आयफोन आता तुमच्या आमच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत

अॅपल कंपनीच्या उत्पादनांची किंमत ऐकली की सामान्यांच्या आंगावर काटा येतो. अॅपल कंपनीची उत्पादनं बाळगणं हे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं.

मात्र याचअॅपल कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वस्त आयफोनची निर्मिती करण्याचे संकेत कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी दिले आहेत. त्यामुळे आजपर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेला आयफोन आता तुमच्याआमच्या हातातही दिसू शकतो.

नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाहीच्या आकडेवारीत कंपनीच्या नफ्यात 15% घट झाली आहे. तर उत्पन्नातही 5 टक्क्यांची घट झाली आहे. यावर्षी कंपनीचं उत्पन्न 84.3 बिलियन डॉलर इतकं झालं आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील या अग्रणी कंपनीने गुंतवणूकदारांना या महिन्याच्या सुरुवातीलाच उत्पन्नात घट होणार असल्याची कल्पना दिली होती.

चीनमध्ये आर्थिक मंदी आहे, त्यामुळेही ही परिस्थिती ओढवली असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक म्हणाले की अॅपलच्या उत्पादनाच्या किंमतींमुळेही ग्राहकांना हे थोडं खर्चिक वाटत असावं.

डॉलरच्या किमती सशक्त असल्यामुळेही अॅपलची उत्पादनं महाग झाल्याचं ते म्हणाले. नवीन बाजारपेठेतही वाढलेल्या किमतीचा फटका अॅपलला बसला आहे.

त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीपासून फोनच्या किमतीची पुर्नरचना करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून चलनाच्या किमतीचा फटका ग्राहकांना बसणार नाही.

31 मार्चला संपणाऱ्या तिमाहीत कंपनीने 55-59 बिलियन डॉलर असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. प्रत्येक वर्षी उत्पन्नात 3-4 टक्क्यांची घट होत असतेच.

नव्याने उदयाला येत असलेल्या बाजारपेठेत ही परिस्थिती राहीलच असं अॅपलचे मुख्य आर्थिक अधिकारी लुका मेस्त्री यांनी सांगितलं.

मात्र फक्त अॅपलचीच ही परिस्थिती नाही. जागतिक पातळीवर स्मार्टफोन्सची निर्यात 5 टक्क्यांनी कमी झाली आहे. असं बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या कॅनलिस या कंपनीने सांगितलं आहे.

ऑक्टोबरपासून कंपनीच्या शेअरमध्ये एक तृतीयांश घट झाली आहे. आयफोनच्या लोकप्रियतेत घट झाल्याच्या भीतीने ही घसरण झाली आहे.

त्यातच प्रत्येक तिमाहीत आयफोन, आयपॅड आणि किती मॅकबुक विकले गेले याची माहिती देण्यास कंपनीने नकार दिल्यावर ही भीती आणखीच गडद झाली.

मात्र अॅपल या परिस्थितीतून तातडीने सावरताना दिसत आहे त्यामुळे मंगळवारी अॅपलच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

ग्रेटर चायना भागात तिमाहीतील विक्रीत 25 टक्क्यांची घट झाली आहे. त्यात हाँगकाँग, तैवान यांचा समावेश आहे. युरोपात हे प्रमाण 3 टक्के आहे. मात्र अमेरिकेत अॅपल उत्पादनांच्या विक्रीत पाच टक्क्यांची वाढ झाली आहे.

"आम्ही आमच्या उत्तपन्नाचं उद्दिष्ट गाठण्यात कमी पडलो हे खरं आहे मात्र या तिमाहीच्या निकालात असं दिसतं की आमच्या कंपनीची मुळं अगदी खोलवर आणि विस्तृतपणे रुजली आहेत." असं टीम कूक म्हणाले.

बीबीसीचे तंत्रज्ञान प्रतिनिधी डेव्ह ली यांच्या मते या तिमाहीचा निकाल गेल्या काही वर्षांतला सगळ्यात निराशाजनक निकाल आहे. तरी अॅपल कंपनीत अनेक बदल घडून येत आहेत. ते आता हार्डवेअरवर जास्त अवलंबून नाहीत.

सद्यस्थितीत हा बदल योग्य मार्गावर असल्याचंही ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)