प्रलयाचा धोका दाखवणाऱ्या घड्याळात 'मध्यरात्रीला उरली आहेत दोन मिनिटं'

"जगाचा अंत जवळ आला आहे! 'प्रलय' अगदी जवळ आला आहे," अशी भाकितं आपण नेहमी ऐकतो. जगाच्या अंताला काही वर्षं बाकी आहेत, असं देखील भाकीत काही जणांनी बऱ्याचदा केलं आहे. या भाकितांकडे आपण अनेकदा कानाडोळा करतो, त्यांची थट्टा उडवतो, त्यावर बनलेले डझनभर चित्रपट पाहतो आणि आपापल्या जीवनात पुन्हा रमतो.

पण म्हणजे ही बातमी वाचून पूर्ण होण्याच्या आत आता वैज्ञानिकांनी एक इशारा दिला आहे - जगाच्या अंताला अवघी 'दोन मिनिटं उरली' आहेत. जगाचा अंत होईल की काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

त्याचं उत्तर 'हो' आणि 'नाही' असं दोन्ही आहे.

वैज्ञानिकांच्या मते जगाचा अंत इतका जवळ आला आहे की आपल्याला आत्ताच काही करावं लागणार आहे. जगाच्या परिस्थितीबाबत गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, अन्यथा आपला अंत दोनच मिनिटांवर आहे असं समजा, असंच वैज्ञानिकांना सूचित करायचं आहे.

आणि तसं भाकित वर्तवणारं, किंबहुना तसा इशारा देणारं एक घड्याळ या वैज्ञानिकांनी बनवलं आहे.

काय आहे डूम्स डे क्लॉक?

'बुलेटिन ऑफ द ऑटोमिक सायन्टिस्ट्स'नं (BAS) 1947 साली एक घड्याळ तयार केलं होतं. त्याला Dooms Day Clock असं म्हणतात. या घड्याळाचे काटे वैज्ञानिकांकडून हाताने सरकवले जातात. घड्याळातली मध्यरात्र म्हणजे प्रलयाच्या घटिकेचं प्रतीक आहे.

1947ला जेव्हा या घड्याळाची स्थापना करण्यात आली, तेव्हापासून या संस्थेतील वैज्ञानिक एकत्र येतात आणि अंदाजे किती वेळ आपल्या हातात शिल्लक आहे, हे जाहीर करतात.

1947 मध्ये प्रलयाला सात मिनिटं बाकी आहेत, असं वैज्ञानिकांनी म्हटलं होतं, तर 1991 मध्ये प्रलयाला 17 मिनिटं बाकी आहेत असं वैज्ञानिकांनी सांगितलं होतं. आतापर्यंत एकूण 23 वेळा वैज्ञानिकांनी हे घड्याळ 'सेट' केलं आहे.

कोणकोणते घटक या घड्याळ्याला प्रभावित करतात?

राजकीय परिस्थिती, युद्धजन्य स्थिती, हवामान बदल या सर्व गोष्टींचा विचार करून प्रलय येण्यास किती वेळ बाकी आहे, हे वैज्ञानिक प्रातिनिधिक स्वरूपात सांगतात. जितका वेळ कमी तितका धोका अधिक, असं सांगण्याचा त्यांचा उद्देश असतो.

सर्व घटक आणि परिस्थिती लक्षात घेऊन ते वेळ किती बाकी आहेत हे सांगतात. कधी-कधी वेळ वाढू देखील शकतो. उदाहरणार्थ, 1949ला सोव्हियत युनियननं पहिली अणू चाचणी केली होती. त्यावेळी वैज्ञानिकांनी सांगितलं होतं की प्रलयाला अवघी तीन मिनिटं बाकी आहेत. पुढील वर्षी तो वेळ वाढला.

पण पुन्हा 1953 ला अमेरिकेनं हायड्रोजन बाँबची चाचणी केली तर जगाच्या अंताला दोन मिनिटं बाकी आहेत, असं ते म्हणाले होते. त्यानंतर जशी-जशी जगाची स्थिती बदलू लागली, जगात शांतता नांदू लागली तसा वेळ अधिक झाल्याचं देखील त्यांनी घोषित केलं होतं.

गेल्या दोन वर्षांपासून हे घड्याळ स्थिर आहे. जगाचा अंत दोन मिनिटांवर आला आहे, असं वैज्ञानिक गेल्या दोन वर्षांपासून सांगत आहेत. घड्याळ स्थिर होणं हे देखील तितकंच धोक्याचं आहे, असं देखील वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

उत्तर कोरिया आणि अमेरिकेत अण्वस्त्रांवरून निर्माण झालेला तणाव कमी झाला आहे, ही आशादायी बाब असल्याचं वैज्ञानिक म्हणाले. पण हवामान बदल ही एक मोठी समस्या असल्याचंही ते म्हणाले.

BASच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रेचल ब्रॉन्सन म्हणाल्या की "परिस्थिती खूप गंभीर आहे."

'फेक न्यूज'मुळे देशादेशातील लोकशाही धोक्यात आल्याचं वक्तव्य या कार्यक्रमाला हजर असलेले संशोधक हर्ब लिन यांनी केलं आहे. त्यांनी तर याला 'information warfare किंवा माहितीसाठीचं युद्ध' असं म्हटलं आहे.

"सत्याची जागा आज राग आणि कल्पनांनी घेतली आहे. हे महाभयंकर जग आहे," असं ते म्हणाले.

या कार्यक्रमाचा उद्देश लोकांना घाबरवण्याचा नसून लोकांना जागरूक करण्याचा असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जगभरातील मोठे मोठे विचारवंत आणि वैज्ञानिक एकत्र येतात आणि जगासमोर असलेल्या आव्हानांची चर्चा करतात. अण्वस्त्र, हवामान बदल यापासून पृथ्वीला कसा धोका आहे, याची जाणीव ब्रॉन्सन यांनी कार्यक्रमावेळी केली. कार्यक्रमात नोबेल विजेते देखील उपस्थित होते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)