अमेरिकेत बेकायदेशीर विद्यापीठात प्रवेश घेतल्याप्रकरणी अनेक भारतीय विद्यार्थ्यांना अटक

एका बेकायदेशीर विद्यापीठात प्रवेश घेण्याच्या प्रकरणात अमेरिकेमध्ये 130 परदेशी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक विद्यार्थी भारतीय आहेत.

भारताने याबाबत नवी दिल्लीमधील अमेरिकन दूतावासाकडे चिंता व्यक्त केली आहे. या विद्यार्थ्यांना तात्काळ कायदेशीर मदत देण्याची मागणी भारताने केली, असं PTIने म्हटलं आहे.

या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष ठेवण्यात येत असून, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

भारताने व्यक्त केलेल्या चिंतेवर अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने PTIला सांगितलं, "भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आम्हाला याबाबत सांगितलं आहे. या विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे."

भारतीय विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असून, या प्रकरणाला त्याचप्रकारे पाहण्यात यावं, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे, "या प्रकरणाची सर्व माहिती भारताला देण्यात यावी तसेच पुढील प्रगती नियमित कळवली जावी. विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने आमच्या वकिलांनी पीडितांशी संपर्क केला आहे."

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आता पर्यंत 30 विद्यार्थ्यांनी आमच्या वकिलांशी संपर्क केला असून आणखी विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असं ट्वीट केलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाचे हेल्पलाईन नंबरही दिले आहेत - +1-202-322-1190 और +1-202-340-2590. ईमेल[email protected]

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)