जपान आणि युरोपियन युनियन एकत्र; जगातील सर्वांत मोठा व्यापारी करार

जपान आणि युरोपियन युनियन यांच्यात जगातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा व्यापारी करार झालेला आहे. जागतिक जीडीपीचा तिसरा हिस्सा आणि 63.50 कोटी लोकसंख्या असा या कराराचा परीघ आहे.

अर्थात जर कोणत्याही कराराशिवाय ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं, तर ब्रिटनला या कराराचा कोणताही लाभ होणार नाही.

या करारामुळे जपानला वाईन आणि चीज कमी किमतीत तर युरोपियन युनियनला वाहनं कमी किमतीत मिळणार आहेत.

अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेडवॉरच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा करार झालेला आहे.

युरोपियन युनियनमधून जपानला मोठयाप्रमाणावर दुग्धजन्य आणि अन्नपदार्थांची निर्यात होते. नव्या करारानुसार बीफवरील निर्यात कर 40 टक्के, चॉकलेटवरील निर्यात कर 30 टक्के तर वाईनवरील 15 टक्के आणि चीजवरील 40 टक्के इतका कमी केला जाणार नाही. त्यामुळे युरोपियन युनियनची निर्यात वाढेल आणि रोजगार निर्माण होईल. तर दुसरीकडे जपानमधून युरोपियन युनियनमध्ये निर्यात होणाऱ्या वाहनांवरील कर 2027पर्यंत शून्य टक्के होणार आहे. त्यामुळे जपानच्या जीडीपीत 1 टक्के वाढ होणार आहे. सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनासुद्धा हा करार फायद्याचा ठरणार आहे, कारण या कंपन्या आता सार्वजनिक क्षेत्रातील काम मिळवू शकणार आहेत.

सर्वसाधारणपणे जपान मुक्त व्यापाराचा प्रणेता मानला जात नाही, पण या करारामुळे हे आता बदलणार आहे.

यापूर्वी ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कॅनडा, चिली, जपान, मलेशिया, मेक्सिको, पेरू, न्यूझिलंड, सिंगापूर आणि व्हिएतनाम या देशांत Comprehensive and Progressive Agreement for Trans-Pacific Partnership (CPTPP) व्यापार करार झालेला आहे.

या करारामध्ये जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचाही उल्लेख आहे.

जपान, युरोप आणि पॅसिफिकच्या सीमेवरील काही देश मुक्त व्यापारसाठी करार करत असताना अमेरिका आणि चीन या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांत मात्र उलट परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे या देशांतील काही कंपन्या त्यांचं मार्केट गमावतील अशी स्थिती आहे. उदाहरणात CPTPP देशांत अमेरिकेतील वाहनांच्या तुलनेत जपानची वाहनं अधिक स्वस्त होतील. तर जपानमध्ये अमेरिकेतून येणाऱ्या बीफच्या तुलनेत युरोपमधील बीफ स्वस्त असेल.

जपान आणि अमेरिकेत द्विपक्षीय व्यापारी करार होण्यासाठी चर्चा सुरू होणार आहेत. तर युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारासाठीच्या तडजोडी थांबलेल्या आहेत. तर जपान, दक्षिण कोरिया आणि चीन यांच्यातील व्यापारी कराराला अजून मूर्त स्वरूप आलेलं नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)