वतःची तीन मुलं आहेत आणि एका मुलीला त्यांनी दत्तक घेतलं आहे. जेफ यांच्याशी एका मुलाखतीदरम्यान ओळख झाल्याचं मॅकेन्झी यांनी 2013 मध्ये वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. जेफ यांनीच मॅकेन्झी यांची मुलाखत घेतली होती.
तीन महिने एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 1993 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर एका वर्षात जेफ यांनी अॅमेझॉन कंपनी सुरू केली. त्यावेळी अॅमेझॉनवर केवळ पुस्तकांचीच विक्री होत असे.
हळूहळू अॅमेझॉनचा पसारा वाढत गेला आणि काही वर्षांतच अॅमेझॉन ई-कॉमर्स क्षेत्रातली अव्वल कंपनी ठरली.
या आठवड्यात सोमवारी अमेरिकेचा शेअर बाजार बंद झाला तेव्हा अॅमेझॉन कंपनीचं मूल्य 797 अब्ज डॉलर्स एवढं प्रचंड होतं. त्यावेळी मायक्रोसॉफ्टचं मूल्य 789 अब्ज डॉलर्स एवढं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)