कॅन्सर आणि संधिवात बरा करणाऱ्या गुणकारी अंड्याचा शोध

कॅन्सरचे काही प्रकार किंवा संधिवातासारख्या प्रचंड वेदनादायी आजारावर वर्षानुवर्षं औषधं-गोळ्या घेणाऱ्यांसाठी एक नवीन उपचार संशोधकांनी शोधून काढला आहे. तो म्हणजे अंडं खाणं.

अर्थात हे आपलं नेहमीचं अंडं नाहीये. जनुकीय परिवर्तन केलेल्या कोंबडीच्या अंड्यातच कॅन्सर तसंच संधिवातावर परिणामकारक औषधं असतील असं संशोधन नुकतंच करण्यात आलं आहे.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कारखान्यात उत्पादित केलेल्या औषधांपेक्षा कोंबडीच्या अंड्यातून औषधं देणं, हे जवळपास 100 पटीनं स्वस्त पडेल. येत्या काही वर्षांत जनुकीय बदल केलेल्या कोंबडीच्या अंड्यांचं उत्पादन व्यावसायिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणात घेता येईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

कोंबड्यांची उत्तम देखभाल

या प्रक्रियेत कोंबड्यांना कोणतीही इजा पोहोचवली जात नाही किंवा त्यांना अतिरिक्त खाऊ-पिऊ घातलं नाही, असं एडिनबर्गच्या रोझलिन टेक्नॉलॉजीच्या डॉ. लिसा हेरॉन यांनी स्पष्ट केलं.

"त्यांना अतिशय प्रशस्त कुंपणात सोडलं जातं. त्यांना नीट खाणं आणि भरपूर पाणी दिलं जातं. अतिशय प्रशिक्षित अशा तज्ज्ञांकडून या कोंबड्यांची काळजी घेतली जाते. एकूण इथे या कोंबड्या एकदम मजेत असतात."

त्यांच्यासाठी अंडी घालण्याची प्रक्रियाही अतिशय सामान्य असते. कोंबड्यांच्या आरोग्यावर किंवा अंड्यांच्या गुणवत्तेवर कोंबड्यांमध्ये केलेल्या जनुकीय परिवर्तनाचा कोणताही परिणाम होत नसल्याचंही डॉ. लिसा हेरॉन यांनी सांगितलं.

यापूर्वीही संशोधकांनी शेळी, ससे आणि कोंबड्यांमध्ये जनुकीय परिवर्तन घडवून आणलं होतं. त्यांचं दूध किंवा अंडी ही प्रोटीन थेरपीसाठी कसं वापरता येईल, यासाठी हे जनुकीय परिवर्तन घडवून आणण्यात आलं होतं.

आर्थिकदृष्ट्या फायदेशीर

पण आता कोंबड्यांबद्दल नव्यानं जे संशोधन करण्यात आलं आहे, ते पूर्वीच्या प्रयत्नांच्या तुलनेत परिणामकारक असून अधिक उत्पादक आणि आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे.

कोंबड्यांच्या अंड्यापासून तयार केलेलं औषध हे कारखान्यातील औषधांपेक्षा 10 ते 100 पटीनं स्वस्तात मिळू शकेल. सध्या आम्ही औषधाची किंमत 10 टक्क्यांनी कमी करण्याच्या प्रयत्नात आहोत, असं डॉ. हेरॉन यांनी म्हटलं.

सर्वांत मोठी बचत नेमकी कुठे होते? कोंबड्यांची खुराडी बांधण्यासाठी येणारा खर्च हा अत्यंत भव्य, निर्जंतुक कारखाने उभं करण्यापेक्षा अतिशय कमी असतो.

शरीर महत्त्वाची रसायनं किंवा प्रथिनं तयार करू शकत नसल्यामुळंच अनेक आजार होत असतात. अशा विशिष्ट प्रथिनांची कमतरता भरून काढणारी औषधं दिली तर हे आजार बरे होऊ शकतात. ही औषधं कंपन्यांकडून कृत्रिमरीत्या तयार केली जातात आणि अत्यंत महागडी असतात.

रोगप्रतिकारक प्रथिनांचं प्रमाण

डॉ. हेरॉन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी औषधोत्पादनांचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला. मनुष्याच्या शरीरात प्रथिनं तयार करणार जनुक त्यांनी कोंबडीच्या शरीरात सोडलं. अंड्याचा पांढरा भाग बनवणाऱ्या गुणसूत्रामध्ये हे जनुक सोडण्यात आलं.

या कोंबड्यांनी घातलेली अंडी फोडून पाहिल्यानंतर डॉ. हेरॉन यांना आढळून आलं, की या अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिनं आहेत.

हेरॉन यांच्या टीमनं प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन प्रथिनांवर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांपैकी एक IFNalpha2a होतं. हे प्रथिनं विषाणूंना विरोध करण्याचं काम करतात. तसंच त्यामध्ये कॅन्सर प्रतिरोधक गुणधर्मही असतात. दुसरा घटक होता CSF. हा घटक ऊतींची स्वतःची झीज भरून काढण्याची क्षमता वाढवतो.

तीन अंड्यांचं सेवन म्हणजे औषधाचा एक डोस. एक कोंबडी वर्षभरात 300 अंडी घालते. कोंबड्यांची पुरेशी संख्या असेल तर व्यावसायिक तत्त्वावर अंड्यांचं उत्पादन घेणं शक्य आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीयेत. या औषधाचे मानवी शरीरावरील परिणाम आणि नियमनासाठीच्या आवश्यक बाबींची पूर्तता यासाठी 10 ते 20 वर्षं लागतील, असा संशोधकांचा अंदाज आहे.

एडिनबर्ग इथल्या रोझलिन टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापक हेलेन सांग यांनी म्हटलं, "आम्ही सध्या तरी मानवी शरीरासाठी औषधं तयार करत नाहीये. मात्र आमच्या प्रयोगावरून कोंबड्यांचा वापर करून प्रथिनं निर्माण करणारी औषधं बनवणं आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरू शकतं, हे सिद्ध झालं आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)