विजय माल्ल्या प्रत्यार्पण : ब्रिटनने भारताला आतापर्यंत किती आरोपी सोपवले?

विजय मल्या

फोटो स्रोत, AFP

भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या उद्योगपती विजय माल्ल्यांच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनचे गृह सचिव साजिद जावेद यांनी 4 फेब्रुवारीला मंजुरी दिली.

या मंजुरीनंतर गुन्हेगार प्रत्यार्पणाचा विचार करता विजय माल्ल्यांचं प्रकरण हे अनेक अर्थांनी वेगळं ठरणार का, याचा आढावा बीबीसीचे कम्युनिटी अफेअर्स तज्ज्ञ साजिद इक्बाल यांनी घेतला आहे.

लंडनच्या मुख्य न्यायदंडाधिकारी एमा अर्बटनॉट यांनी दोन महिन्यांपूर्वीच माल्ल्या यांची प्रत्यार्पणाची याचिका फेटाळून लावली होती. माल्ल्या यांना खटला चालवण्यासाठी भारतात परत पाठवण्याचा आदेश त्यांनी दिला होता.

वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयानं 10 डिसेंबर 2018 ला माझ्याविरोधात दिलेल्या निर्णयानंतरच मी अपील करणार असल्याचं माल्ल्या यांनी स्पष्ट केलं होतं.

मात्र गृह सचिवांच्या निर्णयाआधी अपील करण्याची संधी मला मिळाली नाही. आता मी अपीलाची प्रक्रिया सुरू करेन, असं 4 फेब्रुवारीला प्रत्यार्पणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर विजय माल्ल्या यांनी तातडीनं ट्वीट केलं होतं.

विजय माल्ल्यांना प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

विजय मल्ल्या

फोटो स्रोत, Reuters

किंगफिशर एअरलाइन्सचे प्रमुख असलेल्या विजय माल्ल्या यांनी मार्च 2016 मध्ये भारतातून पलायन केलं होतं. भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवून माल्ल्या यांनी पलायन केलं होतं.

विजय माल्ल्या मात्र वारंवार आपण पळून आलो नाही, असंच सांगत आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यातच आपण सर्व रक्कम परत करण्याचं बिनशर्त मान्य केलं होतं, असाही माल्ल्या यांचा दावा आहे.

परागंदा गुन्हेगारांची लांबलचक यादी

ब्रिटनच्या न्यायालयात प्रत्यार्पणाचा खटला चालविण्यात आलेले विजय माल्ल्या हे एकमेव हाय प्रोफाईल भारतीय नाहीत. अशा प्रकरणात अडकलेल्या भारतीयांची यादी बऱ्यापैकी मोठी आहे.

भारत आणि ब्रिटनमध्ये 1992 मध्ये गुन्हेगार हस्तांतरण करार करण्यात आला होता. त्यानंतर हस्तांतरणासंदर्भात समोर आलेलं पहिलं प्रकरण होतं इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिर्चीचं. मात्र नंतर तो खटला काढून टाकण्यात आला आणि भारतीय सरकारनं मिर्ची प्रकरणातील कायदेविषयक खर्चाची पूर्तता केली.

एप्रिल 1995 मध्ये स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी मिर्चीच्या घरावर छापा टाकला आणि त्याला अटक केली. त्याच्यावर 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात सहभागी असल्याबद्दल तसंच अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते.

विजय माल्ल्या

हा खटला कोर्टात येईपर्यंत इक्बाल मिर्चीवरचे हे आरोप काढून टाकण्यात आले. त्याऐवजी लंडनमधल्या आपल्या राइस मिलच्या व्यवस्थापकाची हत्या केल्याचा ठपका मिर्चीवर ठेवला गेला. मिर्चीच्या मिलमधली नोकरी सोडल्यानंतर लगेचच या व्यवस्थापकाची मुंबईमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

बो स्ट्रीट मॅजिस्ट्रेटनं मिर्चीच्या हस्तांतरणाची मागणी फेटाळून लावली. भारतानंही या प्रकरणी पुन्हा अपील केलं नाही आणि मिर्चीच्या खटल्यासंबंधीचा सर्व खर्च देऊन टाकला.

हनीफ टायगरचं हस्तांतरण अजूनही विचाराधीन

ब्रिटनच्या न्यायालयात चाललेला अजून एक हाय प्रोफाईल खटला होता मोहम्मद उमेरजी पटेल उर्फ हनीफ टायगरविरुद्धचा. सुरतमध्ये जानेवारी 1993 ला झालेल्या एका स्फोटाप्रकरणी भारतीय पोलिसांना हनीफ हवा होता. बाजारपेठेत झालेल्या या स्फोटात एका शाळकरी मुलीनं प्राण गमावला होता.

एप्रिल 1993 मध्ये रेल्वे स्टेशनवर झालेल्या एका स्फोटाचाही आरोप हनीफ टायगरवर होता. या स्फोटात 12 जण जखमी झाले होते.

टायगर हनीफने प्रत्यार्पण टाळण्यासाठी ब्रिटीश गृह सचिवांकडे 2013 साली अर्ज केला होता. हा अर्ज अजूनही विचाराधीन असल्याचं वृत्त 2017 साली माध्यमांनी दिलं होतं. अर्जाच्या स्थिती आजही तशीच कायम असल्याची माहिती गृह खात्याच्या प्रवक्त्यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

समीरभाई पटेलचं यशस्वी हस्तांतरण

समीरभाई विनूभाई पटेल यांचं हस्तांतरण मात्र यशस्वी झालं होतं. 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीशी संबंधित काही खटल्यांत समीरभाई पटेल भारताला हवे होते. ब्रिटननं भारताची हस्तांतरणाची मागणी मान्य केली. पटेल यांनीही हस्तांतरणाविरुद्ध अपील केलं नाही.

समीरभाई पटेल यांना 9 ऑगस्टला अटक करण्यात आली. 22 सप्टेंबरला गृह सचिव अंबर रड यांनी हस्तांतरणाच्या आदेशावर स्वाक्षरी केली. भारताकडे हस्तांतरित झाल्यानंतर पटेल यांना दोषी ठरवण्यात आलं आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती नाही.

भारत-ब्रिटनदरम्यान 1993 ला झालेल्या हस्तांतरण करारानंतर आतापर्यंत भारतानं तीन गुन्हेगारांना ब्रिटनच्या ताब्यात दिलं आहे. मनिंदरपाल सिंह कोहली, सोमय्या केतन सुरेंद्र आणि कुलविंदर सिंह उप्पल या तीन गुन्हेगारांना भारतानं ब्रिटनकडे हस्तांतरित केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)