You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीन आणि हाँगकाँग यांना जोडणारा तब्बल 55 किलोमीटरचा भन्नाट पूल
हाँगकाँग- झुआई-मकाऊ यांना जोडणारा असा हा 55 किलोमीटरचा प्रशस्त सेतू आहे. पर्ल नदीच्या विस्तीर्ण पात्रातून जाणारा हा पूल अभियांत्रिकी आणि स्थापत्यशास्त्राची किमया मानला जात आहे.
दोन लिंक रोडसह या पुलाची लांबी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को गेट ब्रिजच्या 20 पटींनी जास्त आहे.
भूकंप, या भागात येणारी चक्रीवादळं तसंच धडकणारी जहाजं या सगळ्यांचा प्रतिकार करू शकेल, अशा रीतीने या पुलाची उभारणी करण्यात आली आहे.
पुलामुळे जहाजांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पुलाचा 6.7 किलोमीटरचा टप्पा पाण्याखालून काढण्यात आला आहे. दोन कृत्रिम बेटांद्वारे पाण्याखालून हा मार्ग जातो.
या पुलाचा मार्ग हाँगकाँगमधून जाण्यायेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या क्षेत्रात येतो. त्यामुळे पुलाच्या उंचीला काही विशिष्ट मर्यादा आहेत.
2009मध्ये या पुलाच्या उभारणीचं काम सुरू झालं. मात्र सुरक्षितता तसंच अन्य कारणांमुळे पुलाचं काम पूर्णत्वास जाण्यास 2018 वर्ष उजाडलं. या पुलासाठीचा खर्च सातत्याने वाढत गेला. पूर्णत्वास जाताना या पुलासाठीचा आलेला खर्च 20 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड आहे.
या पुलाचं उद्घाटन 2016 मध्ये होणार होतं. यंदाही हा पुलाचं उद्घाटन होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अवघ्या महिनाभरापूर्वी पुल जनतेसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पुलाच्या उभारणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च सातत्याने वाढत गेलाच. मात्र प्रत्यक्ष उभारणी सुरू असताना नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
या पुलामुळे मकाऊ आणि हाँगकाँग या दोन विशेष प्रशासकीय विभागांसह चीनचा मुख्य प्रदेश एकमेकांशी जोडला जाणार आहे. विविध राजकीय आणि कायदेशीर नेतृत्व असलेल्या प्रांतातून या पुलाची वाटचाल होते.
पुलावरून बस तसेच अन्य खासगी गाड्यांच्या माध्यमातून वाहतूक सुरू होईल. स्थानिक टॅक्सींना या पुलावर प्रवेश असणार नाही. मात्र काही खासगी गाड्यांना या पुलावर प्रवेश असेल.
हाँगकाँगहून चीनच्या मुख्य भागात जाण्यासाठी परवाना लागतो. पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 55 किलोमीटरच्या मार्गात 2 जकात नाक्यांची उभारण्यात आली आहे.
या पुलाच्या उभारणीपूर्वी या प्रवासासाठी चार तास लागत असत. या पुलामुळे अवघ्या अर्ध्या तासात हे अंतर गाठता येणार आहे.
हाँगकाँगमधील काही व्यक्तींनी या पूल उभारणीवर टीका केली आहे. या पुलाची आवश्यकता नाही, केवळ हाँगकाँगला चीनच्या जवळ आणण्याच्या दृष्टीने या पुलाची उभारणी करण्यात आल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)